Leading International Marathi News Daily
शनिवार, २३ मे २००९
  वाळवण-संस्कृती
  ‘सुका’ मेवा
  वाळवणांचा वाणवसा
  ...पण बोलणार आहे!
जनरेशन ‘आर’
  व्ह्यू पॉइंट
स्वातंत्र्याचं बिगुल
  विज्ञनमयी
  वाळवणी वैविध्य
  काळ सुखाचा
शब्दांचे खेळ
  चिकन सूप...
सुझीची पराकाष्टा
  कुर्रम् कुर्रम् ची कथा!
  कवितेच्या वटेवर...
ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे
  ललित
वाळवणाची आंघोळ
  गैरसंमजांचे साखळदंड
  तारवाली भिंगरीची कसरत
  घटि थोडेसे उदक घालिजे..
  जोशिली बाइकटूर!

 

वाळवणी वैविध्य
मुबलक सौरऊर्जेचा पुरेपूर वापर करण्याचा मंत्र जपणाऱ्या वाळवणी खाद्यसंस्कृतीतील वैविध्याचा अंदाज यावा, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण वाळवणी खाद्यप्रकार कळवा, या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यापैकी या काही खुमासदार पदार्थकृती..

आलू-भुजिया (उपवासाचा चिवडा)
साहित्य - बटाटे, तळण्याकरिता एक किलो तेल, शेंगदाणे पाव किलो, मीठ चवीपुरते, मिरच्या ८-१०, कडीपत्ता, काजू तुकडा- अर्धा वाटी.
कृती - बटाटे अर्ध-कच्चे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून किसून द्यावेत. हा कीस दोन- तीन दिवस उन्हात वाळवून घ्यावा. अगदी कडकडीत सुकल्यावर हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावा. कढईत तेल चांगलं तापू द्यावं. चिवडा तळण्याच्या मोठय़ा चाळणीत मूठ-मूठभर बटाटय़ाचा कीस घालून तळून घ्यावा. तो नंतर पेपर नॅपकिनवर टाकावा. नंतर

 

शेंगदाणे चाळणीत घेऊन ते खरपूस तळून घ्यावे. नंतर कडीपत्ता तळून घ्यावा. काजू तळून घ्यावे. शेवटी मिरच्यांचे बारीक तुकडे तळून घ्यावे. हे सर्व मिश्रण एका मोठय़ा भांडय़ात घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. आलू-भुजिया खाण्यासाठी तयार आहे.
- सोनाली वैती, वसई

भरलेल्या लहान मिरच्या

साहित्य- फुगीर लहान मिरच्या, १००ग्रॅम धणेपूड, ५० ग्रॅम मेथीपूड, २५ ग्रॅम राईपूड.
कृती- थोडासा देठ ठेवून मिरच्या मधोमध कापून घ्याव्यात. धणेपूड, मेथीपूड, राईपूड व एक चमचा हिंगपूड, चवीपुरते मीठ एकत्र करून त्यावर बेताने मोहरी व हिंग घालून केलेली फोडणी घालावी. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंबट दही घालून ते मिश्रण मिरच्यांमध्ये भरावे. या मिरच्या घट्ट विणीच्या सुपात ठेवाव्यात व उन्हात वाळवाव्यात.
- शुभा शिरोळकर, गोरेगाव पूर्व

गाजराचे सांडगे

साहित्य - एक किलो गाजर, वीतभर लांबीचे दोन मुळे, मध्यम आकाराची कच्ची पपई, अंदाजे १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, अर्धा किलो टोमॅटो (चांगले पिकलेले) ५० ग्रॅम तीळ. धणे, जीरे पावडर आवडीप्रमाणे. दोन वाटय़ा चिरलेली कोथींबीर , मीठ, हळद, तिखट, हिंग.
कृती - मोठय़ा पातेल्यात जाड किसणीवर सकाळी लवकरच गाजर, मुळे, पपई किसावीत. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथींबीर घालावी, धणे- जिरे पुड, मीठ- हिंग, हळद- तीळही घालावे. टोमॅटो बारीक चिरून त्यात घालावेत. सर्व मिश्रण चांगले मिसळावे. उन्हे येण्यापूर्वीच प्लॅस्टिकवर हलक्या हाताने मिश्रणाचे सांडगे घालावेत. (आकार गोल पण पोकळ) टोमॅटोच्या ओलाव्यासकट सांडगे घालावे. वरून पातळ कापडाने झाकावे. दुसऱ्या दिवशी सर्व सांडगे उलटावेत व दिवसभर उन्हातच ठेवावेत. सांडगे वाळविण्यासाठी अंदाजे तीन दिवस लागतात. खुसखुशीत सांडगे डब्यात भरावेत.
- मीना खानझोडे, भांडुप.

अगस्तीच्या फुलांच्या देठांचे सांडगे

अगस्तीच्या फुलांची आपण भाजी किंवा भजी करतो, तेव्हा वरील जेठ आणि आतील दांडा टाकून देतो, त्याऐवजी त्याचे सांडगे करावेत. आंबट दही घेऊन त्यात धणे, जिरेपूड आणि मीठ घालावे. त्यात वरील देठं बुडवून वाळवावी. दोन दिवसांनी वाळलेली देठे पुन्हा वरीलप्रमाणे दह्यात बुडवून वाळवा.ी दोन पुटे दिल्यानंतर दोन-तीन दिवस कडक उन्हांत वाळवावी. खिचडीसोबत तळून खावी.
- प्रगती हकीम, दहिसर

ज्वारीच्या पीठाचे धापोडे

साहित्य- ज्वारीचे पीठ, तीखट, हळद, मीठ, तीळ, ओवा.
कृती- ज्वारीचे पीठ रात्री पाण्यात भिजत ठेवावे, रात्रभर ते आंबते. सकाळी पाणी उकळावे. पाण्याला उकळी आली की त्यात आंबवलेले पीठ थोडे थोडे ओतावे. पीठ उकळलेल्या पाण्यात ओतताना गुठळी होऊ देऊ नये. आंबवलेल्या पीठामध्ये तिखट, हळद, मीठ, तीळ, ओवा चवीनुसार घालावे. पीठ थोडे शिजल्यानंतर एक जाडी चादर ओली करावी त्यावर चमच्यांनी छोटे छोटे धापोडे घालावे. धापोडय़ाला कडक ऊन हवे. सायंकाळी धापोडे सुकल्यावर चादर उलटी करून त्यावर पाणी शिंपडावे व धापोडे काढावे. ते पुन्हा उन्हात सुकवावे. ते वर्षभर टिकतात. धापोडे तळून खाता येतात.
- वीणा ढोले, ऐरोली.

ज्वारीचे बिबडे (पापड)

साहित्य- एक किलो ज्वारी, २०/२५ लसणाच्या पाकळ्या, चार चमचे जिरे, चार चमचे तीळ, मीठ मोठय़ा प्रमाणात, तिखट पाऊण चमचा.
कृती- ज्वारी तीन दिवस भिजवावी. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चांगली धुवावी व मिक्सरवर दळावी. सकाळी लसूण व जिरे वाटावे. जेवढे वाटलेली ज्वारी असेल त्याच्या दुप्पट पाणी गरम करत ठेवावे.
पाणी उकळल्यावर (घाटा शिजेल अशी पातेली घ्यावी) त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घालावे. नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडावे, पीठ इडली पिठासारखे असावे. ते हलवत राहावे. पिठास फुगे फुगे आल्यासारखे वाटले की पीठ शिजले असे समजावे. मग पोळपाटावर ओला रुमाल करून त्यावर पळीभर पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापावे व उन्हात एका कपडय़ावर तो रुमाल उचलून त्यावर तो पापड हळूच ठेवावा. हे न जमल्यास पळीने कपडय़ावर ठेवावे. वाळल्यावर उलटे करून पापड काढावे व परत वाळवावे. तळून- भाजून खावे.
- सुनंदा फिरके, अंबरनाथ.

बाजरीच्या खारोडय़ा

साहित्य- अर्धा किलो बाजरी, दोन वाटय़ा ताक, मीठ, एक कांदा, दोन चमचे लसूण पेस्ट, सात-आठ बारीक चिरलेली मिरची.
कृती- बाजरी निवडून तीन-चार तास पाण्यात भिजत घाला. नंतर उपसून मिक्सरवर दळा अथवा खलबत्त्यात कांडा. मिक्सरवर केल्यास जरासे भरडेच वाटा. रात्री ताकात बाजरीचे पीठ भिजवा. रात्रभर पीठ आंबू द्या. दुसऱ्या दिवशी चार वाटय़ा पिठाला आठ वाटय़ा पाणी घ्या. गॅसवर मोठय़ा भांडय़ात पाणी उकळू द्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची व मीठ घाला. पाणी चांगले उकळल्यावर त्यात बाजरीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्या. मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरवा. जरा थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर अथवा ताटावर छोटय़ा मुगोडय़ांप्रमाणे टाका. कडक उन्हात दाने-तीन दिवस वाळवा. चांगले वाळवल्यावर कच्चे तेल व कांदा बारीक चिरून घाला. या खारोडय़ा तळत नाहीत.
- सरिता कुळकर्णी, ठाणे

साबुदाणा, बटाटा, वरी तांदूळ चकल्या

साहित्य- बटाटे एक किलो, साबुदाणा अर्धा किलो, वरी तांदूळ ५० ग्रॅम, मिरची, आलं, जिरे, मीठ चवीनुसार.
कृती- बटाटे उकडून साले काढून घ्यावीत. साबुदाणा चार तास भिजवून घ्यावा. आलं, मिरची, जिरे वाटून घ्यावे, वरी तांदूळ शिजवून घ्यावे. नंतर सर्व साहित्य एकत्र करून मळावे. चवीपुरते मीठ घालावे. चकलीच्या सोऱ्यामधून चकल्या पाडून त्या उन्हात वाळवाव्यात. गरजेप्रमाणे तळाव्यात.

वाळवणी डाळ भाजी
साहित्य- चणाडाळ, मूगडाळ समप्रमाणात, मिरची, मीठ.
कृती- चणाडाळ, मूगडाळ दोन तास भिजत घालून नंतर जाडसर वाटावी. वाटलेली मिरची व मीठ त्यात मिसळून छोटे छोटे वडे थापून ते वाळवावेत. भाजी करण्याआधी पाण्यात वडे भिजत घालून नंतर ते फोडणीला टाकावेत. पावसाळ्यात काही भागात भाज्या मिळत नाहीत किंवा त्याच त्याच भाज्यांचा कंटाळा येतो, अशा वेळी बदल म्हणून डाळ भाजी खावी.
- अनुराधा नातू, डोंबिवली.

गव्हाच्या कोंडय़ाची भाजी

गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्या दोन पाककृती-
पाककृती क्र. १- गव्हाचा ओला कोंडा लगोलग तेलावर कांदा परतून आवडीनुसार तिखट-मीठ टाकून भाजीसारखा पोळी, भाकरीबरोबर खाता येतो किंवा आजच्या जमान्यात फ्रँकीसारख्या पदार्थाचे सारण म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो. फक्त कांदा कोंडय़ाच्या बरोबरीने असावा म्हणजे तोंडात अगदीच चोथा येणार नाही. अगदीच सोपी गव्हाच्या कोंडय़ाची भाजी!
पाककृती क्र. २- पोहे चाळून भरताना खाली बारीक पोहे, कोंडा उरतो. तो फेकला जातो. मात्र हा कोंडा गव्हाच्या ओल्या कोंडय़ात मिसळावा. चवीनुसार लाल तिखट, मीठ घालावे. मिश्रण एकत्र मळताना गरज असल्यास पाण्याचा हात लावावा. व त्याचे सांडगे घालून वाळवावे. जे कालांतराने वरीलप्रमाणे कांद्याच्या फोडणीवर घालून भाजीसारखे खाता येतात. अथवा पोह्य़ाचा कोंडा व गव्हाचा ओला कोंडा एकत्र मळून चवीनुसार तिखट-मीठ घालून ताटात व्यवस्थित थापून घ्यावे. त्याला पुरेशी वाफ देऊन कोथिंबिरीच्या वडय़ांप्रमाणे वडय़ा पाडाव्यात.
तेलात तळून खाल्ल्यास अतिशय कुरकुरीत लागतात. यालाच खारोडय़ा/ खारवडय़ा असेही म्हणतात.
- डॉ. वसुधा विश्वनाथ पवार, कल्याण.

सांबाराचे गोळे

रात्री चण्याची डाळ भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटावी. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिऱ्याची पूड, धण्याची पूड घालून लहान बोराएवढे गोळे प्लॅस्टिकवर घालून खडखडीत होईपर्यंत वाळू द्यावेत.
- कुसुम गुप्ते, मुलुंड.

ज्वारीच्या लाह्य़ांच्या वडय़ा

साहित्य - ज्वारीच्या लाह्य़ा, जिरे, थोडासा हिंग, दही, मीठ.
कृती - लाह्य़ा, जिरे, हिंग, मीठ, लाह्य़ा भिजतील एवढे दही घ्यावे. (दही सायीचे घेऊ नये) ज्वारीच्या लाह्य़ांमध्ये कचकच असते म्हणून त्या पाण्यातून काढून घ्याव्यात, म्हणजे त्यातली वाळू पाण्यात निघून जाते. हे सर्व मिक्स करून त्याच्या बारीक बारीक वडय़ा कराव्यात व उन्हात वाळवाव्यात. वाळल्यावर त्या बरणीत भरून ठेवणे. तळून व न तळाता खायलाही या छान लागातात.
- उज्ज्वला जोशी, नागपूर.

भरलेली भेंडी

कृती - भेंडीच्या वरचा भाग न चिरता चार पात्या करून घ्याव्यात. म्हणजे न सुटता चारही भाग एकत्र राहतील. या सर्वाना दही, मीठ, हळद (आवडत असल्यास धने, जिरेपूड दह्य़ात मिसळून) लावावी. सर्व जिन्नस व्यवस्थित लावून झाल्यावर उन्हात वाळवावे व डब्यात नीट भरून ठेवावेत. हवे तेव्हा थोडय़ा तेलात तळून घ्यावेत.
- शशिकला प्रभावळकर, कोल्हापूर.

कासाळूचा सांडगा

कोकणात नारळी-पोफळीच्या बागांत कासाळू सर्रास सापडते. भाजीच्या किंवा वडीच्या अळूपेक्षा हे वेगळे असून त्याची पाने तीन-चार फूट लांब, रुंद वाढतात. या कासाळूच्या मुळाशी जमिनीलगत दोन-तीन फूट लांब, पाइपसारखा कंद वाढतो त्याचा सांडगा करतात. कंद काढल्यानंतर खाज जाण्यासाठी महिनाभर घरात तसाच ठेवावा लागतो. नंतर त्याची साले काढून जाडय़ा किसणीवर किसावा. आंबट ताकात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हिंग व पापडखार घालून ते ताक त्या किसाला चोळावे. नंतर तो कीस मोकळा मोकळा प्लॅस्टिकवर पसरून उन्हात वाळवावा. पूर्ण वाळल्यानंतर पाहिजे तेव्हा तेलात तळून घ्यावा.
- विशाखा चितळे, चिपळूण.

पातळ पोह्य़ांच्या चकल्या

साहित्य - पातळ पोहे अर्धा किलो, जिरे एक टी स्पून, धने एक टी स्पून, काळीमिरी अर्धा टी स्पून, तिखट-मीठ आवडीनुसार.
कृती - पोहे निवडून घ्या. जिरे-धणे आणि मिऱ्याची जाडसर पूड करा. पातळ पोह्य़ांवर पाण्याचा हबका मारा. सगळे मसाले मिसळा आणि ज्याप्रमाणे आपण कणीक मळतो त्याप्रमाणे मळून चकल्या पाडा. गरम उन्हात कडकडीत वाळवा. या चकल्या खुसखुशीत लागतात.
टीप : आपण यात पाण्याऐवजी ताकही वापरू शकतो.
- वैशाली विलास बागडे, नागपूर.

बाजरीचे खारवडे

साहित्य - एक किला बाजरी, अर्धा किलो तांदूळ, दोन टेबलस्पून, जिरे, तेल, मीठ.
कृती - बाजरी निवडून घ्यावी. बाजरी साधारण ओलसर करून उखळामध्ये सडून घ्यावी किंवा खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी, जेणेकरून बाजरीची साले निघून जातील. सडून घेतलेली बाजरी पाण्यात आठ दिवस भिजत घालावी. मात्र दररोज पाणी बदलावे. बाजरी भिजत घातल्यानंतर चार दिवसांनी वेगळ्या पाण्यात तांदूळ भिजत घालावेत. तांदळाचे पाणीही दररोज बदलावे. पाणी रोज बदलल्यामुळे बाजरी व तांदळाचा आंबट वास येत नाही. याप्रमाणे आठ दिवस भिजवलेली बाजरी व चार दिवस भिजवलेले तांदूळ नवव्या दिवशी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. वाटलेल्या मिश्रणात पाणी टाकून सोजीच्या चाळणीने थोडे थोडे गाळून घ्यावे. वाटलेला चीक व पाणी एकत्र करून राहिलेला कोंडा बाजूला काढावा. असा तयार केलेला चीक रात्रभर न हलवता ठेवून द्यावा. सकाळी भांडय़ात वर निवळलेले पाणी जमा होते ते टाकून द्यावे व खाली राहिलेला चीक खारवडे करण्यासाठी वापरावा. एका मोठय़ा जाड पातेल्यात एक पळी तेल गरम करून घ्यावे. त्यात जेवढा चीक असेल तेवढेच पाणी घालावे. आपल्या आवडीनुसार मीठ व जिरे टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चीक घालून एकसारखे हलवावे, जेणेकरून चिकाच्या गाठी होणार नाहीत. मध्यम आचेवर चीक चांगला शिजवून घ्यावा. नंतर आच कमी करावी. शिजवलेला चीक गरम-गरमच सोऱ्यात भरावा. लाकडी पाट किंवा प्लास्टिक कागदाला थोडा तेलाचा हात फिरवून त्यावर चकलीचा सोऱ्या वापरून चकलीप्रमाणेच खारवडे करावेत. कडक उन्हात वाळवावेत व हवे तेव्हा तळून खायला द्यावेत.
- वैशाली रवींद्र हर्णसकर, मंगळवार पेठ, भोर.

वाळवलेली कोथिंबीर

साहित्य - कोथिंबीर, मीठ, तिखट किंवा ओली मिरची.
कृती - कोथिंबीर धुवून निथळून घ्यावी. बारीक चिरावी, त्यात वाटलेली ओली मिरची किंवा लाल तिखट व मीठ घालावे. ते एकत्र करून उन्हात वाळवावे.
- प्रतिभा बिवलकर, डोंबिवली.

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

साहित्य- दोन वाटय़ा भगर, चार वाटय़ा साबुदाणा, आठ मध्यम आकाराचे बटाटे, चवीप्रमाणे तिखट, मीठ, जिरे, साखर, तीन चमचे लोणी.
कृती- रात्री साबुदाणा कोमट पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळी बटाटे उकडून घ्यावे. थंड झाल्यावर सोलावे. साधारणपणे तीन लिटर पाणी उकळत ठेवावे. त्यातील थोडे पाणी काढून बाजूला ठेवावे. भगर स्वच्छ धुवून रोळून उकळत्या पाण्यात टाकावी. भगर थोडी शिजली म्हणजे त्यात साबुदाणा टाकावा. भगर व साबुदाणा शिजत आल्यावर त्यात बटाटे किसून पसरत घालावे. हे मिश्रण सारखे ढवळून त्यात शिजत असतानाच तिखट, मीठ, जिरे, साखर व लोणी टाकावे. जर मिश्रण घट्ट वाटते तर काढून ठेवलेले पाणी हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे. गॅस मध्यम ठेवून पाच-सहा वाफा काढाव्या. चकलीच्या पिठासारखे घट्ट मिश्रण झाले की खाली उतरून ठेवावे.
चकलीच्या साच्यात आतून पाणी व तुपाचा हात लावून पाण्याच्या हाताने थोडे थोडे मिश्रण मळून घेऊन साच्यातून चकल्या काढाव्यात. प्लास्टिकवर त्या उन्हात वाळवाव्यात. तीन/चार उन्हे दाखवून हवाबंद डब्यात भराव्या. तेल किंवा तुपात तळल्यास खूप खुसखुशीत व चविष्ट होतात.
- लता पातकर

कोहळ्याचे सांडगे

अर्धा किलो उडीद डाळ सकाळी भिजवावी व रात्री मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आंबिवलेल्या पिठात पाऊण किलो वजनाच्या कोहळ्याचा कीस घालावा. त्यात सहा चमचे (मोठे) तिखट, मीठ, एक चमचा मेथीची पावडर, दोन चमचे हिंग घालून सर्व मिश्रण ढवळून घ्यावे.
प्लास्टिकच्या मोठय़ा पेपरवर चमच्याने सांडगे घालावेत. साधारणत: संध्याकाळपर्यंत ते वाळतात व प्लास्टिकपासून वेगळे होतात. नंतर ते परातीत घालून आठ ते १० दिवस कडकडीत उन्हात वाळवावेत व हवाबंद डब्यात बंद करून ठेवावेत.
हे सांडगे खोबऱ्याच्या रसाच्या आमटीत चांगले लागतात. तोंडलावणीसाठी नुसतेच तळूनही खातात किंवा तळलेल्या सांडग्याचा थोडा चुरा करून त्यात कांदा खोबरे घालून कोशिंबीर करतात.
- मैथिली नाडकर्णी, सांताक्रूझ.

साबुदाणा मिरची

थोडा साबुदाणा ताकात भिजत घालावा. तो चांगला मऊ होईपर्यंत भिजवावा. पाव किलो बुटक्या जाडय़ा मिरच्या घेऊन त्यांना मध्ये चीर द्यावी. नंतर साबुदाण्यात चवीपुरते मीठ, हिंग, हळद व जिरे पावडर घालून चांगले एकत्र करून घ्यावे. नंतर हे मिश्रण मिरच्यांत भरून उन्हात कडक होईपर्यंत वाळवाव्यात.
- सुप्रिया सतीश लाड, बोरिवली.

गवारीचे वाळवण

साहित्य- एक किलो गावरान गवार, एक लिंबू, तीळ, मीठ, एक वाटी दाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा.
कृती- बाजारातून शक्यतो बारीक गवार आणून ती प्रथम धुऊन घ्यावी. ती कोरडी झाल्यावर दाण्याच्या कुटात मिरची, तीळ, मीठ, मिरची ठेचा व लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून त्यात गवार घोळून घ्यावी. लिंबाच्या रसाने कूट ओलसर होऊन गवार छान घोळली जाते. नंतर प्लास्टिकच्या कागदावर वाळवावी. कोरडी व कडक वाळल्यावर डब्यात भरून ठेवावी. ही कडक गवार खिचडी केल्यावर पापडा-लोणच्याबरोबर तेलात तळून तव्यावर किंवा फ्रायपॅनवर परतून घ्यावी. याची गोडी अवीटच लागते.
- वैशाली चांदेकर, बदलापूर.

पातळ पोह्य़ाचे सांडगे

साहित्य- पातळ पोहे, तिखट, मीठ, लसूण, कुटलेले जिरे, तीळ, कोथिंबीर,थोडेसे ताक.
कृती- पातळ पोहे १५ मिनिटे आधी धुऊन ठेवावेत. नंतर त्यात तिखट, मीठ, तीळ, कोथिंबीर, लसूण व कुटलेल जिरे, थोडेसे ताक घालून एकत्र मिसळावे व त्याचे सांडगे घालावेत. दोन दिवस उन्हात सुकल्यावर तळावेत.
- अनुराधा मारावार, ठाणे.

कलिंगडाचे सांडगे

उन्हाळ्यात कलिंगडाचा मोसम असतो, त्यामुळे स्वस्त आणि मस्त सांडगे बनवणे सोपे जाते.
कृती - कलिंगडाच्या फोडी खाऊन झाल्यावर सुरीने त्याचा पांढरा भाग कापून घ्यावा. धुवून त्या पांढऱ्या भागाचे छोटे छोटे तुकडे करून त्याला हळद, मीठ व गरम मसाला चोळून ते तुकडे चटईवर कडक उन्हात पसरावे. आठ ते १० तास कडक उन्हातच वाळवावेत. या सांडग्यांना जरासुद्धा मळभ पडलेले चालत नाही, तसे झाल्यास सांडगे रापतात (काळे पडून खराब होतात). असे कुरकुरीत सांडगे वर्षभर तळून खाण्यास मजा येते.
- शैलजा श्री. डोंगरे, दादर.

आवळा पेठा

साहित्य - आवळे, साखर.
कृती - आवळे पाणी न घालता प्रेशरकुकरमध्ये ठेवून ३ शिट्टय़ा करणे. थंड झाल्यावर पाकळ्या मोकळ्या करणे. फोडींच्या दुप्पट साखर मोजून बाजूला ठेवणे. त्यापैकी अर्धी साखर आणि फोडी एकत्र करून तीन/चार दिवस ठेवाव्यात. दिवसातून तीन/चार वेळा हलवावे. चाळणीवर फोडी घालून निथळून घेऊन उरलेली साखर घालून परत तीन दिवस ठेवणे. तीन/चार वेळा दिवसातून हलवणे. चौथ्या दिवशी परत चाळणीवर निथळणे. दोन/तीन तासांनी उन्हात वाळवावा. आवळा पेठा तयार.
दोन्ही वेळचे निथळलेले पाणी आणि थोडी साखर यांना उकळी आणणे. आवळा सरबत तयार. सरबतात थंड पाणी व किंचित मीठ घालून घेणे.

कोयीची सुपारी
साहित्य- पिकलेल्या आंब्याच्या सात/आठ कोयी, शेंदेलोण, पादेलोण.
कृती- आंब्याचा रस काढून उरलेल्या कोयी तीन दिवस उन्हात वाळवाव्यात. या कोयी उभ्या धरून फोडाव्यात. आतील गर घेऊन त्यात तो बुडेल इतके पाणी व तीन चमचे मीठ घालून कुकरमध्ये २ शिट्टय़ा कराव्यात. थंड झाल्यावर पाणी निथळून घ्यावे. कोयींचे पातळ काप करावेत. त्याला शेंदेलोण, पादेलोण लावून उन्हात वाळवाव्या.
अनुराधा नाईक, कोल्हापूर.

आंब्याचे पीठ
कृती - घट्ट व ताज्या कैऱ्यांच्या साली काढून त्या किसाव्या. नंतर तो कीस उन्हात वाळत टाकावा. चांगले वाळल्यावर ता किस दळून पीठ करून बाटलीत भरून ठेवावे. पदार्थामध्ये ही पूड उपयोगात पडते. ती पुष्कळ दिवस टिकते.
- जयश्री अधिकारी, ठाणे.

रखिया बडी

साहित्य- अर्धा किलो उडीद डाळ बिन सालाची, पांढरा कोहळा, (पापडकरता वापरतात तो. याला छत्तीसगडमध्ये रखिया म्हणतात), चवीपुरते मीठ.
कृती- उडीद डाळ पाच-सहा तास भिजत घालावी. नंतर ती वाटावी. त्यात दीड वाटी कोहळ्याचा कीस, थोडे मीठ घालून त्याच्या तळहातावर गोल बिस्किटाएवढय़ा वडय़ा करून उन्हात वाळवाव्या. या मिश्रणांत कोहळ्याचा कीस घालण्याऐवजी मेथीची भाजी चिरून (एक वाटी) घालता येते. या वडय़ा तेलात परतून कांदा, टॉमेटोच्या रश्श्यात घालाव्यात. ही छत्तीसगडची पाककला आहे.
- मंगला नाफडे, नागपूर.

फणसाचे पापड

साहित्य - २०/२५ पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे, ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ, दोन टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून मिरपूड, मीठ, हिंग.
कृती - बरक्या फणसाचे गरे आठळ्या काढून मिक्सरमधूान काढावे. गराच्या दुप्पट पाणी घालून चांगले शिजवावे. त्यात जिरे, हिंग, मीठ घालावे. गर मोजून त्यात तेवढेत तांदळाचे पीठ घालावे व पापड लाटून, वाफवून (उकड देऊन) वाळवावेत.
- रंजना राजे, दादर.

चण्याचे गोळे

साहित्य - २५० ग्रॅम चणाडाळ, २५० ग्रॅम उडीद डाळ, एक टे. स्पून धणे-जिरे पावडर, एक टी. स्पून हिंग, एकटे. स्पून लसूण पेस्ट, दोन टे. स्पून मिरची पेस्ट, दोन टे. स्पून प्रत्येकी पुदिना व कोथिंबीर पेस्ट, दोन टे. स्पून मीठ.
कृती - दोन्ही डाळी रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये वाटाव्या. (एकदम बारीक करू नयेत) त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले एकत्र करून कडक उन्हात प्लॅस्टिकवर बारीक बारीक गोळे करून वाळत घालावेत. कडकडीत सुकल्यावर आवश्यकतेप्रमाणे आमटीत घालावे.
- लेखा तोरसकर, नौपाडा, ठाणे.

चटपटे पापड

साहित्य - एक जुडी आंबट चुका, एक वाटी पातळ पोहे, एक इंच आले, एक चमचा जिरेपूड, एक चमचा धणेपूड, चार हिरव्या मिरच्या, मीठ, तांदळाचे पीठ.
कृती - पोहे कोरडेच भाजा. गार झाल्यावर त्याची पावडर करा. चुका, मिरची, आलं मिक्सरमधून काढा. त्यात धनेपूड, जिरेपूड, मीठ, पातळ पोह्य़ाची पावडर घाला. आवश्यक तेवढे तांदळाचे पीठ घालून मळा व लाटून उन्हात सुकवावेत. तळल्यावर वरून चाट मसाला घाला.
- वर्षां प्रदीप दोभाडा, बिबवेवाडी, पुणे.

सुकविलेली शिंपल्यातील माष्टे

साहित्य - शिंपल्या, मीठ.
कृती - शिंपल्या स्वच्छ धुवून एका भांडय़ात घेऊन अगदी थोडे पाणी घालावे. (शिंपल्यांना नंतर पाणी सुटते) शिंपल्यांचे तोंड उघडेपर्यंत उकडून घ्याव्या. थंड झाल्यावर सगळ्या शिंपल्यातील माष्टे काढून एका मोठय़ा ताटात किंवा प्लास्टिकवर ठेवावीत व थोडेसे मीठ लावून कडकडीत उन्हात खडखडीत होईपर्यंत वाळवावीत व डब्यात भरून ठेवावी. पावसाळ्यात मासे मिळत नाहीत तेव्हा ती वापरता येतात. नुसते भाजूनही खायला छान लागतात.
- नीता सामंत, विलेपार्ले.

रव्याच्या कुरडया

साहित्य- पाव किलो रवा, मीठ.
कृती- एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये रवा व मीठ घालून तो शिजवावा. रवा शिजल्यावर तो थोडा थंड झाल्यावर साच्यामध्ये धालून कुरडया पाडाव्यात व दोन दिवस उन्हात वळवाव्यात.
- अर्पिता मोडक, मुंबई.

मिक्स भाज्यांचे सांडगे
कृती- कच्ची पपई, गाजर, दुधी, लालभोपळा बारीक किसणीने किसून त्यामध्ये तीखट, हळद, मीठ, तीळ घालून छोटे छोटे वडे थापून उन्हात वाळवावेत व नंतर तळावेत.
- वैशाली खेडकर, बांद्रा, पश्चिम

कोकम जीरा गोळी

साहित्य- पाव किलो कोकम, दोन चहाचे चमचे जिरे व पिठीसाखर, मीठ चवीनुसार.
कृती-अर्धा कप कोमट पाण्यात कोकम भिजत घालावे. अध्र्या तासाने त्यातले पाणी (सरबतासाठी) काढून घ्यावे. भिजलेली कोकमं, जीरे, मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. मिश्रणाच्या वाटाण्याएवढया गोळ्या करून त्याला दोन उन्हे दाखवावीत. त्या ओलसर असताना पिठीसाखर लावून पुन्हा वाळवून घ्याव्या.
- अंजली मिराशी, ऐरोली.

रताळ्याचे सांडगे

साहित्य-एक किलो पांढरी किंवा लाल-पिवळसर रताळी.
कृती- रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्यावीत. कुकरमध्ये चाळणीत ठेवून किंवा नुसत्या पाण्यात उकडावी. थोडी गार झाल्यावर सालं काढून छान कुस्करून घ्यावीत. कणकेप्रमाणे मळून घ्यावे. नंतर शेवगा असल्यास त्यांच्या भांडय़ात एक एक गोळा घालून वरून दाब द्यावा. प्लास्टिकवर शेवाचा पसरट गुच्छ टाकावा व लगेच उन्हात स्वच्छ पांढऱ्या चादरीवर वाळवण्यास टाकावा. दोन-तीन दिवस उन्हात वाळवल्यावर पूर्ण वाळलेले गुच्छ बंद पत्र्याच्या डब्यात ठेवाव्यात, म्हणजे त्या नरम होत नाहीत. पाऊस सुरू झाला की हे सांडगे तळून खावेत.
- जयमाला देसाई, गोरेगाव.

केळ्याच्या चकल्या

साहित्य - एक डझन केळी, एक वाटी साबुदाणा.
कृती- कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या. नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या. त्यात एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवा. त्यात जिरं, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले एकत्र करा आणि प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.
- सुनंदा देव, जळगाव

केळ्याचे पीठ

साहित्य - अर्धा डझन कच्ची केळी, तीन वाटय़ा पातळ ताक, मीठ.
कृती - प्रथम केळी सोलून त्याचे पातळ काप करून मीठ घातलेल्या ताकात घालून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर एका चाळणीत ते गाळून ताक निघून गेले, की लगेच पातळ कपडय़ांवर उन्हात कडक वाळवाव्यात. नंतर त्याचे पीठ करावे. उपवासाच्या दिवशी हवे तेवढे पीठ घेऊन त्यात दाण्याचे कूट, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, चवीपुरती साखर घालून घट्ट पाण्याने मळून तुपावर थालिपीठ भाजावे.
- कमला कळके, वरळी

वरीच्या तांदळाचे सांडगे

साहित्य -वरी तांदूळ अर्धा किलो, दहा हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे, दाण्याचे कूट,
कृती - वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर तळून खा.
- शकुंतला पटवर्धन

आले-आवळा पाचक वडय़ा

साहित्य - २४० ग्रॅम डोंगरी आवळे, एक टेबलस्पून आल्याची पेस्ट, एक टेबलस्पून ओवा, मीठ, चिमूटभर साखर, एक चमचा जिरे पावडर.
कृती - आवळे स्वच्छ धुवून कोरडे करा. किसून घ्या. त्यात उरलेले सर्व जिन्नस टाका आणि हाताने कालवा. तळहातावर लहान वडय़ा थापा. ते ताटात ठेवून तीन-चार दिवस उन्हात ठेवा. सुकल्यावर त्या हवाबंद डब्यात ठेवा.
-विनिता माणगावकर, कुर्ला

चुरमुऱ्यांचे पापड

साहित्य - कुरमुरे, बेताची हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे, जिरेपूड, चवीनुसार मीठ, लसूण - आले.
कृती - तीन तास कुरमुरे पाण्यात भिजत घालावे. त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, लसूण-आलं यांची पेस्ट घालावी. बेताची धणे-जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून कुरमुरे कणकेप्रमाणे मळावे. चांगला गोळा करून घ्यावा. नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.
लीला दंडवते, एरंडोल