Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

दिंडोरी तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन महिला जखमी
प्रतिनिधी / नाशिक

पहाटेच्या सुमारास अचानक घरात अवतीर्ण झालेल्या बिबटय़ाने जखमी केल्यानंतरही धिटाईने त्याला एका खोलीत डांबून ठेवण्याची कामगिरी दिंडोरी तालुक्यातील श्रृंगारपाडा गावच्या बागूल कुटुंबाने केली. या चित्तथरारक नाट्यात दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरूवारी दुपारी वन विभागाने घरात कोंडून ठेवलेल्या बिबटय़ाला पिंजऱ्यात जेरबंद करण्याचे सोपस्कार पार पाडले.

बेमोसमी पावसामुळे नुकसानीचा आकडा कोटय़वधीच्या घरात

प्रतिनिधी / नाशिक

सलग चार दिवसांचा बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा आता गायब झाला असून बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगात सुरू झाल्याने उकाडय़ाचे प्रमाण वाढले आहे. नाशिकच्या हवामान केंद्रात गुरूवारी दुपारी ३५ अंशांची नोंद झाली. जळगाव जिल्ह्य़ातही थोडय़ाफार फरकाने अशीच स्थिती आहे. दरम्यान, बुधवारी पावसामुळे नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू झाले असून नुकसानीचा आकडा कोटय़वधीच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थायी समितीतील शह-काटशहाचे राजकारण नव्या वळणावर
प्रतिनिधी / नाशिक

महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा शह-काटशहाचे राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची नेमणूक करताना युती व अपक्ष आघाडीचे महापौर नेमकी कोणती खेळी खेळतात आणि गेल्यावेळी स्थायी समिती ताब्यात राखण्यात यशस्वी झालेला राष्ट्रवादी-काँग्रेस गट त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतो यावर हे नाटय़ किती रंगेल, ते अवलंबून राहणार आहे.

पतीने गळफास घेतल्याने पत्नीचीही आत्महत्या
प्रतिनिधी / नाशिक

पतीने गळफास घेतल्याचे पाहून पत्नीनेही स्वतला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील सातपूर परिसरात घडली. पतीच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुनील किसन पवार (३३) व अर्चना पवार (२३)असे या जोडप्याचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कोळीवाडा येथे वास्तव्यास असणाऱ्या सुनील व अर्चनाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

औद्योगिक क्षेत्रात नाशिकची नवी ओळख होण्याची गरज
‘प्रोगेसिव्ह महाराष्ट्र’ चर्चासत्रातील सूर
नाशिक / प्रतिनिधी
पुणे शहर ज्याप्रमाणे डिझायनर्स सिटी किंवा डिझायनर हब म्हणून ओळख निर्माण करीत आहे, त्याप्रमाणे नवी ओळख नाशिक शहरानेही तयार करावी, असा सूर फिक्की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि निमा या औद्योगिक संघटनांतर्फे निमा हाऊसमध्ये आयोजित ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र’ या चर्चासत्रातून निघाला.

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के
नाशिक / प्रतिनिधी

आयसीएससीई दिल्ली मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. राकेश विजय बोरा ८७.२ टक्के गुणांसह प्रथम आला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ८० टक्क्याहून अधिक गुण मिळाले. सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीसाठी ऑर्किडमध्येच प्रवेश घेण्याचे आवाहन सचिव धिरेंद्र पाटील यांनी केले. प्रिन्सीपल सुंदरकुमार गाडीकोटा यांनीही ऑर्किड शाळेचे अकरावी कॉमर्स व सायन्सचे प्रवेश निश्चित करणे सुरू असल्याची माहिती दिली. कुठल्याही शाळेसाठी तिसऱ्याच वर्षी इतके घवघवीत यश मिळविणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. उत्कृष्ट दर्जाचा शिक्षणवर्ग दिमतीला आणल्यामुळे छोटय़ा शहरातील विद्यार्थीही चांगली क्षितीजे गाठू शकतील, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे संस्थेने ठरवले असल्याचेही ते म्हणाले.

लिपिक, टंकलेखक परीक्षांचे निकाल जाहीर
प्रतिनिधी / नाशिक

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या लिपिक, टंकलेखक परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून नाशिक परीक्षा केंद्रावर उत्तीर्ण झालेल्यांची प्रमाणपत्र पडताळणी २९ मे रोजी घेतली जाणार आहे. या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. पुणे, कोल्हापूर व नाशिक या तिन्ही परीक्षा केंद्रातील २१३६ जणांचा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये समावेश आहे. पुणे येथील बी. जी. वैद्यकीय महाविद्यालय, ससून सवरेपचार रुग्णालयाच्या आवारात ही पडताळणी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या कालावधीत केली जाणार आहे.