Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

बेपत्ता बालिकेचा खून; आरोपीचे घर जाळले
कोल्हापूर, २४ मे / प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून गूढरीत्या बेपत्ता झालेल्या पोर्ले तर्फ ठाणे या गावातील बालिका प्रतीक्षा कृष्णात भोपळे (वय ९) हिची हत्या केल्याच्या आरोपावरून संशयित आरोपी म्हणून विलास कृष्णात घाटगे (वय ३३) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवारी अटक केल्यानंतर आणि आज गावातच एका शेतात प्रतीक्षाच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विलास घाटगे याचे घर जाळून टाकले. घर जाळून टाकण्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर पन्हाळा आणि करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस मोठय़ा संख्येने गावात तैनात करण्यात आले.

काळय़ा खणीवर अतिक्रमण
सांगलीचे राजे पटवर्धन यांच्यासह पाचजणांवर पालिकेची फौजदारी
सांगली, २४ मे / प्रतिनिधी
सांगली शहरातील काळय़ा खणीवर सांगली महापालिकेची मालकी असताना त्यावर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवून अतिक्रमण केल्याप्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन, माजी नगरसेवक शेखर माने, दीपायन ट्रस्टचे सचिव राजेश गंगवाणी, प्रमोद शिंदे व विनायक सरगर यांच्याविरोधात शनिवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतक ऱ्यांच्या कर्जावरील व्याजदर चार टक्क्य़ांपर्यंत आणणार- पवार
माळशिरस, २४ मे/भारत मगर

शेतकरी हा देशाचा कणा असून, तो सुधारला तरच हिंदुस्थान सुधारणार आहे. शेतक ऱ्यांच्या पिकांना दर तर मिळालाच पाहिजे शिवाय त्याच्या उत्पादन खर्चात कपात झाली पाहिजे. यासाठी शेतक ऱ्यांच्या कर्जावरील व्याजदर ४ टक्क्य़ावर आणण्याचा विचार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यानी सांगितले.

टेंभूच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मीच करणार -पतंगराव
कराड, २४ मे/वार्ताहर

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेऊन निधीसाठीही आपण पाठपुरावा केल्याने जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या टेंभू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभही मीच करणार आहे. या कार्यक्रमाला येण्याची इच्छा असणाऱ्यांना बोलावले जाईल, असे सांगताना टेंभू प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या अर्थसंकल्पात खास निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा १७ जूनला मुंबईत मोर्चा
सांगली, २४ मे / प्रतिनिधी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगापासून दूर ठेवणाऱ्या राज्य शासनाच्या या अन्यायी धोरणाविरोधात दि. १७ जून रोजी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांनी दिला. सहाव्या वेतन आयोगातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे, असे ते म्हणाले. या वेळी ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब झुरे, सचिव अ‍ॅड. एम. आर. कुंभार, मारुतीराव निकम, मुबारक मुजावर, बाबूराव जाधव, विठ्ठल काळे, रमेश सावंत, बलराम सावंत व उत्तम हाके आदी उपस्थित होते.

रवी सहकारी बँकेचे आजी-माजी संचालक गायब
कोल्हापूर, २४ मे / प्रतिनिधी

सुमारे १६ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून येथील रवी को-ऑप. बँकेच्या आजी-माजी संचालकांसह २८ जणांविरुद्ध लेखापरीक्षकांनी फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली असून, बहुतांशी संशयित आरोपी आजी-माजी संचालक कोल्हापुरातून गायब झाले आहेत. आज पोलिसांनी सहा आजी-माजी संचालकांच्या घरी जाऊन चौकशी केली असता ते घरात आढळून आले नाहीत. माजी नगरसेवक जयराम पचिंद्रे, विद्यमान नगरसेवक अजित मोरे, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, माजी नगरसेवक आनंदराव पायमल, बाळासाहेब सोनवणे, माधवराव घोडके यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली.

बँक ऑफ इंडियासमोर बेरोजगारांची निदर्शने
सोलापूर, २४ मे/प्रतिनिधी

बँक ऑफ इंडियाच्या होटगी रोड शाखेत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्जप्रकरणामध्ये बेरोजगार लाभार्थीची फसवणूक करणे, माहिती लपवून ठेवणे, हितसंबंध जोपासून गैरव्यवहार करणे, लाभार्थीना अपमानास्पद वागणूक देणे, आदी अन्यायाविरुद्ध आसरा चौकातील बँकेच्या कार्यालयासमोर येत्या २७ मे रोजी सकाळी १० वाजता निदर्शने करण्यात येत असल्याचे बेरोजगार निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष बसवराज येरनाळे यांनी सांगितले. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या संदर्भासह सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ातील शेकडो बेरोजगार लाभार्थीवर राष्ट्रीयीकृत बँका जाणीवपूर्वक अन्याय करीत आहेत.विविध कारणे दाखवून बँका कर्जपुरवठा करीत नसल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे येरनाळे यांनी सांगितले.

‘जिंकू दाही दिशा- मार्ग यशाचा’ ग्रंथाचे गुरुवारी प्रकाशन
सातारा, २४ मे/प्रतिनिधी

येथील ज्योतिषतज्ज्ञ प्रा. रमणलाल शहा यांच्या ‘जिंकू दाही दिशा- मार्ग यशाचा’ या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त २८ मे रोजी सकाळी १० वाजता सैनिक महाभवनमध्ये आयोजित केलेल्या सोहळय़ात महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. संभाजीराव पाटणे, मधू नेने यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रा. रमणलाल शहा यांनी सांगितले, की एमआयटी कॉलेजचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड व कुलगुरू पी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळय़ास रामराजे नाईक निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, लक्ष्मणराव पाटील, उिपस्थित राहणार आहेत.

स्टोव्हचा भडक्याने पती-पत्नीचा मृत्यू
सोलापूर, २४ मे/प्रतिनिधी
स्वयंपाक करताना स्टोव्हचा भडका उडून भाजलेल्या पती-पत्नीचा मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी या गावात झाला.पद्मिनी विजय बनसोडे (वय ३०) आणि विजय भीमराव बनसोडे (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला. त्यात पदर पेटल्याने पद्मिनी ७० टक्के भाजली. तिला वाचविताना तिचा पती विजय हासुद्धा ७० टक्के भाजला. दोघांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

साखरपुडय़ात लग्न बघायला गेले आणि लग्नच केले
माळशिरस, २४ मे/वार्ताहर

साखरपुडय़ात लग्न बघायला गेले आणि लग्नच केले. लग्नाच्या या घटना नित्याच्याच झालेल्या असताना नातेवाईकांच्या लग्नासाठी एकत्र जमलेल्या वधू-वरांची तेथेच पसंती करून विवाह उरकल्याचा प्रकार पंढरपूर तालुक्यातील कौठळी गावी घडला. संग्रामनगर (ता.माळशिरस) येथील सरपंच यशवंत साळुंखे हे नातेवाईकाच्या लग्नानिमित्ताने कौठळीला गेले असताना त्यांना तेथीलच संजय घोडके यांची मुलगी पाहण्यात आली व त्यांचा मुलगा मयूर याच्यासाठी ती योग्य वाटल्याने तेथेच बोलणी झाली. साळुंखे यांनी दूरध्वनीवरूनच नातेवाईकांना बोलावून घेऊन मुलींच्या घरी अंगावरील जुन्या कपडय़ावरच मयूर व सारिकाचा विवाह लावला. त्यामुळे रुखवत, फटाके व इतर थाटामाटाचा प्रश्नच आला नाही.

विडी कामगारांना पिवळे रेशनकार्ड मिळण्यासाठी सोलापुरात निदर्शने
सोलापूर, २४ मे/प्रतिनिधी

विडी कामगारांना दारिद्रय़रेषेखालील पिवळे रेशनकार्ड मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत विडी व यंत्रमाग कामगार सेनेच्या वतीने शहर अन्नधान्य अधिकारी कार्यालयाच्या परिमंडळ ब विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी व विडी कामगार नेत्या पद्मा म्हंता यांनी केले. शासनाने विडी कामगारांना दारिद्रय़रेषेखालील पिवळे रेशनकार्ड देण्याचे सहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले आहे; परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप होत नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले. अन्नधान्य परिमंडळ ब विभागाचे अधिकारी शिवानंद जत्ती यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात मोहन नारा, श्रीहरी साका यांच्यासह शेकडो विडी कामगार सहभागी झाले होते.

मलकापूर येथे दोघांचा खून
कराड, २४ मे/वार्ताहर

महिलेच्या गळ्यातील गंठण चोरी करावयास लावून पोलिसांना या चोरांची नावे सांगितल्याच्या संशयावरून दोघा तरुणांना मारहाण करून, दारू अथवा इतर प्रकारातून विषारी द्रव पाजून त्यांचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी कराड लगतच्या आगाशिवनगर (मलकापूर) येथे घडली. या प्रकरणी कराड शहर पोलिसांत विद्या संजय कोरडे (वय २९) यांनी फिर्याद दिली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यातील काकासो धोंडी मलमे व सुरेश बाळू सोनवले यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ५ दिवस म्हणजेच दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कराडला यशवंत बियाणे व सेंद्रीय शेतीमाल महोत्सवाचे आयोजन
कराड, २३ मे/वार्ताहर

येथील यशवंत कृषी विकास संस्थेच्या पुढाकाराने राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, वसुंधरा शाश्वत शेती संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा यशवंत बियाणे व सेंद्रीय शेतीमाल महोत्सव येत्या शुक्रवार (दि. २९) ते रविवार (दि. ३१) या तीन दिवसांत कराडच्या प्रांत कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती यशवंत कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील उत्तम परंपरागत बियाणे, कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन केंद्राकडील सरळ वाणांच्या बियाणांचा हा महोत्सव आहे.