Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

आझमखान यांची हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
लखनऊ, २४ मे / पी.टी.आय.

 

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आझमखान यांची समाजवादी पक्षातून अखेर हकालपट्टी करण्यात आली. रामपूर मतदारसंघातून अभिनेत्री जयाप्रदा यांना उमेदवारी देण्यावरून पक्षाचे महासचिव अमरसिंग यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला होता. आझमखान हे पक्षाचे अध्यक्ष कल्याणसिंग यांच्या अत्यंत विश्वासातील होते. जयाप्रदा यांना उमेदवारी देण्यास आझमखान यांचा तीव्र विरोध होता. अमरसिंग यांनी जयाप्रदा यांना उमेदवारी मिळवून दिल्याने चिडलेल्या आझमखान यांनी जयाप्रदा यांच्या विरोधात रान उठविले होते. अमरसिंग व आझमखान या दोघांमधील संघर्ष विकोपाला गेला होता. कोणत्याही स्थितीत जयाप्रदाला हरवायचे असा विडा आझमखान यांनी उचलून तसा प्रचारही केला. या काळात काही आक्षेपार्ह ‘सीडी’ वितरित करण्यात आल्याचा आरोप करीत जयाप्रदा यांनी याला आझमखान यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आझमखान यांच्यावर अमरसिंग हेही दररोज तोंडसुख घेत होते. या दोघांमधील वाद पराकोटीला पोहोचला होता. जयाप्रदाला विजयी करण्यासाठी अमरसिंग मतदारसंघात तळ ठोकून बसले असतानाच आझमखान यांनी उघडपणे कॉँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. पण जयाप्रदा येथून विजयी झाल्या.
अखेर अमरसिंग यांच्यापुढे नमते घेत कल्याणसिंग यांनी आझमखान यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली. आझमखान यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंग यांनी दिली. पक्षस्थापनेमध्ये आझमखान यांचा महत्वपूर्ण वाटा होता. ते रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.