Leading International Marathi News Daily
शनिवार, २३ मे २००९

मनमोहन यांची टीम-ट्वेन्टी
पवार, शिंदे, मुरली देवरा यांचा समावेश ’ आनंद शर्मा, हांडिक यांना बढती
एस. एम. कृष्णा, सी. पी. जोशी, वीरप्पा मोईली यांना प्रथमच संधी
नवी दिल्ली, २२ मे/खास प्रतिनिधी
युपीएतील प्रमुख घटक पक्ष द्रमुकच्या ब्लॅकमेलिंगला भीक न घालता आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील १९ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ठरल्यानुसार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेत केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत राहण्याच्या इराद्याने उतरलेल्या मनमोहन सिंग सरकारच्या या पहिल्या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वडेरा यांच्यासह सत्ताधारी काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माकप नेते सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.

कोणाला काय मिळणार?
प्रणव मुखर्जी यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे, तर पी. चिदंबरम यांना पुन्हा गृह मंत्र्यांचीच भूमिका पार पाडावी लागणार आहे. ए. के. अँटनी यांना पुन्हा संरक्षण खाते, तर एस. एम. कृष्णा यांना परराष्ट्र खाते मिळण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना रेल्वे, तर पवार यांना कृषी खाते मिळणार आहे. गुलामनबी आझाद, जयपाल रेड्डी, व्यालार रवी आणि मोईली यांच्या नावांची चर्चा संसदीय कामकाज मंत्रालयासाठी सुरु आहे. आझाद यांना संसदीय कामकाज मंत्रालयासह जोडीला दुसरे मोठे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना पुन्हा उद्योग व वाणिज्य खाते मिळेल, असे म्हटले जात आहे. अर्जुन सिंह यांच्याकडे असलेले मनुष्यबळ विकास खाते आता कपिल सिब्बल यांच्याकडे देण्यात येईल, अशी चर्चा आहे. सुशीलकुमार शिंदे यांना ऊर्जा, अंबिका सोनी यांना पर्यटन, मीरा कुमार यांना सामाजिक न्याय, सी. पी. जोशी यांना ग्रामीण विकास, आनंद शर्मा यांना माहिती व प्रसारण, जयपाल रेड्डी यांना नगरविकास खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे.

मनसेच ठरवणार राज्याचा मुख्यमंत्री
राज ठाकरे यांची गर्जना

मुंबई, २२ मे / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हजार मतांमध्ये खेळलो, लोकसभा निवडणुकीत लाखांमध्ये खेळतोय, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोटीमध्ये खेळेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मनसेला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार नाही, असा आत्मविश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. षण्मुखानंद सभागृहामध्ये मनसेच्या कार्यकर्ते-पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. मनसेने मराठी मते फोडली, अशी माझ्यावर आगपाखड करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी आत्मचिंतन करावे असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टिका करताना राज यांनी उद्धव यांना एक प्रश्न विचारला, २००९च्या या लोकसभा निवडणुकीत आपण कोणाला मतदान केले, भाजपच्या जेठमलानी यांना मतदान केले असेल तर तो मराठी माणूस होता का? २००४ साली याच उत्तर-मध्य मुंबईतून संजय निरूपम यांना उमेदवारी कोणी दिली होती.

नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी गृहखाते सरसावले
नागपूर, / गडचिरोली, २२ मे / प्रतिनिधी, वार्ताहर

नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकार आणि नक्षलवाद प्रभावित छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या चार राज्यांच्या मदतीने एकाच वेळी मोहीम राबवण्याचा शासनाचा मानस असून या राज्यांच्या गृहमंत्र्यांची बैठक जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेण्यात येईल तसेच केंद्राकडे अतिरिक्त पोलीस दलाची मागणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आजे पत्रकारांशी बोलताना दिली. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात माओवादांच्या सहभागाची चौकशी करण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत पाटील यांनी जाहीर केली.

मनोहर कदमला जामीन
मुंबई, २२ मे/प्रतिनिधी

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील ११ जुलै १९९७ रोजीच्या गोळीबारप्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून शिवडीच्या सत्र न्यायालयाने १५ दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेले राज्य राखीव पोलीस दलाचे निलंबित उपनिरीक्षक मनोहर कदम याना मुंबई उच्च न्यायालयाने आज ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. बाबासाबेब आबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने संतप्त झालेल्या जमावास आटोक्यात आणण्यासाठी कदम यांच्या नेतृत्त्वाखालील ‘एसआरपी’ तुकडीने केलेल्या गोळीबारात ११ आंबेडकरवाद्यांचा बळी गेला होता.

प्रिटोरिया, २२ मे / वृत्तसंस्था
महान खेळाडू सर्वोत्तम कौशल्य पेश करण्यासाठी मोठय़ा व्यासपीठाची निवड करतात. ३५ चेंडूंत ५ षटकार १० चौकारांसह ८५ धावा फटकाविणाऱ्या अ‍ॅडम गिलख्रिस्टने आज तेच केले. गिलख्रिस्टच्या या झंझावातापुढे आयपीएल उपान्त्य फेरीतील दिल्लीचे १५४ धावांचे आव्हान पार धुळीस मिळाले. डेक्कन चार्जर्सने १४ चेंडूत व सहा विकेट राखून दिल्लीवर मात केली आणि दिमाखदार दुसऱ्या आयपीएल क्रिकेट लीगची अंतिम फेरी गाठली. गत आयपीएल स्पर्धेत तळाला म्हणजे आठव्या क्रमांकावर आलेल्या डेक्कन चार्जर्सने या वेळी अंतिम फेरी गाठून सर्वानाच आश्चर्यचकित केले.

‘त्या’ दहशतवाद्यांचे मृतदेह सडू लागले
मुंबई, २२ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील हल्ल्याविरोधातील कारवाईत ठार झालेल्या नऊ पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मृतदेहांची तातडीने विल्हेवाट लावली नाही तर ते सडू लागतील, अशी भीती जे. जे. रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या १० पैकी नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबई पोलीस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयातील शवागरात ठेवले गेले. हे दहशतवादी पाकिस्तानी असल्याने त्यांचे मृतदेह स्वीकारावे, अशी विनंती भारत सरकारने पाकिस्तानला अनेकदा केली. मात्र पाकिस्तानने ते आपले नागरिक नसल्याचे सांगत मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याच वेळेस मुंबईतील सर्व मुस्लिम संघटनांनी या दहशतवाद्यांचे मृतदेह मुंबईतील एकाही कब्रस्तानमध्ये दफन केले जाऊ दिले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती. त्याचप्रमाणे किमान वर्षभर हे मृतदेह शवागरात आहे त्या स्थिती ठेवण्याच्या आदेशानंतर रुग्णालयातर्फेही विशेष औषधांद्वारे ते सडणार नाहीत याची काळजी घेतली गेली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बदलेल्या वातावरणामुळे लवकरच या मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली नाही तर ते सडू लागतील, अशी भीती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी भूषण गागरानी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत अपना बँकेवर दरोडा
मुंबई, २२ मे / प्रतिनिधी

नायगाव येथील अपना सहकारी बँकेच्या रोखपाल आणि पहारेकऱ्याला दोन चोरटय़ांनी आज सकाळी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे २८ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे भोईवाडा पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही ही घटना घडल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नायगाव येथील वासुदेव पेडणेकर मार्गावरील देवीकृपा इमारतीमध्ये असलेल्या अपना सहकारी बँकेत आज सकाळी पावणेआठच्या सुमारास रोखपाल अरूण लावंड आणि पहारेकरी कांबळे हे नेहमीप्रमाणे सकाळी तळघरातील स्ट्राँग रुममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ‘स्ट्राँग रुम’मधून काढलेले २८लाख ७५ हजार रुपये बॅगेत भरून बँकेत परत येत असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी त्यांची जिन्यामध्ये अडवणूक केली व बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. लावंड आणि कांबळे यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु तोपर्यंत ते पसार झाले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक किरण संख्ये अधिक तपास करीत आहेत. रोखपाल व पहारेकरी दररोज स्ट्राँग रूममधून पैसे काढतात याची माहिती असलेल्यांनी ही लूट केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. स्ट्राँग रुमजवळ किंवा इतरत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात न आल्याने चोरटय़ांविषयी पोलिसांना फारशी माहिती मिळालेली नाही.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी