Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

विशेष लेख

रेडिओ डायरी..
कृष्णाच्या एव्हरेस्ट चढाईची

 

विज्ञान-तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली, तरी माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेचे आव्हान अजूनही कायम आहे. फरक इतकाच, की आता या मोहिमेतील प्रत्येक टप्प्यावरील माहिती कळू शकते.
एव्हरेस्टवीर-वीरांगनांशी संपर्क करता येऊ शकतो. एखादी दुर्घटना घडलीच, तर आपत्ती व्यवस्थापनासाठी पावलेही उचलता येऊ शकतात. एशियन ट्रेकिंगच्या ‘इको एव्हरेस्ट एक्सपीडिशन’द्वारे पहिली मराठी एव्हरेस्टवीरांगना ठरलेल्या कृष्णा पाटील हिच्या मोहिमेचे प्रमुख दावा स्टीव्हन शेर्पा यांची ही प्रातिनिधिक रेडिओ डायरी..

मित्राला निरोप..
१३ मे, दुपारी दोन वाजून आठ मिनिटे.

तुमच्याशी बराच काळ संवाद साधू न शकल्याबद्दल प्रथम दिलगिरी. घटनाच तशी होती. आमचे सहकारी लाखपा निरू शेर्पा यांचा हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला! गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही या हिमशिखरांच्या राज्यातील बेभरवशी कारभार अनुभवीत आहोत. परंतु, त्यामध्ये आमचाच एक सहकारी हिरावून घेतला जाईल, याची कल्पनाही केली नव्हती. एव्हरेस्टच्या ‘बेस कॅम्प’कडे कूच करताना ६ मे रोजी निरू ‘धारातीर्थी’ पडला. आमच्या अन्य दोन सहकाऱ्यांना त्या ५० फुटांच्या हिमलाटेमधून वाचविण्यात यश आले, हीच काय ती समाधानाची बाब. निसर्गाच्या या रुद्रावताराच्या वेळेसच भारतामधील नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंगचे पथक त्याच दिशेने कूच करीत होते. त्यांना आम्ही लगेचच संदेश देऊन धोकादायक परिस्थितीची कल्पना दिली.
त्यापुढील तीन दिवस आम्ही निरूचा शोध घेतला, पण व्यर्थ. इको एव्हरेस्ट मोहिमेला २००७ साली प्रारंभ केला, त्या वेळेपासून निरू आमच्याबरोबरच होता. एव्हरेस्टच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल अजूनही आठवते. आमच्या या मित्राला भावपूर्ण निरोप.
असो. आता निसर्ग पुन्हा शांत झाला आहे. यापुढील काळातही तो तसाच राहील, अशी आशा.

आता लक्ष्य एव्हरेस्ट..
१७ मे, सकाळी ११ वाजून २७ मिनिटे.

गेले काही दिवस आम्हा सर्वासाठीच बिकट होते. पुन्हा सर्व बळ एकवटून लक्ष्यपूर्तीसाठी मनोधैर्य उंचाविण्याचे आव्हान होते. तुम्ही दिलेल्या धीराबद्दल शतश: आभार.
आता वातावरण चांगले झाले आहे. वाऱ्याचा वेगही कमी होत आहे नि बर्फसुद्धा ‘सुस्तावला’ आहे. एव्हरेस्टच्या लक्ष्यपूर्तीसाठी यापेक्षा अधिक चांगला ‘मुहूर्त’ मिळणार नाही. नाऊ दी फायनल पुश!
पथकामधील १९ जणांची आम्ही दोन गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिला गट २१ तारखेला, तर दुसरा २३ तारखेला चढाई करणार आहे. पहिल्या गटाने (त्यामध्ये कृष्णाचा समावेश होता) बेस कॅम्पवरून आज पहाटे पाच वाजता कूच केली. २० मे रोजी अखेरच्या चौथ्या कॅम्पला ते पोचतील. त्यानंतर अंतिम चढाई केली जाईल. निक, बडी, हेन्री, युरा आणि कृष्णाला त्यासाठी शुभेच्छा!
एव्हरेस्टवर विश्वभरातील पर्यावरणप्रेमींच्या वतीने आम्ही पवित्र ‘भुम्पा’ उभारणार आहोत. पृथ्वीदेवीला पुन्हा पूर्वीसारखे सौंदर्य प्राप्त करून देण्याची बुद्धी नराधम मानवाला मिळावी, यासाठी हा ‘खटाटोप’ आहे.

