Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २२ मे २००९

विविध

भारताची मागणी धुडकावून अमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा भरघोस मदत!
तब्बल १५० कोटी डॉलरचे सहाय्य
वॉशिंग्टन, २१ मे/पी.टी.आय.
पाकिस्तानला मदत करणे थांबवा, अशी भारतातर्फे सातत्याने केली जाणारी विनंती धुडकावत पाकिस्तानला होणारी आधीची मदत तिपटीने वाढविणारा एक कायदा अमेरिकी काँग्रेसने आज संमत केला. ही मदत देताना काही कडक अटी अमेरिकेने घातल्या आहेत. परंतु ‘भारता’वर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानी भूमीचा वापर करू देऊ नये, या सूचनेतील भारत हा शब्द वगळून ‘शेजारी देश’ असा शब्द वापरण्यात आला आहे.

इराणच्या नव्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान पाकिस्तानने पुरविल्याचा इस्रायलचा आरोप
जेरुसलेम, २१ मे/पी.टी.आय.
२००० कि. मी. अंतरापर्यंत मारा करू शकणाऱ्या इराणच्या नव्या ‘सेजील-२’ या क्षेपणास्त्राचे सर्व तंत्रज्ञान पाकिस्तानने पुरविले असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. तेल-अव्हिव्ह विद्यापीठातील राष्ट्रीय सुरक्षाविषयक विभागातील यिफ्ताह शापीर याबाबत म्हणतात की इराकने ज्या पहिल्या ‘शेहाब-३’ या क्षेपणास्त्राची चाचणी केली त्यात रशिया आणि उत्तर कोरियाच्या स्कड क्षेपणास्त्रासारखे तंत्रज्ञान वापरले गेले होते.

मिकी माऊसचा बोलविता धनी वेन ऑलवाईन यांचे निधन
लॉस एन्जेलिस, २१ मे / पी. टी. आय.

अ‍ॅनिमेशनच्या साम्राज्यातील प्रसिद्ध अशा मिकी माऊसला तीस वर्षांंपेक्षा अधिक काळ आपला आवाज देऊन अजरामर करणारे वेन ऑलवाईन यांचे येथील यूसीएलए मेडिकल सेंटरमध्ये मधुमेहाच्या विकाराने निधन झाले. ते ६२ वर्षांंचे होते. १९६६ मध्ये डिस्नेमध्ये मेलरूम विभागात मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९७७ पासून कार्टून फिल्म्समधील पात्रांना आवाज देण्यास वेन ऑलवाईन यांनी सुरुवात केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजकडे ५० लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक
अहमदाबाद, २१ मे/पीटीआय

रिलायन्स इंडस्ट्रीज व रिलायन्स पेट्रोलियम यांच्या विलिनीकरणाला आक्षेप घेणारी याचिका मागे घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जयेंद्र शाह व त्याचा साथीदार दिलीप मोटवानी या दोघांना अहमदाबाद क्राईम ब्रँचने बुधवारी अटक केली. या दोन आरोपींना स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पुढील वाटचालीबाबत मोदी यांचे मौन!
पालनपूर, २१ मे/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि रालोआला आलेले अपयश तसेच गुजरातमध्ये किंचित का होईना, भाजपचे कमी झालेले मतदानाचे प्रमाण याविषयी तसेच आपल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज निवडणुकीनंतरच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात मौन बाळगणेच पसंत केले.

‘तालिबानऐवजी केवळ भारतावर लक्ष केंद्रीत करणे पाकिस्तानच्या स्थैर्यासाठी धोकादायक’
वॉशिंग्टन, २१ मे/पी.टी.आय.
तालिबान आणि अल-काईदा या संघटनांच्या दहशतवादापेक्षा केवळ भारताला मुख्य शत्रू समजण्याचे सत्र पाकिस्तानने पुढच्या काळातही सुरू ठेवल्यास पाकिस्तानचे स्थैर्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा अमेरिकेची प्रमुख गुप्तचर संघटना सीआयएने पाकिस्तानी नेत्यांना दिला आहे. सीआयएचे संचालक लिऑन पानेट्टा यांनी पाकिस्तानी नेत्यांनी दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या आदिवासी भागातील तालिबान आणि अल-काईदाचे जाळे उद्ध्वस्त करावे असे ठामपणे सांगितले.

ज्येष्ठ मंत्र्याकडून डाव्यांना घरचा आहेर
कोलकाता, २१ मे / पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीतील डाव्यांच्या पराभवासाठी भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि जनतेच्या जमिनी हडपणे हीच दोन प्रमुख कारणे आहेत, असा घरचा आहेर पश्चिम बंगालचे जलस्रोत विकास मंत्री व ज्येष्ठ भाकप नेते नंदगोपाल भट्टाचार्य यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. डाव्या सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यानेच असे विधान केल्यामुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ माजली आहे.

ए. आर. रहमानने बनविले ‘बीएसएफ’साठी थीम साँग!
नवी दिल्ली, २१ मे/पीटीआय

‘हम सीमा सुरक्षा बल..वीरों का है ये दल’ हा मुखडा आहे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) थीम साँगचा. हे गाणे तयार केले आहे ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान याने. ‘जय हो’ या गाण्याने इतिहास घडविणाऱ्या रहमानने कोणत्याही निमलष्करी दलासाठी अशाप्रकारे प्रथमच संगीतसाज चढविला आहे.

अटकेतील रशियन मुलीने धारण केले मौन..
पणजी, २१ मे/पी.टी.आय.

पारपत्रविषयक नियमांचा भंग आणि गोव्यामध्ये मुदतीपेक्षाही अनधिकृत वास्तव्य या कारणांमुळे अटक करण्यात आलेली रशियन मुलगी तुरुंगाधिकाऱ्यांसमोर काही बोलायलाच तयार नाही. व्हायोलेट्टा गासान्व्होवा (२५) असे या रशियन मुलीचे नाव असून सध्या ती मध्यवर्ती अगुडा तुरुंगात चार ऑगस्ट २००८ पासून अटकेत आहे. मागील १० महिन्यांत तुरुंगाधिकाऱ्यांशी ती एकही शब्द बोलली नसून तिच्या वकीलांच्या मते तिला प्रचंड मानसिक धक्का बसला असल्यानेच ती अशी वागत आहे. ती काही बोलावी म्हणून मध्यंतरी रशियाहून तिच्या मातेलाही बोलावण्यात आले. मातेला पाहिल्यानंतर तरी ती बोलू लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही व्यर्थ ठरली आहे. त्यानंतर एक महिना तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडूनही उपचार करण्यात आले. मात्र त्याचाही काही उपयोग झालेला आढळत नाही.

उत्तरेतील उष्म्याच्या लाटेमध्ये दिलासा नाही
उत्तरप्रदेशात गुरुवारच्या पावसामुळे २० ठार
नवी दिल्ली, २१ मे/पी.टी.आय.

उत्तरप्रदेशात सर्वत्र गुरुवारी वादळी वाऱ्यांसह झालेल्या सोसाटय़ाच्या पावसामुळे एकूण २० जणांचा बळी गेला. राज्यात या पावसामुळे बहुतांश भागाला मोठा दिलासा मिळाला असला तरी झांशी येथे तापमान मात्र ४३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. उत्तरप्रदेशात पाऊस होऊनही उत्तरी राज्यांमधील उष्माच्या लाटेमध्ये कोणताही फरक पडला नसून हरयाणा, राजस्थान ही राज्ये प्रचंड उष्णातामानाच्या दणक्याखील होरपळतच आहेत. हरयाणातील हिस्सार येथे तर ४५.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. राजस्थान राज्यात बिकानेर, गंगानगर, कोटा, जोधपूर, चुरू ही शहरे वाढत्या उष्माच्या लाटेने ग्रस्त असून दिल्लीतही पारा ४१.८ अंश सेल्सिअस इतका चढला होता.

सोमनाथ चटर्जी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली, २१ मे / वृत्तसंस्था

छातीत दुखू लागल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना आज दुपारी उपचारार्थ लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले. छातीत दुखू लागल्याची तक्रार केल्यानंतर चटर्जी यांना तातडीने लष्कराच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.