Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

अणुकरारामुळे ऊर्जाक्षेत्रात भारत दोन पावले पुढे -काकोडकर
लातूर, २४ मे/वार्ताहर

अणुकरारामुळे ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. या संधीमुळे भारत ऊर्जाक्षेत्रात एक अग्रगण्य देश म्हणून उभा राहणार असून अन्य देशांच्या तुलनेत तो दोन पावले पुढे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला व लातूर विज्ञान केंद्र यांनी दयानंद शिक्षणसंस्थेच्या सभागृहात काल रात्री श्री. काकोडकर यांचे ‘अणुकरार व ऊर्जासुरक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

कोलाहल हा
प्रत्येक खिडकी- समोर लांबलचक रांग. इंग्रजी, हिंदी व शेवटी अशुद्ध उच्चारात मराठीत एकच सूचना सतत कर्कश आवाजात कानावर आदळणारी. ‘यूवर अटेंशन प्लीज.. दि ट्रेन..’ आता रेल्वे लवकरच एक नंबर प्लॅटफॉर्मवर येईल, त्याआधी तिकीट मिळालं पाहिजे. प्रत्येकाची धडपड. रेल्वे येण्याअगोदर तिकीट घेऊन आत पोचलं पाहिजे. रांग नाही सरकत लवकर. खिडकीजवळ धावतपळत येऊन शिस्त मोडून लवकर तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करणारेही असतातच. ‘औरंगाबाद का? माझंही एक काढा.’ असं म्हणून रांगेतल्या कुणाजवळ आपलंही तिकीट देतात काढायला.

‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांचा प्रभाव गावापुरताच!
सर्वच मतदारसंघांमध्ये कमळ फुलले
वसंत मुंडे
बीड, २४ मे

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-नेत्यांनी आपल्या मूळ गावात पक्षाला मतांची आघाडी दिली; पण तालुक्यात ते न जमल्याने त्यांचा प्रभाव गावापुरताच राहिला. आमदार उषा दराडे, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे, रामकृष्ण बांगर यांना आपापल्या गावांतही पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देता आले नाहीत. भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरसिंह पंडित गावात हरले तरी तालुक्यात मात्र जिंकले. त्यामुळे प्रचारसभांतून मताधिक्याच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांची राजकीय ‘पत’ मतांच्या आकडेवारीने उघड झाली आहे.

राज्यातही आघाडीचेच सरकार येणार - क्षीरसागर
बीड, २४ मे/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने केंद्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांचे स्थिर सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांचे सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. बीड नगरपालिका कार्यक्षेत्रालगतच्या वसाहतीतील पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ आज श्री. जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते ग्रामसेवक कॉलनीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.

मालमोटारीच्या धडकेने सुरक्षा रक्षक ठार
अंबाजोगाई, २४ मे/वार्ताहर
वेगात येणाऱ्या मालमोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यानंतर ही मालमोटार झाडावर आदळल्यामुळे चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावरील गिरवली-पूस येथे घडली. सय्यद कमाल सय्यद नूर (वय ४९) असे दुचाकीस्वाराचे नाव असून ते माजी सैनिक आहेत. गिरवली येथील ‘४४०’ वीज केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करीत होते. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सय्यद कमाल हे आपल्या एमएच २३-जी९७२५ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून गिरवलीकडे जात असताना समोरून वाळू घेऊन भरधाव वेगात येणाऱ्या एमएच२४-ए२०७९ या क्रमांकाच्या मालमोटारीने जोराची धडक दिली. यात सय्यद कमाल यांचा जागीच मृत्यू झाला. ही मालमोटार रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. यात मालमोटारचालकाचे दोन्ही पाय निकामी झालेअसून त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रॅक्टरची धडक बसून एकजण ठार
जळकोट, २४ मे/वार्ताहर