समिट पुश.. पहिला गट साऊथ कोलकडे
२० मे, सायंकाळी सहा वाजता.
गेल्या सहा आठवडय़ांच्या कष्टप्रद आणि अतिशय भावनिक मोहिमेचे आता अखेरचे काही क्षण. ‘वुई आर ऑलमोस्ट देअर!’ आत्ताच पहिल्या गटाबरोबर असलेल्या आपा शेर्पाशी बोलणे झाले. साऊथ कोलवर निक, युरी आणि कृष्णा; सर्वजण सुखरूप आहेत, असा त्याचा निरोप होता.
पहिला गट या कॅम्पवर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. वास्तविक, नियोजित वेळेपूर्वीच त्यांनी ही कामगिरी केली. या पथकाच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीचाच हा चमत्कार आहे. जेवण झाल्यानंतर आता उद्याच्या अंतिम चढाईची तयारी. काही तासांचीच झोप त्यांना मिळेल. त्यानंतर कृष्णा, ग्यालू आणि पसंग तेंबा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कूच करतील. कृष्णा सर्वप्रथम मार्गस्थ होईल. पथकामधील इतर सदस्य नऊ वाजण्याच्या सुमारास साऊथ कोलला निरोप देतील.
उद्या सकाळी सूर्याची किरणे त्यांच्यावर पडतील. ती नेहमीप्रमाणे माथ्यावरील नभातून नव्हे, तर डोळ्यासमोर असलेल्या क्षितिजावरून! ऑल दी बेस्ट!!

दे आर ऑफ..
२० मे, रात्री सव्वानऊ वाजता.

आत्ताच थुक्तेन दोर्जाशी बोलणे झाले. पूर्वीच्या नियोजनाऐवजी आता सर्वच गट एकत्रितपणे चढाई करणार आहेत. कृष्णाही त्यांच्यासमवेत आहे. आपा त्यांचे नेतृत्त्व करीत असून हवामानाचीही साथ आहे.

अ‍ॅट दी साऊथ समिट..
२१ मे, पहाटे तीन वाजून पाच मिनिटे.

आत्ताच निरोप आला.. आपाचा ‘हेडलाईट’ अखेरच्या टप्प्यावर आहे. आता काही तासांमध्येच ती गोड बातमी मिळेल.

हिलरी टॉपवर..
२१ मे, पहाटे चार वाजून दहा मिनिटे.

इको एव्हरेस्ट टीम अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी हिलरी टॉप गाठला आहे. त्यांच्या पाठोपाठ निक, कृष्णा, ग्यालू, पसांग आणि फुर्बा कूच करीत आहेत. आता एका तासाचेच अंतर आहे.

एव्हरेस्ट गाठले!!!
२१ मे, सकाळी सात वाजून १० मिनिटे.

युरी, थुकतेन दोर्जी, निमा यांनी सहा वाजण्याच्या सुमारास शिखर सर केले. त्यापाठोपाठ सात वाजता कृष्णा, ग्यालू, पसांग टेंबा हे एव्हरेस्टवर दाखल झाले! वुई आर एक्सार्यटेड!! एव्हरेस्ट गाठले!!!

आपा शेर्पा झाला १९ व्यांदा एव्हरेस्टवीर
२१ मे, सकाळी साडेआठ वाजता.

आत्ताच आपाशी बोललो. त्याचे अभिनंदन केले. तो १९ व्यांदा एव्हरेस्टवीर झाला आहे! त्याचाच विक्रम मोडीत काढून. चढाईनंतर लागलेला दम आणि अत्यानंदामुळे त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. पण, जे काही तोडकेमोडके संभाषण झाले, ते असे.. ‘इथे आम्ही बरोबर आणलेल्या सर्व झेंडय़ांना आणि भुंपाला प्रणाम केला. आता आम्ही सुमारे अर्धा तास शिखरावर राहू. इथून दिसणारे दृश्य कॅमेराबंद करीत आहोत. त्याचप्रमाणे या अविस्मरणीय अनुभवाचा प्रत्येक क्षण साठवून ठेवत आहोत. इथे खूपच, जणू बर्फाहूनही अधिक थंड हवामान आहे. ‘विश अस ऑल दी बेस्ट फॉर सेफ कमबॅक.’

