Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

हैदराबाद ब्लूज बंगलोर ‘लूज’
डेक्कन चार्जर्स विजेते
जोहान्सबर्ग, २४ मे / पीटीआय
टेन्शन..टेन्शन..टेन्शन..कधी डेक्कन चार्जर्स संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद तर कधी बंगलोरचे खेळाडू खुश..तर कधी नेमकी उलट परिस्थिती..क्रिकेट समर्थकांचीही हृदयाची धडधड वाढलेली..कुणी डोळे मिटलेले तर कुणी मनोमन प्रार्थना करताना..इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या येथे झालेल्या डेक्कन चार्जर्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स या संघातील अंतिम सामन्याचे केवळ असेच वर्णन करता येईल. बंगलोरला अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना रॉबिन उथप्पाने दोन चेंडू अक्षरश: वाया दवडले आणि हेच टेन्शन प्रचंड वाढले. शेवटच्या तीन चेंडूंत १४ धावांची गरज आणि शेवटी एका चेंडूत ८ धावा. आर.पी. सिंगचा तो अखेरचा चेंडू नोबॉल असेल आणि उथप्पा षटकार खेचून सामन्याचे चित्र पालटवेल असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला.

द्रमुकच्या तिघांचा कॅबिनेटमध्ये समावेश?
टी. आर. बालूंना वगळले
चेन्नई, २४ मे/पीटीआय

मंत्रिपदांच्या संख्येचा प्रश्न प्रतिष्ठेचा करून यूपीएच्या नाकीनऊ आणणाऱ्या द्रमुकने अखेर आज आपला हट्ट सोडून मनमोहनसिंग सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. द्रमुकचे नेते एम. के. अझगिरी, ए. राजा, दयानिधी मारन यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय जहाजउद्योगमंत्रीपद भूषविलेले टी. आर. बालू यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश न करता लोकसभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात येईल असे समजते. यूपीए सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यासंदर्भात द्रमुक पक्षाकडून प्रसारमाध्यमांना अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही.

आझमखान यांची हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
लखनऊ, २४ मे / पी.टी.आय.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आझमखान यांची समाजवादी पक्षातून अखेर हकालपट्टी करण्यात आली. रामपूर मतदारसंघातून अभिनेत्री जयाप्रदा यांना उमेदवारी देण्यावरून पक्षाचे महासचिव अमरसिंग यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला होता. आझमखान हे पक्षाचे अध्यक्ष कल्याणसिंग यांच्या अत्यंत विश्वासातील होते. जयाप्रदा यांना उमेदवारी देण्यास आझमखान यांचा तीव्र विरोध होता. अमरसिंग यांनी जयाप्रदा यांना उमेदवारी मिळवून दिल्याने चिडलेल्या आझमखान यांनी जयाप्रदा यांच्या विरोधात रान उठविले होते. अमरसिंग व आझमखान या दोघांमधील संघर्ष विकोपाला गेला होता.

भाजप आमदारांच्या अंगावर उभा राहिलाय काटा!
नरेन्द्र मोदी यांचा फुसका बार
संदीप प्रधान
मुंबई, २४ मे

लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व कुचकामी ठरले, नरेंद्र मोदी यांचा करिष्मा फुसका ठरला, राज्यातील भाजपच्या एकाही नेत्यात निवडून आणण्याची धमक नाही आणि महाजन-मुंडे पर्वाचा महाराष्ट्रात अस्त झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील भाजपचे बहुतांश आमदार कमालीचे अस्वस्थ असून त्याचा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम राज्यातील भाजपच्या खासदारांची संख्या दुहेरी आकडय़ावरून एकेरीवर आली आहे.

रेशनिंगच्या दुकानात आता गव्हाऐवजी पीठ?
दत्ता सांगळे
औरंगाबाद, २४ मे

स्वस्त धान्य दुकानांमधून पुरविण्यात येणाऱ्या गव्हाचा काळा बाजार थांबविण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना अपयशच आले आहे. त्यामुळे या दुकानांवर गहू देण्याऐवजी थेट पीठच देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद कसा असेल यासह अन्य विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पुरवठामंत्री रमेश बंग यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची एक बैठक बोलाविली आहे.

राज्याच्या ४८ महामार्गावर आता अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर!
मुस्तफा आतार
पुणे, २४ मे

महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर्स’मध्ये आवश्यक उपचार देण्यासाठी राज्यातील प्रमुख ४८ महामार्गावर ‘अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर’ उभारण्यात येणार आहेत. यामुळे अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यापूर्वीच आवश्यक ते उपचार मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशिष्ट टोल फ्री क्रमांक फिरविल्यास चोवीस तास ही सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यातील महामार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र योग्य ते उपचार वेळीच न मिळाल्याने मृत्युमुखी झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे वर्षांकाठी चार हजारांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार दररोज नऊ ते दहा व्यक्ती मृत्युमुखी पडत असल्याची आकडेवारी पुढे येत आहे.

मंत्रिपद नव्हे, पक्षबांधणी महत्त्वाची - लालूप्रसाद यादव
पाटणा, २४ मे/पी.टी.आय.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळातही प्रवेश नाकारण्यात आल्याने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची लोकप्रियता घसरणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी स्वत: लालूप्रसाद यांना मात्र, मंत्रिपदापेक्षा पक्षउभारणी हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे, असे वाटते. ‘आम्ही कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. बिहारच्या हितरक्षणासाठी मी एकटा समर्थ आहे. मंत्रिपद हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नसून पुढील वर्षी येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने बिहारमधील कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाला पुन्हा उभारी देणे हे माझ्यासमोरील मोठे आव्हान आहे’, असे लालूप्रसाद यांनी एका सभेत बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘आजवरच्या राजकीय आयुष्यात मी अनेक वादळे अनुभवली आहेत. राजकारणात आजचा विजेता उद्याचा पराजित असतो. राजदचा पराभव हा कायमसाठी नाही. आज लोकसभेत आमचे फक्त चार खासदार असतील. पण बिहारच्या हिताचे रक्षण करण्यास मी एकटा सक्षम आहे

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी