Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

रिपब्लिकन पक्षाच्या मतांचा टक्का वाढला
अमरावती लोकसभा मतदारसंघ
अमरावती, २१ मे / प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये घसघशीत आघाडी घेऊन विजय मिळविणारे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी ४२.९ टक्के मतांची कमाई केली असून रिपब्लिकन पक्षाचे डॉ. राजेंद्र गवई यांना ३४.४ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गुढे यांना ३० टक्के मते मिळूनही विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती.

शेतात लागलेल्या आगीमुळे ८० हजाराचे नुकसान
साकोली, २१ मे / वार्ताहर

जांभळी/सडक येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीला लागलेल्या आगीमुळे वाटरपंप, पाईप, वायर, फळबागेचे झाड, पाईप जळून अंदाजित ८० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. रात्री अचानक लागलेल्या आगीत राजेश ढोमणे, जनार्दन गजापुरे, महेंद्र बारसागडे यांच्या शेतात पीव्हीसी पाईप ७० नग, ४५० फूट वायर, ३ मोटरपंप, ३ फुटबाल पाईप, आंबा, संत्रा, केळी व फळबागेचे झाड अंदाजित किंमत ८० हजार रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. पटवाऱ्यांनी शेतात जाऊन पंचनामा करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान नमूद केले. यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पीक मिळाले. त्यातच शेतात लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

साकोलीजवळ आग लागून ट्रक खाक
साकोली, २१ मे / वार्ताहर

राष्ट्रीय माहामार्ग क्र.६ वर जांभळी (सडक) फाटय़ावर ट्रकने झाडाला धडक दिल्यामुळे बॅटरीचे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ट्रक बेचिराख झाला. जवळपास २० ते २५ लाखाचे नुकसान झाले. आज सकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली. साकोलीवरून भंडाऱ्याकडे हा ट्रक (क्र. डब्ल्यूबी१५/ए ५७७०) ज्वालाग्राही पावडर घेऊन जाताना समोरून येणाऱ्या ट्रकला वाट करून देताना रस्त्याच्या कडेच्या झाडावर जाऊन आदळला. बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. चालक सुनील नारायणचंद्र बाफई (४६) देवकी हावडा व वाहक सुजय निमाई हलधर (२४) हे दोघेही ट्रकच्या समोरील काच तोडून बाहेर निघाले. ट्रकमध्ये ज्वालाग्राही पावडर असल्यामुळे पूर्ण ट्रक पेटला. संपूर्ण ट्रक, टायर व पावडर जळून खाक झाले साकोली पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

पुनर्वसित गावातून २२ कुटुंबांचे पलायन
साडेसहा कोटीचा खर्च वाया जाण्याची भीती
सोयी उपलब्ध करून दिल्याचा प्रशासनाचा दावा
चंद्रपूर, २१ मे/ प्रतिनिधी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित करण्यात आलेल्या बावीस कुटुंबांनी सोयीच्या अभावाचे कारण देत नव्याने वसलेल्या गावातून पलायन केल्याने केंद्र व राज्य शासनाने पुनर्वसनावर केलेला साडेसहा कोटीचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचनेत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांचाच उल्लेख
इतर कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

सहावा वेतन आयोग
प्रशांत देशमुख, वर्धा, २१ मे

सहाव्या वेतन आयोगासंदर्भात राज्य शासनाच्या अधिसूचनेत फ क्त शासकीय कर्मचाऱ्यांचाच उल्लेख असल्याने उर्वरित लाखो कर्मचाऱ्यांच्या पुढील सवलतीवर टांगती तलवार आहे.
२१ मे पात्र कर्मचाऱ्यांना त्यांचे विकल्प भरून देण्याची अंतिम मुदत आहे. विकल्प भरून दिल्यानंतरच कर्मचाऱ्याची वेतनश्रेणी शासन निश्चित करते. मात्र गुरुवारी काही शिक्षक विकल्प भरून देण्यास गेले असताना त्यांना संबंधित अधिकाऱ्याने ‘पात्र’ नसल्याचे सांगून फे टाळले.

‘विश्वसंत तुकडय़ादास’चे प्रकाशन
शेंदुरजनाघाट, २१ मे / वार्ताहर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्त मानवता श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या ग्रामजयंती महोत्सवात संगीत भागवत व ग्रामगीता तत्त्वज्ञान सप्ताह पार पडला.
ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठलराव घाटोळ यांनी लिहिलेल्या ‘विश्वसंत तुकडय़ादास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते मोठय़ा थाटात करण्यात आले. यावेळी उन्नती चौधरी, बी.के. ठाकरे, गणेशराव वि. घाटोळ, अनिलपंत चौधरी, मनीष सावरकर उपस्थित होते. सविता सावरकर, शोभा फरकाडे, नीलिमा कुबडे, आदी उपस्थित होते.