ट्रॅक्टरची धडक बसून एक जण ठार व दोघे जखमी झाले. तालुक्यातील पाटोदा (बु.) येथे आज सायंकाळी हा अपघात झाला. जळकोट पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजी भगवान शिंदे (वय ४५), गोविंद बाबाराव आयवाले (वय ७५) व नवाज अब्बास तांबोळी (वय ७५ वर्षे) हे शेषराव त्रिपती यांच्या घराच्या ओटय़ावर गप्पा मारीत बसले होते. वेगात असलेला ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २४ डी ४६३५) सरळ त्या ओटय़ावर धडकला. हा ट्रॅक्टर शहाजी भगवान केंद्रे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांच्या शरीराचा व डोक्याचा चेंदामेंदा झाला. गोविंद आयवाले व नवाज तांबोळी गंभीर जखमी झाले. जखमींवर जळकोटच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत शहाजी केंद्रे जीपचालक होते. त्यांच्या मागे पत्नी, ३ मुली, १ मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे.

उकाडय़ातून सुटका!
औरंगाबाद, २४ मे/वार्ताहर
मेच्या प्रारंभीपासून कडक ऊन आणि प्रचंड उकाडय़ाने अंगाची लाहीलाही झालेल्या शहरवासीयांना गेल्या चार-पाच दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. अचानक बदललेले वातावरण तसेच भारनियमात झालेल्या कपातीमुळे आता उन्हाळ्याचा त्रास बराच कमी जाणवत आहे. मेच्या प्रारंभी तापमान ४५ अंशांच्या घरात गेले होते. त्यामुळे घराबाहेर पडणे तर कठीणच शिवाय घरात बसणेसुद्धा असह्य़ झाले होते. माणसांप्रमाणे पशु-पक्ष्यांनादेखील उन्हाचा तडाखा सोसणे कठीण झाले होते. बेमोसमी पावसाने मात्र गत आठवडय़ात थोडेफार तापमान खाली आणले. त्यानंतर तापमान ३५अंश ते ३६ अंशांपर्यंत खाली आले. तापमानात घट झाल्यामुळे शहरवासीयांना बराच दिलासा मिळाला आहे. उन्हाळा कधी संपतो असे साऱ्यांना वाटत असताना सकाळपासून सर्वत्र वारे वाहत आहे. रात्रीच्या वेळी तर थंड वाऱ्यामुळे सारेजण सुखावत आहे.

अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद, २४ मे/प्रतिनिधी
अनधिकृतपणे नळजोडणी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आणि सर्वसाधारण सभेने वेळोवेळी ठराव घेतले असले तरी आतापर्यंत अशी कारवाई झालेली नाही. मात्र काल पालिकेच्या वतीने जाफर गेट भागातील एकाविरुद्ध पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. अप्पा नारायण नामदे असे आरोपीचे नाव आहे. नामदे याने पालिकेच्या ३०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीला छिद्र पाडून तेथून अनधिकृतपणे नळ जोडून घेतल्याचे कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बालगायिका कार्तिकीचा औरंगाबादमध्ये सत्कार
औरंगाबाद, २४ मे/प्रतिनिधी
‘सारेगमप’ कार्यक्रमातील बाल महागायिका कार्तिकी गायकवाड हिचा शनिवारी सायंकाळी औरंगाबाद येथे स्वरकल्याण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वरकल्याण संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिनाच्या औचित्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक नाथ नेरळकर यांच्या हस्ते कार्तिकीचा सत्कार करण्यात आला. पंढरीनाथ महाराज, बोधले महाराज, कल्याण गायकवाड, स्वरकल्याण संस्थेचे तुळशीराम अतकरे, माजी महापौर डॉ. भागवत कराड या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्तिकीने ‘खंडेरायाच्या लग्नाला’ हे गीत सादर केले.

बीड येथे विवाहितेचा छळ
औरंगाबाद, २४ मे/प्रतिनिधी
कार्यालय सुरू करणे तसेच मोटार घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या बीड येथील तीनजणांविरुद्ध येथील सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. हुमेरा मोहम्मद ताहेरोद्दीन (वय २८, हल्ली मुक्काम बुढीलेन, औरंगाबाद) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती मोहम्मद ताहेरोद्दीन मोहम्मद नसीमोद्दीन, सासरा मोहम्मद नसरोद्दीन, नणंद ममताज अशी आरोपींची नावे आहेत. अडीच लाख रुपयांसाठी तिघांनी हुमेरा यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि जिवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलले.

अवैध रॉकेल विक्री करणाऱ्या तिघांना अटक
औरंगाबाद, २४ मे/प्रतिनिधी

अवैधरित्या वाढीव दराने खुलेआम रॉकेलची विक्री करणाऱ्या तीन जणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून ४१ हजार ५०० रुपयांचे रॉकेल जप्त करण्यात आले आहे. इलियासखान अय्याजखान (कैसर कॉलनी), नारायण मुरझडे आणि रत्नाकर शिंदे (दोघेही राहणार झाल्टा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. झाल्टा गावाजवळ सोनाली ढाब्याच्या पाठीमागे ही रॉकेलची विक्री सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून येथे वाहनांमध्ये टाकण्यासाठी रॉकेल मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. मात्र याकडे दूर्लक्ष करण्यात आले. याची तक्रार थेट पोलीस अधीक्षक अमितेश कुमार यांच्याकडेही करण्यात आली होती. अमितेश कुमार यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी तेथे छापा घालण्यात आला. त्यावेळी तिघेही तेथे हजर होते आणि रॉकेलची विक्री सुरू होती.

ढेबेवाडी खुनाच्या गुन्ह्य़ात १२ आरोपींना नाटय़मय अटक
गंगाखेड, २४ मे/वार्ताहर

तालुक्यातील ढेबेवाडी येथील भारत निर्माण योजनेतील कामाच्या वादातून दोन जणांचा खून झाला. या गुन्ह्य़ातील अठरापैकी बारा आरोपींना काल रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी घाटनांदूर रेल्वेस्थानकावर अटक केली. तालुक्यातील ढेबेवाडी येथे भारत निर्माण योजनेच्या जलवाहिनीच्या कामावरून एकूण अठरा आरोपींनी काल सकाळी माजी सरपंच केशव वामन फड व त्यांचा मुलगा मधुकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने खून केला. या हल्ल्यात अन्य तीन गंभीर जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. वृत्त कळताच परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे यांनी आरोपींच्या शोधासाठी ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक केली होती. काही आरोपी रेल्वेने बाहेर जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने एक पथक अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वेस्थानकावर पाठविले. रात्री साडेनऊ वाजता एका पॅसेंजरने पसार होण्याच्या मार्गावर असलेल्या एकूण बारा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. इतरही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गंगाखेडचे पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांनी सांगितले.

नांदेडमध्ये सोमवारी पूरनियंत्रण आढावा बैठक
नांदेड, २४ मे/वार्ताहर

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर उद्या (सोमवारी) पूरनियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. गोदावरी नदीकिनारी वसलेल्या नांदेड व परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर पुराचा फटका बसतो. सन २००६ मध्ये नांदेड जिल्ह्य़ात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदा पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा करण्यासाठी पूरनियंत्रण आढावा बैठक करण्यात आली आह. नांदेड महापालिका, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, भारत संचार निगम या शासकीय यंत्रणेसह नदीकिनारी असलेल्या गावच्या सरपंचांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या आढावा बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार महेश वडदकर यांनी केले आहे

भगवानगडावर ३१ मे रोजी गोपीनाथ मुंडे यांचा सत्कार
गेवराई, २४ मे/वार्ताहर

बीड जिल्ह्य़ाचे नूतन खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हे रविवारी (३१ मे) श्रीक्षेत्र भगवानगडावर दर्शनासाठी येणार आहेत. याच वेळी श्रीक्षेत्र भगवानगड विश्वस्त मंडळाच्या वतीने मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुंडे भगवानगडावर येऊन वै. भगवानबाबा व वै. भीमसिंह महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री यांचेही आशीर्वाद घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी व मुंडे यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी भाविक भक्तांनी मोठय़ा संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले आहे.