Leading International Marathi News Daily

रविवार, २४ मे २००९

काँग्रेस व राष्ट्रवादीला मिळाले बळ तर विधानसभेत लागणार युतीचा कस
प्रदीप नणंदकर

घोडा का अडखळतो? पान का नासते? व भाकरी का करपते? या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर- न फिरवल्यामुळे. हे उत्तर लातूर, नांदेड, उस्मानाबाद या तीन लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी लक्षात ठेवले व २००४ च्या निवडणूक निकालाच्या नेमके उलटे चित्र २००९ ला दिसून आले. २००४ साली लातूर, नांदेड हे दोन लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे तर उस्मानाबाद शिवसेनेकडे गेला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपची जागा या वेळी काँग्रेसकडे खेचून घ्यायची हे या वेळी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठरवले होते. उमेदवारी बदलली तर विजय सुकर होईल, असा सल्लाही त्यांना दिला गेला होता. मात्र आव्हान म्हणून त्यांनी आपले मेव्हणे भास्करराव खतगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

शरद पवारांना झुकते माप; जुनी सर्व खाती कायम
मुंबई, २३ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नसले तरी मंत्र्यांच्या खातेवाटपात पूर्वीची चारही खाती कायम ठेवून काँग्रेस नेतृत्वाने शरद पवारांना एक प्रकारे झुकते मापच दिले आहे. पक्षाच्या नेतृत्वाकडून पवारांना मिळत असलेल्या महत्त्वाबद्दल राज्यातील काँग्रेसचे नेते मात्र आश्चर्य व्यक्त करीत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात पवारांकडे कृषी, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण ही चारही खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

भाजपसाठी कर्नाटक ठरले प्रकाशाचे बेट!
राजेंद्र येवलेकर

यूपीएच्या सुनामीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी अगदी पालापाचोळय़ासारखी वाहून गेली, पण या सगळय़ा पडझडीत भाजपने कर्नाटकचा गड मात्र शाबूत राखला, तसेच गेल्या वेळपेक्षा एक जागा जास्तजिंकली. भाजपच्या या यशाने मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना आनंद जरूर होता, पण त्यांची स्थिती एका डोळय़ात हासू, तर दुसऱ्या डोळय़ात आसू अशीच होती, कारण कर्नाटकात भाजपची सरशी झाली असली तरी देशपातळीवर होत्याचे नव्हते झाले होते. या विजयानंतर कुठलाही जल्लोष झाला नाही. कर्नाटकात सारे काही शांतच होते.

रेल्वेला मानवी चेहरा देण्याकडे ममता यांचा कल
नवी दिल्ली, २३ मे/पी.टी.आय.

रेल्वेमंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेचच ममता बॅनर्जी यांनी रेल्वे प्रवाशांना खूष करण्यास सुरुवात केली. रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या समाजातील प्रचंड मोठय़ा भागाला आर्थिक स्वातंत्र्य तसेच रेल्वेला अधिक आधुनिक बनवून मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. असंघटित मजूर, विक्रेते, कामगार आणि भूमिहीन मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी स्वस्त मासिक पास योजना राबविण्याचा विचार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मानवतेच्या दृष्टीने गरीबांना स्वस्त दरामध्ये प्रवास करता यावा, हे सामाजिक उत्तरदायित्त्व आहे. या वर्गाला रेल्वेतून प्रवास करताना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल, असे बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. आर्थिक फायद्यासाठी कुणी गोरगरीबांच्या हितरक्षणाच्या आड येणे योग्य नव्हे, असेही त्यांनी सांगितले. तृणमुल काँग्रेसमधील आणखी पाच मंत्र्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी आशा व्यक्त करत त्या म्हणाल्या की, इतर मंत्र्यांच्या शपथविधीनंतरच मी रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारेन. आम्ही सर्व मंत्री एका कुटुंबाप्रमाणे आहोत, त्यामुळे त्यांच्यापासून मी विलग होणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

राजदच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत २८ मे रोजी झाडाझडती
पाटणा, २३ मे, पी.टी.आय.

राष्ट्रीय जनता दलाला लोकसभा निवडणुकीतील अनेक ठिकाणी स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर पक्षाच्या एकंदर स्थितीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी येत्या गुरुवारी २८ मे रोजी एक बैठक आयोजित केली आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या व लालू प्रसाद यादल यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या निवासस्छानी ही बैठक होत आहे. राजदचे प्रवक्ते श्याम रजाक यांनी ही माहिती दिली. रजाक यांनाही जामुई लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. या बैठकीला राजदचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार असून लोकसभा निवडणुकीतील या पराभवाची मीमांसा यावेळी करण्यात येणार आहे. राजद व रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती या पक्षाने या निवडणुकीत युती केली होती. परंतु दोन्ही पक्षांना पराभवाचा मोठा झटका बसला. काँग्रेसशी मात्र दोघांनीही युती तोडली होती, ही एक मोठी चूक होती असे या पराभवानंतर दोन्ही नेत्यांनी मान्य केले होते.