Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

व्यक्तिवेध

उंचीने ठेंगणी, गव्हाळ वर्णाची आणि काहीशी अबोल, अशा या व्यक्तीने तब्बल १९ वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले असेल, असे सांगूनही खरे वाटणार नाही. ‘इतक्या वेळा कसा काय एव्हरेस्ट पादाक्रांत केलास बुवा?’ असे विचारलेच तर तो खाली मान घालून उभा राहील आणि म्हणेल, ‘ते मलाही माहीत नाही.’ त्याचे नाव आहे अपा शेर्पा. अपा शेर्पा ऊर्फ ल्हाख्पा तेनझिंग शेर्पा. कृष्णा पाटील या मराठी मुलीने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी झळकली, तेव्हा तिच्या प्रशिक्षक वाटाडय़ाविषयी स्वाभाविकच उत्सुकता निर्माण झाली. तोच हा अपा शेर्पा, कृष्णा पाटीलचा प्रशिक्षक. हा नेपाळी शेर्पा राहातो हिमालयाच्याच परिसरात. जवळपास

 

पाठीवरच घर घेऊन तो राहातो. बहुतेक शेर्पाबद्दल असा एक गैरसमज आहे की, ते हिमालयात ट्रेकिंग करणाऱ्यांचे सामान वाहून नेणारे हमालच असतात. पण ते खरेतर वाटाडे म्हणजे वाट दाखविणारे असतात. थोडक्यात मार्गदर्शक! अपा शेर्पाला त्याचे वय विचारले तर तो सांगतो, ६०. म्हणजे तो ६० वर्षांचा नाही! त्याचा जन्म आहे १९६० चा; पण मग तो म्हणतो १९६० की १९६२, ते नक्की सांगता येत नाही. वयाच्या बाराव्या वर्षी त्याला आई इला फुती, दोन बहिणी आणि तीन लहान भाऊ यांचे पालनपोषण करायची जबाबदारी उचलावी लागली, कारण त्याच्या वडिलांचे तेव्हा निधन झाले होते. तो थामे या गावचा रहिवासी, पण या जबाबदारीमुळे त्याला शिक्षण सोडून द्यावे लागले. डेन्मार्कच्या एका भल्या गृहस्थाने त्याला शिष्यवृत्ती देऊन त्याची रवानगी कुमजुंग हिमालयन ट्रस्ट स्कूलमध्ये केली आणि त्याचे शिक्षण सुरू झाले. दारिद्रय़ाचे चटके सहन न झाल्याने त्याने शिक्षण सोडून हिमालयालाच जवळ करायचा निर्णय घेतला. तो अन्नपूर्णा भागात राहायला गेला आणि हिमालयात फेरफटका मारू इच्छिणाऱ्यांना तो मार्ग दाखवायचे काम करू लागला. त्यांची कामे करू लागला. एहार्द लॉरेटानच्या तळावर त्याला स्वयंपाकी म्हणून काम करशील का, असे विचारण्यात आले, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना. १९८७ मध्ये याके हारा या जपानी गिर्यारोहकाने त्याला नोकरीच देऊ केली आणि अन्नपूर्णाचे गिर्यारोहण अपाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. शेर्पाना त्या काळात कधीही शिखर गाठू दिले जात नसे, पण १९८८ मध्ये अपा सर्वप्रथम गिर्यारोहक पथकाचे सामान घेऊन एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर त्याला कोरियन आणि पाठोपाठ अमेरिकन गिर्यारोहकांनी कामावर ठेवले. तथापि कमी अनुभव आणि सवयीचा अभाव यामुळे त्यांची पथके साडेआठ हजार मीटर उंचीपर्यंतच जाऊ शकली. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी यांग ची या तरुणीशी त्याचा विवाह झाला. त्यानंतरही त्याने एव्हरेस्टच्या दिशेने आपले मार्गक्रमण चालूच ठेवले. १० मे १९९० रोजी न्यूझीलंडच्या पथकासमवेत त्याने एव्हरेस्ट पुन्हा पादाक्रांत केले. त्यावेळी त्याच्या पथकाचे नेतृत्व रॉब हॉल याच्याकडे होते. गिर्यारोहणातला अत्यंत अनुभव असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून हॉल यांच्याकडे पाहिले जाते. त्यानंतर त्याने सातत्याने एव्हरेस्ट हेच आपले ध्येय ठेवले. २२ मे २००८ रोजी अपाने अठराव्यांदा एव्हरेस्ट सर केले, तर २१ मे २००९ रोजी तो एकोणिसाव्यांदा एव्हरेस्ट चढून गेला. कृष्णा पाटीलसमवेतच्या पथकाचा तोच खरा मार्गदर्शक. ‘इतक्या वेळा तू एव्हरेस्टवर जातोस, तुला भीती वगैरे वाटत नाही का?’ असे त्याला विचारले तर तो म्हणतो, ‘माझ्या पत्नीचे माझ्यावर प्रेम आहे ना!’ म्हणजे थोडक्यात भ्यायचे कुणाला? त्या हिमशिखराला? अपा शेर्पाने अठराव्यांदाचा एव्हरेस्ट सर करायचा स्वत:चाच विक्रम काल मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याचे नाव ‘गिनीज बुका’त आले आहे. अपाबरोबर ‘सुपर शेर्पा’चे पूर्ण पथक होते. एव्हरेस्टच्या शिखरावर कृष्णा पाटील आणि अपा शेर्पासह हे सहाजण २० मिनिटे होते. १९८९ ते २००९ म्हणजे २० वर्षांमध्ये १९ वेळा एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या अपा शेर्पाला नेपाळ सरकारच्या वतीनेही गौरविण्यात आले आहे.