पुणे ते एव्हरेस्ट..
मातृत्वाची ‘हॉटलाइन’

कृष्णाच्या मोहिमेदरम्यान प्रत्येक टप्प्यावर सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यात येत होता. त्याची माहिती लगेचच एशियन ट्रेकिंग संस्थेच्या संकेतस्थळावर ब्लॉगच्या माध्यमातून प्रसारित केली जात होती. पुण्यातील औंध उपनगरामधील त्या मातेचे डोळे कायम या ब्लॉगवरच होते.. आणि प्रस्थापित झाली होती पुणे ते एव्हरेस्ट अशी मातृत्वाची ‘हॉटलाइन’. संकेतस्थळावरील ‘पोस्टिंग’वर कृष्णाची आई रंजना यांची प्रत्येक कॉमेन्ट त्याचीच साक्ष देणारी ठरली.
पाच मे रोजी पहिल्या गटातील सदस्य एव्हरेस्टवर पोचले होते. त्यामध्ये प्रामुख्याने मार्ग ठीक आहे की नाही, हे तपासणारे शेर्पा होते. त्या दिवशीच्या ब्लॉगवर रंजना लिहितात.. हाय दावा. अंतिम टप्प्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. या चढाईसाठी कृष्णा सज्ज असेल, अशी आशा आहे. एव्हरेस्टवर जाणे हे तिचे स्वप्न होते. या मोहिमेमध्ये तुम्हा सर्वाची तिला मोलाची मदत झाली आहे. त्याबद्दल धन्यवाद.
आता दुपार झाली आहे. तुमच्याकडून काहीच खबर नाही. तुम्ही बिझी दिसताहात. कृष्णाकडूनही काही संपर्क नाही. माझी ‘लिट्ल कृष्णा’ कशी आहे? तिचे डोके दुखत होते. ते थांबले असावे. तिचा एखादा फोटो आहे काय? तिला पाहण्याची खूप इच्छा आहे. तुमची आणि तिची काळजी घ्या.
१३ मे रोजी निरूच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर रंजना यांच्या काळजाचा ठोकाच चुकला असणार. त्यांच्या पोस्टिंगवरून त्याची प्रचीती येते. त्या लिहितात.. तुम्हा सर्वाच्या खुशालीबद्दल प्रार्थना. टेक केअर अ‍ॅण्ड गॉड ब्लेस. माझ्या ‘लिट्ल कृष्णा’ला खास निरोप.. तिला सांगा, काळजीपूर्वक चढाई कर. घाई करू नको. संयम बाळग. ‘मिस हर अ लॉट!’
शाळेत जाताना दप्तरात सर्वकाही घेतले आहे ना, अशी खातरजमा करणाऱ्या आईप्रमाणे १७ मे रोजी अंतिम टप्प्यापूर्वी रंजना यांनी ‘लिट्ल कृष्णा’ला सूचना केल्या.. तुम्हा सर्वाना शुभेच्छा. जाण्यापूर्वी कृष्णाने सर्व गोष्टींचा रुटीन चेक-अप् केला असेलच. तिची काळजी घ्या. तिच्या प्रगतीबद्दल माहितीही कळवा. तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी! पण, तिची काळजी वाटते. रात्री साडेबारा वाजता त्या लिहितात.. एक छोटासा प्रश्न. कृष्णाचे एकही छायाचित्र का पाठविले नाही? तुम्ही सर्वच गडबडीत असणार. पण, एव्हरेस्टवर पोचल्यानंतर तिची खूप छायाचित्रं काढा. त्रास दिल्याबद्दल सॉरी! पण काय करू.. मिसिंग हर अ लॉट!!
कृष्णाने एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यानंतर तर रंजना यांचा आनंद गगनात नव्हे, एव्हरेस्टवरही मावेनासा झाला! सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोस्ट केलेल्या त्या गोड बातमीच्या ब्लॉगला उत्तर देताना त्या लिहितात.. वॉव! ग्रेट न्यूज. माय लिट्ल कृष्णा.. अभिनंदन. यू डिड इट! संपूर्ण देशाची मान आज तू अभिमानाने उंचावलीस. ग्यालू आणि पसंग तुमचे लाख-लाख धन्यवाद. तुमच्या सहकार्याशिवाय कृष्णाचे हे ऐतिहासिक यश शक्यच नव्हते. थँक यू दावा शेर्पा. सर्वाचे अभिनंदन!!

कचरामुक्ती.. एव्हरेस्टवरील!
जागतिक तापमान वाढीबरोबरच एव्हरेस्ट मोहिमांच्या वाढत्या संख्येमुळे हिमालयाच्या कुशीतील पर्यावरण धोक्यात आले आहे. साहस करण्याच्या नादातील बेजबाबदारपणामुळे एव्हरेस्ट मोहिमा या ‘एव्हरेस्ट अतिक्रमण मोहिमा’ ठरत आहेत. नेपाळमधील काठमांडू येथील एशियन ट्रेकिंग एक्सपीडिशन्स या संस्थेच्या वतीने गिर्यारोहणातील या सर्वोच्च शिखराचे आव्हान कवेत घेतानाच पर्यावरण रक्षणाच्या मोहिमांनाही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामधूनच दोन वर्षांपूर्वी ‘इको एव्हरेस्ट’ मोहिमेला प्रारंभ झाला.
‘एशियन ट्रेकर्स’चे व्यवस्थापकीय संचालक दावा स्टीव्हन शेर्पा यांनी प्रदूषणमुक्त एव्हरेस्ट मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. २००७ साली त्यांनी एव्हरेस्टवर चढाई केली होती. त्यानंतर हिमालयाच्या परिसरातील प्रदूषणावर धडक कृती मोहीम हाती घेण्याचे त्यांनी ठरविले. तापमानवाढीसारख्या जागतिक धोक्याबरोबरच हिमनग वितळून येणाऱ्या पुरांविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी या मोहिमांची आखणी केली. त्यानुसार गेल्या वर्षी पहिली ‘इको एव्हरेस्ट’ मोहीम यशस्वी करण्यात आली. त्याचप्रमाणे हिमालयामध्ये आपली साहसवृत्ती शमविण्यासाठी येणाऱ्या गिर्यारोहकांच्या स्वच्छंदीपणाला आळा घालण्याबरोबरच तेथील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतुदी करण्यासाठी त्यांनी लढा उभारला. त्यासाठी पर्यावरण रक्षणविषयक धोरणे व मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश असलेला काठमांडू करार गेल्या वर्षी जाहीर करण्यात आला. आता या परिसरातील सर्व गिर्यारोहण मोहिमा आणि तेथील स्थानिक जनतेशी संबंधित कोणतीही घडामोड या काठमांडू करारानुसार पडताळून पाहिली जात आहे.
हिमनग वितळून येणारे पूर आणि त्यापासून स्थानिक जनतेची होणारी हानी रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्यासाठी जनजागृती व निधी संकलन, एव्हरेस्टसह हिमालयामध्ये काढण्यात येणाऱ्या मोहिमांच्या माध्यमातून होणारे मानवनिर्मित प्रदूषण थांबविणे, त्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणे, स्थानिक नागरिकांच्या पर्यावरणीय हक्कासाठी लढा उभारणे, एव्हरेस्टसह संपूर्ण हिमालयामधील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जगभर जनजागृती करणे आणि निधी संकलन करणे, अशी उद्दिष्टे या चळवळीने ठेवली आहेत. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून इको एव्हरेस्ट मोहिमांचे आयोजन केले जात आहे.
हिमालयातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीकरिता एव्हरेस्टसारखे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणाऱ्या मोहिमेशिवाय अन्य प्रभावी पर्याय तो कोणता असणार!
चार हजार ३६८ टन कचरा!
‘इको एव्हरेस्ट’ मोहिमेच्या माध्यमातून दोन टन, म्हणजेच दोन हजार किलो कचरा जमा करण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यागणिक कचऱ्याची व्याप्तीही वाढतच गेली. संस्थेच्या संकेतस्थळावरील ब्लॉगच्या माध्यमातून वेळोवेळी ‘कचरा अपडेट’ देण्यात येत होते. २५ एप्रिलला एक हजार ९१४ किलो, २७ एप्रिलला तीन हजार ३६० किलो, २९ एप्रिल रोजी तीन हजार ९३६ किलो, तर २ मेपर्यंत हिमालयाच्या कुशीत चार हजार ३६८ किलो कचरा जमा करण्यात आला.
याच मोहिमेच्या माध्यमातून ‘कॅश फॉर ट्रॅश’ ही जागतिक निधी संकलनाची चळवळ हाती घेण्यात आली आहे.