Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

विशेष

मद्यसम्राटापुढे पेच
मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी आपली आघाडीची कंपनी युनायटेड स्पिरिटस लि.मध्ये सहकारी कंपनी म्हणून जगातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी डियाजियोला आमंत्रित करण्याचा आखलेला डाव फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले वर्षभर उभयतांमध्ये विविध पातळ्यांवर चर्चा सुरु होती. परंतु यातून ठोस तोडगा काही निघू शकलेला नाही. चर्चेच्या फेऱ्या मात्र झडतच आहेत. अद्याप कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. डियोजियो सुमारे १२०० कोटी रुपये खर्च करुन युनायटेड स्पिरिटस लि.मध्ये १४ टक्के भांडवल खरेदी करणार आहे. डियाजियोला युनायटेड स्पिरिटस लि.शी सहकार्य करार करावयाचा आहे.

कुणीही यावे, धुडगूस घालुनी जावे!
नाशिकमधली सध्याची स्थिती या शीर्षकाबरहुकूम झाली आहे. विभागनिहाय निर्माण झालेली तरुणांची टोळकी, त्याचे नेतृत्व करणारे कुणीतरी ‘भाऊ’, अशा भाऊंचे गॉडफादर असलेली व कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा टिळा लाऊन घेणारी दादा, नाना, अण्णा, बाबा नामावळीतील मंडळी चढत्या भाजणीने सर्वसामान्यांवर आपला दबदबा निर्माण करीत असताना पोलीस यंत्रणेचा दरारा वगैरे तर जाऊच द्या, पण साधे अस्तित्व तरी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

‘वॉर्मिग’बाबत वॉर्निग
जागतिक तापमानात २१०० साली आधीच्या अंदाजापेक्षा दुप्पट वाढ होणार आहे, असा नवा निष्कर्ष ‘मॅसाचुसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी काढला आहे आणि तो अमेरिकन हवामान संस्थेच्या मासिकात प्रसिद्धही झाला आहे. २००३ च्या निष्कर्षांनुसार पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान २१०० साली २.४ अंश सेल्सियसने वाढणार होते. नव्या संशोधनानुसार ते ५.२ अंश सेल्सियसने वाढेल. ओबामा प्रशासनाने या तापमानवाढीविरोधात पावले उचलण्याचा निर्णय घेतला असतानाच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या पाश्र्वभूमीवर आठवण होते मायकेल क्रायटन यांची. शतकभरानंतरच्या जागतिक तापमानवाढीचा बागुलबुवा उभा करून आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या निधीची तरतूद करून जगाला आज भेडसावणाऱ्या खऱ्या प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष होत आहे, यावर त्यांनी आवाज उठविला होता. विज्ञानाच्या नाममात्र आधारावर राजकारणी व ‘एनजीओ’ लोकांमध्ये प्रथम भीती निर्माण करून नंतर ती कशी ‘कॅश’ करतात, याचेही त्यांनी साद्यंत विवेचन केले आहे. हे मायकेल क्रायटन म्हणजेच ‘ज्युरासिक पार्क’ या जगविख्यात कादंबरीचे लेखक. आपल्या समाजाचा वैज्ञानिक पाया कसा ठिसूळ आहे, हे त्यांना या कादंबरीच्या निमित्ताने उमगले. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर, डायनोसारचे असे पुनरुज्जीवन अशक्य आहे, असा रास्त आक्षेप लोक घेतील, असे त्यांना वाटत होते. प्रत्यक्षात शास्त्रज्ञांनीही असा आक्षेप घेतला नाही. उलट अमेरिकन सिनेटमधील एका सदस्याने सांगितले की, डायनोसारच्या पुनरूज्जीवनासाठी सुरू असलेल्या संशोधनावर बंदी घालण्याचा ठराव आणला जाईल! क्रायटन यांनी ‘स्टेट ऑफ फीअर’ ही कादंबरीच तापमानवाढीच्या पाश्र्वभूमीवर लिहिली. त्यात काही ‘इकोटेरेरिस्ट’चा म्हणजेच पर्यावरण अतिरेकी स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून लोकांच्या मनात भीती निर्माण करीत जागतिक तापमानवाढीच्या मुद्दय़ाला कशी बळकटी देतात, त्यासाठी राखलेल्या अवाढव्य निधीवर त्यांचा खरा डोळा कसा असतो, याचा रंगतदार मागोवा आहे. अर्थात कितीही म्हटले तरी कादंबरी ही काल्पनिकच असणार. त्यामुळे आपला मूळ मुद्दा दुर्लक्षिला वा कमी लेखला जाऊ नये यासाठी क्रायटन यांनी या विषयावर विपुल लेखन केले व व्याख्यानेही दिली. संयुक्त राष्ट्रांच्याच जागतिक तापमानवाढीबाबतच्या अहवालांची आणि आलेखांची चिरफाड करीत त्यांनी शतकभरानंतर येणाऱ्या या कथित संकटाचे अचूक अनुमानदेखील काढता येऊ शकत नसल्याची कबुली या अहवालातच कशी आहे, हे ठासून मांडले. या सर्व अहवालांची भाषा कशी भोंगळ, फसवी आणि कल्पनेवर आधारित आहे, हेदेखील त्यांनी मांडले. १९०० साली कुणा माणसाने २००० सालातल्या संकटाबद्दल अनुमान करणे कसे हास्यास्पद ठरले असते, हे मांडताना त्यांनी प्रतिजैवके, संगणक, नायलॉन, विषाणू, जनुके, अणुऊर्जा, अणुबॉम्ब अशा शेकडो शोधांची यादीच दिली आहे, जे १९०० सालात कुणाच्या कल्पनेतही नव्हते. इतक्या शोधांनी आजचे जीवन सुखाचे वा धोक्याचे बनले असेलही पण शतकापूर्वी त्याची कल्पनाही नसलेल्या माणसाने २००० सालातील धोक्याचा विचार करून अहवाल तयार केले असते वा निधी निर्माण केला असता तर ते किती हास्यास्पद ठरले असते तेच आज आपण करीत आहोत, असा त्यांचा दावा होता. २१०० सालातल्या संकटाचे भूत उभे करून आज प्रत्यक्षात भेडसावणाऱ्या गरीबी, बेकारी, दहशतवाद या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत, याची त्यांना चीड होती. पर्यावरणरक्षण व संवर्धन प्रत्येकजण करू शकतो आणि प्रत्येकाने ते करावे पण अशास्त्रीय पायावर पर्यावरणभय पोसणे अधिक आत्मघातकी आहे, असा त्यांचा इशारा होता. विशेष म्हणजे त्यांच्या कादंबरीवर टीका झाली पण त्यांच्या या मुद्दय़ांचा सडेतोड प्रतिवाद कुणाला साधला नाही.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com