Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
वार्ताहर / वणी

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील द्राक्ष उत्पादकांना कोटय़वधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास पोलिसांनी शेतकऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले असून याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल २९ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून या प्रकरणात सुमारे एक कोटी रूपयाची रक्कम अडकल्याचीही बोलले जाते. उत्तर प्रदेशातील नसीम इम्तियाज हुसेन हक ऊर्फ छोटूभाई हा व्यापारी द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नाशिकच्या वडाळा भागात राहात होता.

जळगावमधील बालकामगारांचा प्रश्न ऐरणीवर
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील पारोळा शहरात फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बालकामगार मुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा प्रकारच्या धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या बाल कामगारांची पाहणी केली जाण्याची शक्यता वाटत होती. तथापि घटनेला महिना उलटल्यानंतरही बाल कामगार मुक्तीविषयी कोणत्याच हालचाली न झाल्याने कामगार आयुक्तांचीच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी विविध मंडळ व संघटनांकडून करण्यात येत आहे.

सिंचन योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे - आ. पाटील
धुळे / वार्ताहर

सिंचन योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपणास सहकार्य करावे, असे आवाहन आ. रोहिदास पाटील यांनी केले आहे. लोढे-सीताणे लघु पाटचारीचा विस्तार करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पांझण डाव्या कालव्याची वाढ व विस्तार योजनेंतर्गत लोंढे-सीताणे पाटचारीच्या दुरूस्तीचे काम सुरू असून या कामाची पाटील यांनी पाहणी केली.

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला घेरण्याची काँग्रेसची तयारी
नवापूर / वार्ताहर

नंदुरबार जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांविरुद्ध लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला नसल्याची ओरड सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस दिलीप नाईक हे मात्र त्यास अपवाद ठरल्याचे प्रशस्तीपत्र खा. माणिकराव गावित यांनीच दिल्याने विधानसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्य़ात अनेक चमत्कारिक राजकीय घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत. माणिकरावांनी राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावीत व त्यांचे बंधू शरद गावीत यांच्यावर थेट आरोप केल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीविरोधात व्यूहरचना केल्याची चर्चा आहे.

युवकांना दिशा देण्याचे सामथ्र्य वरिष्ठांमध्ये ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात प्रा. छापेकर यांचे मत
भुसावळ / वार्ताहर
जागतिक मंदी, त्यामुळे निर्माण होणारी बेरोजगारी, आवश्यक पात्रता अंगी असूनही वारंवार पदरी पडणारी निराशा, अशा विविध समस्यांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या आजच्या युवा पिढीला आपल्या अनुभवाच्या आधाराने दिशा देण्याचे सामथ्र्य वरिष्ठ नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे वरिष्ठांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ युवकांना मार्गदर्शन करण्यात सत्कारणी लावावा, असे आवाहन व्यवस्थापन विषय तज्ज्ञ प्रा. शरदचंद्र छापेकर यांनी केले.

बसपने अडविली राष्ट्रवादीची वाट
जळगाव /वार्ताहर

रावेर लोकसभा मतदारसंघात शेवटपर्यंत अंतर्गत असंतोषाला तोंड देणाऱ्या राष्ट्रवादीवर मात करीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांनी विजयश्री मिळविली. जातीय प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी धुडकावून लावले. बसपच्या सुरेश पाटील यांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते घेतल्याने त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी मारक ठरल्याचे स्पष्ट झाले.
जावळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यातील लढत चुरशीची होईल, असा अंदाज सर्वानीच व्यक्त केला होता.

ढाबा मालकाच्या मारहाणीत अल्पवयीन नोकराचा मृत्यू
मालेगाव / वार्ताहर

किंमती भ्रमणध्वनी चोरल्याच्या संशयावरून येथील एका ढाबा मालकाने साथीदारांच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत ढाब्यावरील अल्पवयीन नोकराचा मृत्यू झाला. मनोज भगवान सोनवणे (१७) असे या नोकराचे नाव असून तो चिखलओहोळ येथील रहिवाशी होता. गावाजवळच महामार्गावर असलेल्या एका ढाब्यावर तो काही दिवसांपूर्वी कामास लागला होता.

जळगावच्या कंपनीस हिमाचल प्रदेशातील सिंचन प्रकल्पाचे काम
जळगाव / वार्ताहर
हिमाचल प्रदेशातील बाल्ह खोरे मध्यम सिंचन प्रकल्पाचे सुमारे ६५ कोटी रूपयांचे काम भारतातील सर्वात मोठी सुक्ष्म सिंचन आणि कृषी कंपनी असलेल्या येथील जैन इरिगेशन सिस्टिमला मिळाले आहे. ४० टक्के पाण्याची बचत करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचा तीन हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

जुन्नरमध्ये टंचाई निवारणार्थ कामांना सुरूवात
धुळे / वार्ताहर

तालुक्यातील जुन्नर व दिवाणमळा गावालगत असलेल्या फरशी कामाचा शुभारंभ धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी जुन्नर गावातील पाणी टंचाईच्या निवारणाकरिता गावातील विहिरीचा गाळ काढणे आणि खोली वाढविण्याचे कामही सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने जुन्नर व दिवाणमळा गावालगत फरशीचे काम मंजूर करण्यात आले आहे. दिवाणमळा-जुन्नर गावालगत असलेल्या फरशीचे गेल्या अनेक वर्षांपासून काम झाले नव्हते. परिणामी वाहनधारकांना कसरत करावी लागत असे, तसेच पावसाळ्यात फरशीजवळ पाणी साचून आरोग्याची समस्या निर्माण होत होती. म्हणून फरशीचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे प्रयत्न करून फरशीचे काम मंजूर करून घेतले. तालुक्यातील जुन्नर येथील पाणी टंचाी दूर करण्यासाटी गावातील विहिरीतील गाळ काढणे व खोल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवकालीन योजनेतून अनुदान मिळवून सदर विहिरीचे काम सुरू करण्यात आले.