Leading International Marathi News Daily

रविवार, २४ मे २००९

द्रमुकसाठी काँग्रेसचा ३+४ असा फॉम्र्युला
नवी दिल्ली, २३ मे/पीटीआय
यूपीए सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुक पक्षाबरोबर आमचे कुठलेही मतभेद नाहीत व लवकरच ते सरकारमध्ये सहभागी होतील, असा विश्वास काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आज व्यक्त केला. रूसवा काढण्यासाठी द्रमुकला तीन कॅबिनेट व चार राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी दर्शविण्यात आली असल्याचे समजते. काँग्रेस व द्रमुक यांच्यातील मतभेद मिटविण्याची जबाबदारी गुलाम नबी आझाद यांना देण्यात आली असून, ते तामिळनाडूमधील काँग्रेसचे प्रभारी आहेत. काँग्रेस व द्रमुक यांच्यातील मतभेदांच्या बातम्या या कपोलकल्पित आहेत, त्यात कुठलेही तथ्य नाही. सध्या द्रमुक पक्षांतर्गत पातळीवर सल्लामसलत करीत असून, ते लवकरच मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे आझाद म्हणाले.

राज, बंद करा ही बकवास!
मुंबई, २३ मे/प्रतिनिधी

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील युद्ध आजवर एकमेकांवरील व्यक्तिगत चिखलफेकीपर्यंत आले नव्हते. मात्र षण्मुखानंद सभागृहातील मनसेच्या मेळाव्यात राज यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन टीका केली आणि आत्तापर्यंत राज ठाकरे यांचे नाव उच्चारणे टाळलेले उद्धव ठाकरेदेखील या वाक्युद्धात सामील झाले. उद्धव यांच्या भाषेचा बाज पाहता त्यांना राज यांच्याप्रमाणे मुंबईकर मराठी बोलीभाषेत राज यांना उत्तर देणे शक्य नाही. त्यामुळे राज यांच्याच ‘मुंबई स्टाईल’ मराठी भाषेत अखेर लेखी उत्तर देण्यात आले आहे. राज यांनी ‘बाळासाहेबांची टीका मी सहन करेन पण इतरांनी पकपक करू नये’, असा टोला उद्धव यांना हाणला होता. त्याला ‘राज, बंद करा ही बकवास’ असा ‘इन्ट्रो’ काढत उद्धव यांचे पत्रक तयार करण्यात आले आहे. या पत्रावर राज ठाकरे प्रतिक्रिया देणार की, दुर्लक्ष करणार, याकडे राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. हा कलगी-तुरा रंगल्यास त्याचे पडसाद कदाचित मुंबईतील मराठी वस्त्यांमधील गल्ल्यांमध्येही पहावयास मिळू शकतात, असेही याबाबत काही जणकारांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज यांना लिहिलेले पत्र..
राज ठाकरे बंद करा बकवास. तुमच्या बेताल ‘पकपकी’मुळे मराठी माणसांचा तमाशा होतोय. तमाशातील बारीप्रमाणे सवालजबाब करण्याची माझी अजिबात इच्छा नसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे काम करणारा मी एक सच्चा मराठी शिवसैनिक आहे, अशा खणखणीत शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जबरदस्त टोला लगावला आहे. ‘दोन मराठी माणसे भांडताहेत व महाराष्ट्राचे दुश्मन टाळ्या वाजवताहेत हे चित्र मला नको आहे. दुर्दैवाने आज तेच घडत आहे. राज ठाकरे ज्या पद्धतीची पकपक करीत आहेत, बोलत आहेत त्यामुळे त्यांचेच पितळ उघडे पडत असून, शिवसेनेच्या विचारांचे नाणे मात्र, खणखणीत वाजत आहे.

नक्षलवाद्यांनी युद्धतंत्र बदलल्याने पोलिसांचे अधिक बळी
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, २३ मे

नेपाळी माओवाद्यांच्या सहभागानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या गनिमी युध्दाच्या तंत्रात आमूलाग्र बदल केल्याने पोलिसांच्या बळींची संख्या वाढू लागली आहे. या बदललेल्या तंत्राला उत्तर देण्यासाठी नक्षलवादविरोधी अभियानामध्ये सुधारणा करणे आता आवश्यक झाले आहे. गेल्या चार महिन्यात एकटय़ा गडचिरोली जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी तब्बल ३४ पोलिसांचे बळी घेतल्याने गृह खात्याची झोप उडाली आहे. नक्षलवाद्यांच्या व्यूहरचनेचा बारकाईने अभ्यास केला असता गनिमी युध्दाच्या या नव्या तंत्राची माहिती उघड झाली आहे. नक्षलवाद्यांमध्ये हे नवे तंत्र रुजवण्यामागे नेपाळमधून आलेल्या माओवाद्यांचा हात असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

‘रॉयल’ बंगलोर
जोहान्सबर्ग, २३ मे/ वृत्तसंस्था

आयपीएलची अंतिम लढत हैदराबाद आणि बंगलोर या गेल्यावर्षीच्या तळाच्या दोन संघांमध्ये उद्या होईल. साखळी सामन्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्स व चेन्नई सुपर किंग्ज यांना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. आज उपान्त्य फेरीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला १४६ धावांचेच आव्हान उभे करता आले. विजयाचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्सने ७ चेंडू व ६ विकेट्स राखून पार केले. दोन दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्सला उपान्त्य फेरीचा दरवाजा खुला करून देणारा मनीष पांडे आजही बंगलोरचा तारणहार ठरला आणि त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पांडेने ३५ चेंडूत ७ चौकारांसह ४८ धावा फटकाविल्या आणि विजयाचा पाया राहुल द्रविडसोबत (४४) वेगात रचून दिला. २ बाद २२ वरून मनीष पांडे आणि राहुल द्रविड यांनी ७२ धावांची भागीदारी रचून सामना चेन्नईच्या हातून हिसकावून घेतला. रॉस टेलर (१७)आणि विराट कोहली (२४) यांनी अखेर दोन-दोन षटकार मारून विजयाचे लक्ष्य नियोजीत षटकांआधीच साध्य केले. मनीष पांडे आणि राहुल द्रविड यांच्या फटकेबाजी प्रमाणेच कुंबळे, मव्र्ह व कॅलिस यांची गोलंदाजी निर्णायक ठरली. प्पटेल (३६), हेडन (२६), धोनी (२८) यांच्या प्रारंभीच्या आक्रमणानंतर अखेरच्या ७ षटकात चेन्नईला फक्त दोन वेळाच चेंडू सीमापार पाठविता आला. त्यामुळे विजयासाठीचे त्यांचे लक्ष्य १४६ धावांवरच मर्यादित राहिले.

सारस्वत बँकेकडून कृष्णा पाटीलचे कर्ज माफ
पुणे, २३ मे/प्रतिनिधी

माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या कृष्णा पाटील या युवतीच्या वडिलांनी एव्हरेस्ट मोहिमेकरिता सारस्वत बँकेकडून घेतलेले सर्व कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक गिर्यारोहकांनी स्वागत केले आहे. बँकेच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख व सरव्यवस्थापिका स्मिता संधाने यांनी ही माहिती दिली. उपसरव्यवस्थापिका सुनीता प्रभुणे, तसेच बँकेच्या कर्ज विभागाच्या क्षेत्रीय प्रमुख मृणाल कुंकोळीकर यावेळी उपस्थित होत्या. एव्हरेस्ट मोहिमेकरिता कृष्णाचे वडील माधवराव पाटील यांनी बँकेने मार्च महिन्याचे अखेरीस घराचे तारणावर तीस लाख रुपयांचे कर्ज वितरित केले होते. ही कर्ज रक्कम व त्यावर होणारे वीस लाख रुपयांचे व्याज असे पन्नास लाख रक्कम माफ करण्यात आली असून, कृष्णाला या मोहिमेसाठी बँकेतर्फे प्रायोजकत्व देण्याचा निर्णय बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी घेतला असल्याचे संधाने यांनी सांगितले. बँकेने आजपर्यंत सामाजिक बांधिलकी या नात्याने वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य, त्यांच्या वारसदारांना नोकरी देणे. गरीब व दुर्बल घटकातील लोकांना आपत्कालीन साहाय्य करणे आदी उपक्रम केले असल्याचेही संधाने यांनी सांगितले. बँकेच्या या निर्णयाचे माधवराव व त्यांच्या पत्नी रंजना यांनी स्वागत केले आहे. कृष्णाबरोबरच आम्हीही एव्हरेस्ट शिखरावर असल्याचा आभास आम्हाला होत आहे. बँकेने हा अतिशय धाडसी परंतु आदर्श निर्णय घेतला आहे. या मोहिमेकरिता निधी उभारणे हे अग्निदिव्यच होते. अनेकांनी निधी देण्याबाबत पाठ फिरविल्यानंतर आम्ही सारस्वत बँकेकडे संपर्क साधला. त्यांनी तत्परतेने कर्ज मंजूर केले. आता हे कर्ज माफ करीत त्यांनी कृष्णाच्या यशास सोनेरी किनार चढविली आहे. या निर्णयामुळे गिर्यारोहण क्रीडा प्रकारास चालना मिळणार आहे. बँकेच्या या निर्णयाचे अनेक ज्येष्ठ गिर्यारोहकांनी स्वागत केले.

‘मान्सून’ केरळात दाखल
पुणे, २३ मे / प्रतिनिधी

नैॠत्य मान्सून आज, त्याच्या नियोजित वेळेच्या आठवडाभर आधी केरळ किनाऱ्यावर दाखल झाला. येत्या दोन दिवसात तो इशान्य भारतातही प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या महाराष्ट्रातील आगमनाबाबत आणखी दोन दिवसांनंतर चित्र स्पष्ट होईल. मान्सून सामान्यत: एक जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. त्यानंतर आठवडाभरात तो महाराष्ट्रातही पोहोचतो. यावर्षी तो २६ मे रोजी केरळात येण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र त्याच्याही तीन दिवस आधी म्हणजे आज तो केरळात पोहोचला. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही तो आणखी पुढे सरकला आहे. त्यामुळे मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय बनल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरातील शाखा येत्या सोमवापर्यंत (४८ तासात) इशान्य भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी