Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

पुण्यात उभे राहणारतीस मजल्यांचे चार मनोरे
एसएनडीटीजवळ ४५० कोटींचा प्रकल्प, तीन वर्षांत पूर्ण होणार
पुणे, २१ मे/ प्रतिनिधी
कुमार बिल्डर्स या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या समूहाने कोथरूड येथे ‘४५ निर्वाणा हिल’ या नावाने नवीन प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पात तीस मजल्यांचे चार टॉवर्स उभारले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाला असून, हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची एकूण किमत सुमारे ४५० कोटी रुपये आहे. ही माहिती कुमार बिल्डर्सचे अध्यक्ष ललितकुमार जैन आणि कार्यकारी संचालिका कृती जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जैन म्हणाले, या प्रकल्पात पहिल्या सहा मजल्यांवर वाहनतळ असून त्यानंतरच्या दोन मजल्यांवर हेल्थ क्लब, जिम्नॅशियम आदी सुविधा असणार आहेत.

कर बुडविणाऱ्या शिक्षण संस्थांवर फौजदारी करावी
जिल्हा परिषदेच्या सभेत मागणी
पुणे, २१ मे/ खास प्रतिनिधी
‘माईर्स एमआयटी’ ही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे ‘डोनेशन’ घेते. पण ग्रामपंचायतीचा कर मात्र भरत नाही. कर वसुलीला गेल्यावर कोणालाही दाद दिली जात नाही आणि उलट वसुली अधिकाऱ्यांनाच विकत घेतले जाते. कर चुकविल्याबद्दल या संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा..

युतीचा कोथरूड बालेकिल्ला अभेद्यच!
पुणे, २१ मे/ प्रतिनिधी

मनसेच्या रणजित शिरोळे यांनी साडेअठरा हजार आणि डीएसकेंनी सात हजार मते घेऊनही कोथरूड मतदारसंघात भाजपने तब्बल २१ हजार मतांची आघाडी घेत युतीचा ‘कोथरूड’ हा बालेकिल्ला लोकसभा निवडणुकीत अभेद्य ठेवला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोथरूड विधानसभा मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आला असून पूर्वीच्या शिवाजीनगर मतदारसंघातील युतीला अनुकूल असलेला बराचसा भाग या मतदारसंघातून वगळला गेला आहे.

ढगांच्या गडगडाटात पावसाच्या सरी ०.७ मिलिमीटरची नोंद
पुणे, २१ मे / प्रतिनिधी

पुणे शहराच्या मध्य भागासह अनेक ठिकाणी आज ढगांच्या गडगडाटात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ांत पुणे वेधशाळेत ०.७ मिलिमीटर इतक्या पहिल्याच वादळी पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांतही पुण्यात असाच वादळी पाऊस अपेक्षित आहे. पुण्यात गेले चार दिवस वादळी पावसाची वातावरणनिर्मिती होऊन किरकोळच पावसाने हजेरी लावली. काल मात्र काही भागात मोठय़ा सरी बरसल्या. त्यानंतर आजही दुपारी आकाश भरून आले आणि ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. जोराचा वाराही सुटला होता. त्यामुळे मोठय़ा पावसाची चिन्हे दिसत होती. त्यानंतर साडेचारच्या सुमारास मध्य शहर, शिवाजीनगर परिसर, औंध रस्ता, दापोडी तसेच उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. या शिडकाव्यामुळे सायंकाळच्या वेळी वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्याच वेळी लष्कर परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता अशा परिसरात पावसाने हुलकावणीच दिली.

श्रीकांत बोजेवार यांना ‘अक्षरशब्द पुरस्कार’
पुणे, २१ मे/प्रतिनिधी

निनाद या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ‘अक्षरशब्द पुरस्कार’ या वर्षी मुंबई ‘लोकसत्ता’चे सहसंपादक श्रीकांत बोजेवार यांना देण्यात येणार आहे. सामाजिक, राजकीय व प्रचलित घडामोडींवर निर्विष टिप्पणी करण्याचे कौशल्य एक पत्रकार व लेखक म्हणून ते करीत आहेत. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या अगोदर वाय. डी. सहस्रबुद्धे, डॉ. गणेशन, मीरा बडवे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सदर पुरस्कार समारंभ ३० मे रोजी होणार असून भारतकुमार राऊत यांच्या हस्ते व निवेदक सुधीर गाडगीळ, विनय फडणीस, शुभदा जोशी यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. पुरस्काराची रक्कम भालचंद्र केसरी यांच्या नावाने गेली तीन वर्षे दिली जाते.

घराची भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
बेल्हे, २१ मे/ वार्ताहर

शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील गुलटेंभी येथे काल (दि. २०) सायंकाळी वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. पत्रे उडालेल्या एका घराच्या कोसळलेल्या भिंतीखाली चारजण सापडले. त्यात एक वृद्ध महिला जागेवर मरण पावली. अन्य तीनजण गंभीररीत्या जखमी झाल्याने ग्रामस्थांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत मरण पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव अनुसया बापू शिंदे (वय ७०) असे आहे, तर गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तींची नावे- पोपट बापू शिंदे, त्यांची पत्नी जनाबाई पोपट शिंदे, त्यांची कन्या सुरेखा पोपट शिंदे अशी आहेत. या तीनही जखमींना ग्रामस्थांनी अणे (ता. जुन्नर) येथे उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी (दि. २०) सायंकाळी शिंदेवाडी परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. परिसरात चार घरांच्या पडवीचे पत्रे सांगाडय़ासह उडाले. परंतु जीवितहानी झाली नाही, असे मारुती शिंदे यांनी सांगितले.

मारहाणप्रकरणी टेक्सास गायकवाडसह सात जणांना जामीन
पुणे, २१ मे / प्रतिनिधी

मारहाणप्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रार केलेल्या टेक्सास गायकवाडसह अन्य सात जणांची प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. गुरव यांनी सुटका केली. याबाबत टेक्सास गायकवाड (वय ६२, रा. सांगवी) यांनी ही सात जणांविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली होती. त्यात सात जणांना अटक करण्यात आली. उषा अनिल पवार (वय ३०), छाया नंदकिशोर लोंढे (वय ४०, दोघी रा. हडपसर), नितीन विनोद अडसूळ (वय ३५, रा. येरवडा), शशिकला राजू वाघमारे (वय ३६, रा. हडपसर), शोभा युवराज ओहाळ (येरवडा), परशुराम वाडेकर (वय ४१, रा. दापोडी) आणि नवनाथ कांबळे (वय ४०, हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रत्येकांची दहा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. याच प्रकरणात उषा पवार यांनी गायकवाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यात गायक वाड यांनाही जामीन देण्यात आला.

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना उद्यापर्यंत कोठडी
पुणे, २१ मे / प्रतिनिधी

पूर्व वैमनस्याच्या कारणावरून कोयत्याने वार करून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना २३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. इटकळकर यांनी दिले आहेत. विराज शरदराव ढुमे पाटील (वय २४, रा. वडगाव बुद्रुक), दत्तात्रय सहदेव यावतकर (वय २४) आणि अविनाश रामदास शिंगोटे (वय २३, दोघेही रा. पाषाण) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना काल पोलिसांनी अटक केली. विनायक आनंदराव पाटील (वय २४, रा. धनकवडी) यांनी ही फिर्याद दिली. पाटील आणि आरोपींचे पूर्ववैमनस्य आहे. पाटील हे दारू पित असताना त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्या प्रकरणी पोलिसांनी त्या तिघांना अटक केली. गुन्ह्य़ात वापरलेला कोयता जप्त करायचा आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील अ‍ॅड. एच. व्ही. डोईफोडे यांनी न्यायालयाकडे केली.

सहाआसनी रिक्षा उलटून वृद्धा ठार
पुणे, २१ मे /प्रतिनिधी

भरधाव सहाआसनी रिक्षा उलटी होऊन झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. शंकरशेठ रस्त्यावर धोबी घाटाजवळ काल सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. चँद मेहबुबा कुरेशी (वय ४६, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे या वृद्धेचे नाव आहे.