गच्चीवरून पडून एकाचा मृत्यू
यवतमाळ, २१ मे / वार्ताहर
लघुशंकेसाठी झोपेतून उठलेला तरुण गच्चीवरून थेट खाली पडल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी रात्री येथील वैशाली नगरात घडली. दशरथ साव (४४) असे त्याचे नाव असून तो बिहार राज्यातील पीलीबाजार (जि. लकीसराय) येथील राहणारा होता. मोलमजुरी करणे, कापड विक्रीचा व्यवसाय करणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे यासाठी दशरथ यवतमाळात आला होता. वैशाली नगरात भाडय़ाच्या घरात तो राहात होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो मरण पावला.

मतिमंद मुलीचा विनयभंग
नेरपरसोपंत, २१ मे / वार्ताहर
येथील एका १८ वर्षीय मतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना छत्रपती नगरातील घडली. या मतिमंद मुलीला एकटे बघून सचिन शंकरलाल जयस्वाल (२३) याने तीला घरच्या दुसऱ्या मजल्यावर बोलावून तिचा विनयभंग केला. मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल करताच सचिनला पोलिसांनी अटक केली.

शासकीय अंध विद्यालयात प्रवेश
भंडारा, २१ मे / वार्ताहर
शासकीय अंध विद्यालय संस्थेत सन २००९-१० या शैक्षणिक वर्षांकरिता अंध व अस्थिव्यंग (फक्त मुले) विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
प्रवेशासाठी वय ६ ते १४ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अपंगाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज अधीक्षक, शासकीय अंध विद्यालय, भंडारा यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते ५.४५ वाजताच्या दरम्यान विनामूल्य मिळतील. प्रवेश अर्ज भरून २० जून २००९ पर्यंत कार्यालयात सादर करण्यात यावा, असे कळवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७१८४-२५२३६१/९४०३४१६७२५ यावर अधीक्षक, अंध विद्यालय, जे.के. शाळेजवळ, लाल बहादूर शास्त्री वॉर्ड, स्टेशन रोड, भंडारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घाटंजीला वादळाचा तडाखा
घाटंजी, २१ मे / वार्ताहर

तालुक्यातील घाटंजी तरोडा, कुर्ली, चिखलवर्धा आदी ठिकाणी वादळी पाऊस आला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

उत्तमराव पाटलांचा बंजारा क्रांतीकडून निषेध
यवतमाळ, २१ मे / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या पराभवाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमराव पाटील जबाबदार असल्याचा आरोप करीत बंजारा क्रांतीदलाच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांचा घोषणा देऊन निषेध केला आणि चौकात टायर जाळून रोष व्यक्त केला. दिग्रस येथील मानोरा चौकात निषेध करण्यात आला. याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

अ‍ॅड. लांबट यांना श्रद्धांजली
शेंदुरजना घाट, २१ मे / वार्ताहर
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. राम.एस. लांबट १९७८ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत होते. अ‍ॅड. आशा सराटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वीणा दिकुंडवार यांचे निधन
घाटंजी, २१ मे / वार्ताहर
तालुक्यातील साखरा येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयाचे शिक्षण राजू दिकुंडवार यांच्या पत्नी वीणा दिकुंडवार यांचे हृदय विकाराने निधन झाले. त्या ३५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

गुरबानी मृत्यूचा तपास पारदर्शक नसल्याचा आरोप
अकोला, २१ मे / प्रतिनिधी
भाजप नेते श्याम गुरबानी यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेला तपास पारदर्शक नसल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. गुरबानींचा एक मोबाईल गहाळ झाला असून त्याचा शोध घेण्यात आला नाही, श्वान पथकाला बोलविण्यात आले नाही, गाडीत सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तूंची माहिती देण्यात आली नाही, असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत. शिष्टमंडळात आमदार गोपीकिसन बाजोरीया, आमदार गोवर्धन शर्मा, अजहर हुसेन, दशरथ भांडे, उपमहापौर निखीलेश दिवेकर, हरीश अलिमचंदानी, सुरेंद्र शर्मा,आदी उपस्थित होते.