Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

राज्य

शवविच्छेदन अहवालानंतर ‘त्या’ मुलीच्या मृत्यूचे गूढ वाढले
नागपूर, २१ मे / प्रतिनिधी

महालातील गडकरी वाडय़ातील कारमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचा मंगळवारी रात्री गुदमरून मृत्यू झाल्याचे बोलले जात असतानाच प्राप्त झालेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ‘त्या’ मुलीच्या अंतर्वस्त्रावर रक्ताचे डाग असल्याचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आल्याचा आरोप होत असतानाच या अहवालामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. अंतिम शवविच्छेदन अहवालानंतरच या मागील गूढ उकलण्याची शक्यता आहे.

मराठवाडय़ात पाच वर्षांत वीज कोसळून ५०० जणांचा बळी
निधी येऊनही वीजरोधक यंत्र बसविण्यात उदासीनता
दत्ता सांगळे
औरंगाबाद, २१ मे

मराठवाडय़ात नेहमीच धुमाकूळ घालणाऱ्या विजेने गेल्या पाच वर्षांत ४८६ जणांचा बळी घेतला आहे. विभागात वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्य़ात वीजरोधक यंत्र बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आठही जिल्ह्य़ांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधीही पोहचता झाला.

लग्नाच्या वऱ्हाडाला अपघात; सात ठार
बुलढाणा, २१ मे / प्रतिनिधी

सिंदखेडराजा-नाव्हा मार्गावर कन्टेनरने वऱ्हाडाच्या मेटॅडोरला धडक दिल्याने चालकासह ७ वऱ्हाडी जागीच ठार तर, ८ जखमी झाले. मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. या अपघातामुळे सिंदखेडराजा आणि जालना शहरात शोककळा पसरली आहे. जालना येथील रमेश हरिभाऊ शिंदे यांचा मुलगा शंकरचा विवाह सिंदखेडराजा येथील महादेवराव यडूजी चौधरी यांच्या मुलीशी २० मे रोजी झाला.

आता प्रतीक्षा पनवेल-कर्जत लोकलची!
अनिरुद्ध भातखंडे
पनवेल, २१ मे

मनमाड-पुणे ही पनवेलमार्गे धावणारी रेल्वेगाडी सुरू होऊन सव्वा वर्षांचा कालावधी उलटला, तरीही पनवेल-कर्जत ही लोकल सेवा कागदावरच असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मनमाड-पुणे आणि पुणे-मनमाड ही गाडी कर्जतमार्गेच धावत असल्याने पनवेल-कर्जत लोकल सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला काय अडचण आहे, असा प्रश्न प्रवासी, कामगार आणि व्यापारी विचारत आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्जतच्या प्रवाशांत तीव्र असंतोष
श्रीराम पुरोहित
कर्जत, २१ मे

मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या लोहमार्गावर कर्जत हे एक अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून खोपोलीला जाण्यासाठी स्वतंत्र लोहमार्ग जात असल्यामुळे कर्जत हे रेल्वे स्थानक रेल्वेच्या परिभाषेनुसार ‘जंक्शन’ म्हणून ओळखले जाते. मात्र या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांच्या निराकरणाबाबत मध्य रेल्वे प्रशासनाचे धोरण प्रारंभापासून आजतागायत उदासीनतेचेच राहिलेले असल्यामुळे या परिसरातील प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

पेण रेल्वे स्टेशन क्रॉसिंगपुरते!
आनंद जाधव
पेण, २१ मे

कोकण रेल्वे मार्गावरील पेण रेल्वे स्थानकात एक-दोन पॅसेंजर गाडय़ा सोडल्यास एकही जलद वा अतिजलद गाडी थांबत नसल्याने या रेल्वे स्थानकाचा उपयोग रायगडमधील कोकणवासीयांना तर होत नाही. त्यांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी पनवेल येथे जावे लागते. रायगडमध्ये पेण रेल्वे स्थानक मध्यवर्ती आहे. खोपोली, अलिबाग, आरसीएफ, रिलायन्स आदी ठिकाणी कोकण व परप्रांतातील चाकरमानी येथे स्थानिक झाले आहेत.

कोकण रेल्वेकडून सावंतवाडी परिसराची उपेक्षाच!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २१ मे

कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ११ वर्षांंत प्रवाशांच्या स्वप्नाकडे कोणाचे लक्षच नाही. कोकणातील प्रवासी दिशाहीन बनला आहे. चाकरमानी मंडळींना तर आरक्षणाचीही प्रतीक्षा करावी लागते. कोकणातून दरदिवशी हंगामात सुमारे ३०० खाजगी बसेस धावत असूनही मुंबई ते सावंतवाडी मार्गावर एकही प्रवासी गाडी धावत नाही, हे प्रवाशांचे दुर्दैवच आहे.

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेची उपाययोजना
रत्नागिरी, २१ मे/खास प्रतिनिधी

यंदाच्या वर्षी वेळापत्रकापेक्षा सुमारे एक आठवडा आधीच येऊ घातलेल्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वेची यंत्रणा सज्ज झाली आहे. कोकणामध्ये दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर (७ जून) पावसाचे आगमन होते, पण यंदा मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल स्थिती अधिक लवकर तयार झाल्यामुळे दरवर्षीच्या वेळापत्रकापेक्षा सुमारे एक आठवडा आधीच पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संगमेश्वर परिसरातील रेल्वे समस्यांकडे लक्ष देण्याची गरज
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, २१ मे

‘कोकण रेल्वे आली, स्वप्ने साकार झाली’ हे घोषवाक्य दिसायला व ऐकायला योग्य वाटत असले, तरी या सर्वाच्या मुळाशी गेल्यानंतर अनेक समस्या सामोऱ्या येतात. या समस्या कोकण रेल्वेसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या जशा आहेत, तशा प्रवासी वर्गाच्याही आहेत. संगमेश्वर रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकामध्ये आवश्यक एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा आणि ऑनलाइन संगणक सुविधेचा अभाव असल्याने तीन तालुक्यांतील रेल्वे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड शून्य वीज भारनियमनासाठी ‘रिलायबिलिटी चार्ज’ घेण्यास तीव्र आक्षेप
जयंत धुळप
अलिबाग, २१ मे

बारामती, पुण्याच्या धर्तीवर रायगड जिल्ह्यात ‘शून्य वीजभार नियमन’ अमलात आणण्यासाठी प्रति महिना १००युनीटपर्यंत वीज वापरणारे घरगुती ग्राहक व सर्व कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व ग्राहकांवर ‘रिलायबिलीटी चार्ज’ (आऱ सी़) आकारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने पुढे आणला आह़े

बिडवागळे पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे?
मोठय़ा आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता
अलिबाग, २१ मे/ प्रतिनिधी
तालुक्यातील बिडवागळे येथे प्रस्तावित पाझर तलावाच्या बांधकामास काम गतवर्षी सुरूवात झाली. बांधकाम तांत्रिकदृष्टया न करता बेसुमार भराव करून पाणी निचऱ्याची व्यवस्था केली नसल्यामुळे गेल्या वर्षी जून महिन्यात या तलावास भेगा पडल्या आणि त्याचा परिणाम तलावाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर पाझरण्यात झाला आहे.

धुळ्याच्या वार्षिक योजनांमध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूद करणार-प्राजक्ता लवंगारे
धुळे, २१ मे / वार्ताहर
जिल्हा वार्षिक योजना २००९ ते २०१० च्या नियोजनात एक्स्प्रेस फिडर, दुग्ध तसेच तीर्थक्षेत्र विकास या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असून त्यामुळे विकासाला चालना मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी आढावा बैठकीत सांगितले.

अपघातात ‘इन्फोसिस’ चे पाच अभियंते ठार
कोल्हापूर, २१ मे / विशेष प्रतिनिधी

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर निपाणीपासून पाच कि.मी. अंतरावरील तवंदी घाटमाथ्यावर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या व्होल्वो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात इन्फोसिस कंपनीचे पाच तरुण संगणक अभियंत्यांना प्राणाला मुकावे लागले. या अपघातात अन्य ३७ अभियंते जखमी झाले असून, त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातातील सर्वजण कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी म्हैसूरला गेले होते. प्रशिक्षण आटोपून नोकरीचा प्रारंभ करण्यासाठी त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांना पुण्यात पोहोचायचे असल्याने कर्नाटक परिवहनच्या ‘ऐरावत’ या आलिशान व्हॉल्वो गाडीतून ते पुण्याकडे रवाना झाले. तथापि, सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास तवंदी घाटाजवळील शिपूर फाटा येथे हॉटेल सत्यवती पॅलेसजवळ घाट उतरताना प्रारंभीच वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव निघालेली ही बस तीनदा उलटली.

वऱ्हाड नेणारा ट्रॅक्टर उलटून दोन ठार
तुमसर, २१ मे / वार्ताहर

वऱ्हाड घेऊन आलेसूरला जात असलेले ट्रॅक्टर लेंडेझरी गावाजवळ उलटून दोघे ठार तर तीस वऱ्हाडी जखमी झाले. अपघातात विजय आत्माराम मेश्राम (५०, रा. बघेडा) जागीच ठार झाले तर शुभम सुरेश घाडगे (१३, रा. मोहपा) या रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच मरण पावल्या. रामचंद्र गणपत जीवतोडे (५०), प्रवीण दशरथ बुजाडे (१३) दोघेही राहणार बघेडा आणि प्रवीण सुरेश घाडगे (१६) रा. मोहपा हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक परवानाधारक नव्हताच पण त्याला वाहन चालवण्याचा अनुभवही नव्हता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पल्लवी बर्गे यांनी सांगितले.