Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

द्रमुकच्या तिघांचा कॅबिनेटमध्ये समावेश?
टी. आर. बालूंना वगळले
चेन्नई, २४ मे/पीटीआय

 

मंत्रिपदांच्या संख्येचा प्रश्न प्रतिष्ठेचा करून यूपीएच्या नाकीनऊ आणणाऱ्या द्रमुकने अखेर आज आपला हट्ट सोडून मनमोहनसिंग सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. द्रमुकचे नेते एम. के. अझगिरी, ए. राजा, दयानिधी मारन यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय जहाजउद्योगमंत्रीपद भूषविलेले टी. आर. बालू यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश न करता लोकसभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात येईल असे समजते.
यूपीए सरकारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यासंदर्भात द्रमुक पक्षाकडून प्रसारमाध्यमांना अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी आपला मुलगा एम. के. अझगिरी याला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद तसेच आपली मुलगी व राज्यसभा सदस्य कानीमोझी हिला राज्यमंत्री मिळावे यासाठी करुणानिधी आग्रही आहेत. त्याशिवाय द्रमुकच्या आणखी तीन नेत्यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल.
कानीमोझी या मंत्रिपद स्वीकारणार नाहीत अशी चर्चा आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की मी कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश होणारे द्रमुकचे नेते ए. राजा यांना माहिती तंत्रज्ञान व दळणवळण, अझगिरी यांना रसायने व खते तसेच दयानिधी मारन यांना वस्त्रोद्योग खात्याचा भार सोपविण्यात येईल अशी चर्चा आहे. द्रमुकच्या सूत्रांनी सांगितले की, मंत्रिपदांसंदर्भातील अंतिम निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग हे द्रमुकला आणखी काही मंत्रिपदे देतील अशी आशा द्रमुकच्या सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये बालू हे पर्यावरण व वन खात्याचे मंत्री होते. देवेगौडा पंतप्रधान असताना बालू हे पेट्रोलियम राज्यमंत्री होते. यूपीए सरकारमध्ये बालू हे भुपृष्ठ वाहतूक व जहाजउद्योगमंत्री होते. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बालू यांना वगळण्यात येणार असले तरी लोकसभेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यूपीए सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी व्यक्तिगत व सामुहिक पातळीवर सुमारे तीन तास सविस्तर चर्चा केली. मात्र यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही असे द्रमुक सूत्रांनी सावध पवित्रा घेत सांगितले.