Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

क्रीडा

वीरू का जादू चल गया!
सेंच्युरियन, २१ मे / पीटीआय

वीरू का जादू चल गया.. याच शब्दांत इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या अखेरच्या साखळी लढतीचे वर्णन करता येईल. २७ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांनिशी सेहवागने यंदा साकारलेल्या पहिल्यावहिल्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्सचा चार विकेटस् आणि १५ चेंडू राखून पराभव केला. सेहवागने गौतम गंभीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी उभारलेली ६८ धावांची भागीदारी दिल्लीच्या पथ्यावर पडली. गंभीरने सात चौकारांसह ४७ धावा काढून त्याला सुरेख साथ दिली. सामनावीर पुरस्कारासाठी सेहवागचीच निवड करण्यात आली. उपान्त्य फेरीच्या पाश्र्वभूमीवर सेहवागला गवसलेला फॉर्म दिल्लीसाठी आशादायी गोष्ट म्हणावी लागेल.

मनीष पांडेचे ‘रॉयल’ शतक
डेक्कन चार्जर्सला नमवून बंगळुरू उपान्त्य फेरीत
सेंच्युरियन, २१ मे / पीटीआय
आजचा दिवस मनीष पांडेचा होता. डेक्कन चार्जर्सच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत त्याने १० चौकार आणि चार षटकारांच्या साथीने यंदाच्या आयपीएल हंगामातील दुसरे शतक झळकाविले. आयपीएलमध्ये शतक झळकाविणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर बंगळुरूला १७० धावा करता आल्या.

युवराज नाराज!
दरबान,२१ मे/ वृत्तसंस्था

चेन्नईविरुद्धचे धावांचे छोटे उद्दिष्टही फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे आम्ही पार करू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया किंग्ज पंजाब इलेव्हन संघाचा कर्णधार युवराज सिंग याने व्यक्त केली आहे. चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे युवराज सिंग चांगलाच नाराज झालेला दिसला. चेन्नई किंग्जने विजयासाठी दिलेले ११७ धावांचे किरकोळ उद्दिषटही किंग्ज पंजाब संघाला पार करता आले नाही.

ते दोघे पुन्हा आमने-सामने
हॉंगकॉंग, २१ मे/ वृत्तसंस्था

ते दोघेही एकाच देशाचे, पण बहुतांशी अंतिम सामन्यांमध्ये ते एकमेकांसमोर उभे ठाकायचे. दोघांचेही चाहते अमाप. त्यामुळे त्या दोघांचे सामने त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. झोपेच खोबरे झाले तरी चालेल, पण त्यांचा सामना चुकवणे टेनिस जगताला जमलेले नाही. या दोघांपैकी एकाची सव्‍‌र्हिस भेदक असायची तर दुसऱ्याचा ‘स्मॅश’ लाजवाब होता. असे दोन अमेरिकेचे महान खेळाडू म्हणजे पीट सॅम्प्रस आणि आंद्रे आगासी.

कुंबळेची कर्णधारपदी निवड योग्यच -कॅलिस
सेंचुरियन, २१ मे / पीटीआय

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या कर्णधारपदी अनिल कुंबळेची निवड करण्याचा निर्णय अत्यंत योग्य होता, असे जॅक कॅलिस याने म्हटले आहे. खरं तर पीटरसन इंग्लंडला परत गेल्यानंतर त्याच्याजागी कॅलिसची निवड अपेक्षित होती; पण शेवटी कुंबळेकडेच नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कर्णधारपद न मिळाल्याने आपल्याला अजिबात वाईट वाटले नाही. कारण सलामीला फलंदाजी-गोलंदाजी व त्यात कर्णधारपदही देण्यात आले असते तर ते आपल्यासाठी ओझे ठरले असते, असे कॅलिसने म्हटले आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाची चिंता या पाश्र्वभूमीवर कर्णधारपद हे ओझेच ठरले असते, अशी पुस्तीही त्याने जोडली आहे. कॅलिसच्या मते कुंबळेच्या नेतृत्वाखालीच रॉयल चॅलेंजर्स भन्नाट फॉर्मात आला. कुंबळे हा भारतीय असल्याने संघातील खेळाडूंना तो चांगला ओळखत होता व ही बाब त्याच्यासाठी पूरक ठरली. कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळताना मजा आली, असेही त्याने म्हटले आहे.

फलंदाजांनी घात केला- वॉर्न
दरबान, २१ मे/ पीटीआय

आयपीएलचा गतविजेता राजस्थान रॉयल संघ यावेळी उपान्त्य फेरीसुद्धा गाठू शकला नाही आणि हीच गोष्ट संघाचा कर्णधार व प्रशिक्षक अशा दोन्हीही जबाबदाऱ्या बजाविणााऱ्या शेर्न वॉर्नच्या मनाला चांगलीच लागलेली आहे. उपान्त्य फेरीत पोहोचता न आल्याचे खापर त्याने फलंदाजीवर फोडले आहे. संघाची गोलंदाजी चांगली असली तरी यावेळी फलंदाजांनी घात केला आणि त्यामुळेच आम्हाला उपान्त्य फेरीत पोहोचणे
जमले नाही, असे मत वॉर्नने व्यक्त केले आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये आमची गोलंदाजी अन्य संघांपेक्षा चांगली झाली. क्षेत्ररक्षणामध्येही आमची रणनीती यशस्वी ठरली. पण फलंदाजांना मात्र अपेक्षेनुरुप कामगिरी करता आलेली नाही आणि त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही. पहिल्या सहा षटकांमधल्या पॉवर प्ले’चा फायदा आम्हाला कधीच उचलता आला नाही. कारण या सहा षटकांमध्ये आमचे दोन-तीन फलंदाज तंबूत परतलेले असायचे, असे वॉर्न यावेळी म्हणाला.

चेन्नईच ‘फेव्हरिट’
गुणतालिकेत दिल्ली डेअरडेव्हिल्स अव्वल स्थानावर असला तरी जेतेपदाची माळ त्यांच्या गळात पडणार नाही तर यंदाच्या विजेतेपदासाठी मला चेन्नई ‘फेव्हरिट’ वाटत आहे. दिल्लीच्या संघाची घौडदौड चांगली सुरु असली तरी त्यांचा संघ चेन्नईपेक्षा वरचढ वाटत नाही. सेहवागपेक्षा धोनी हा एक चांगला कर्णधार आहे. खेळाडूंना बरोबर घेऊन खेळणे धोनीला उत्तमरीत्या जमते आणि हीच गोष्ट विजयासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे मला दिल्लीपेक्षा चेन्नईच विजेतेपदाचे दावेदार वाटत आहे.

इंग्लंड-विंडिज यांच्यातील पहिली वन डे रद्द
लीड्स, २१ मे / वृत्तसंस्था

येथील इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधला पहिला एकदिवसीय सामना आज पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २४ मे रोजी ब्रिस्टल येथे होणार आहे. तर तिसरा एकदिवसीय सामना २६ मे रोजी बिर्मिगहॅम येथे खेळविण्यात येणार आहे.

आयटीएफ महिला टेनिस : ईषा-रश्मी बाद भारताचे आव्हान संपुष्टात
मुंबई, २१ मे / क्री. प्र.
ईषा लखानी आणि रश्मी चक्रवर्ती या उपान्त्यपूर्व फेरीतच गारद झाल्याने १० हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेत द्वितीय मानांकन प्राप्त झालेल्या ईषा लखानीला जपानच्या मो कावाटोको हिने ७-५, ७-५ असा पराभवाचा धक्का दिला. पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या कावाटोकोने १०० मिनिटे चाललेली ही लढत जिंकून उपान्त्य फेरीत धडक मारली. चौथे मानांकन मिळालेली अनुभवी रश्मी चक्रवर्ती हिला चीनच्या चून यान हिने ६-१, ७-६ (७-४) असे दोन सरळ गेम्समध्ये पराभूत केले. ही लढत पावणेदोन तास रंगली. उपान्त्य फेरीत तो कावाटोको हिची लढत कोरियाची बिगर मानांकित खेळाडू सिओ क्युंग कॅन्ग हिच्याशी होईल. कॅन्गने अझबेकिस्तानची बिगर मानांकित खेळाडू अ‍ॅलिसा ओगोरोडोव्हा हिला ६-३, ६-१ असे नमविले होते. दुसरी उपान्त्य लढत चून यान ही आणि अव्वल मानांकित अ‍ॅनास्तेसिआ मल्होत्रा (जपान) यांच्यात होईल. मल्होत्राने उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाची पाचवी मानांकित यून चंग जिऑन्ग हिला ६-४, ६-२ असे हरविले होते.