Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

भाजप आमदारांच्या अंगावर उभा राहिलाय काटा!
नरेन्द्र मोदी यांचा फुसका बार
संदीप प्रधान
मुंबई, २४ मे

 

लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व कुचकामी ठरले, नरेंद्र मोदी यांचा करिष्मा फुसका ठरला, राज्यातील भाजपच्या एकाही नेत्यात निवडून आणण्याची धमक नाही आणि महाजन-मुंडे पर्वाचा महाराष्ट्रात अस्त झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील भाजपचे बहुतांश आमदार कमालीचे अस्वस्थ असून त्याचा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम राज्यातील भाजपच्या खासदारांची संख्या दुहेरी आकडय़ावरून एकेरीवर आली आहे. केंद्रात व राज्यात काँग्रेसप्रणीत सरकार सत्तेवर असताना राज्यात भाजपला त्याचा लाभ उठवता आला नाही इतकी संघटना कमकुवत व नेतृत्वहीन झाली असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. शिवसेनेचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला कस्पटासमान वागवत होते. आता निकालानंतर तर शिवसेना भाजपला तेवढीही किंमत देणार नाही, अशी भीती आमदार व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर भाजपच्या अपयशाचे खापर फोडणे अनेक आमदारांना मान्य नाही. मनसेमुळे उत्तर मुंबईत राम नाईक यांचा तर ईशान्य मुंबईत किरीट सोमैया यांचा पराभव झाला. त्याखेरीज भाजपला मनसेने फटका दिला नाही. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विदर्भात तसेच मुंबई, कोकणात भाजपला फटका बसला. पालघर, भिवंडीसारख्या ‘अ’ श्रेणीच्या जागा पक्षाने गमावल्या.
देश पातळीवर लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्व कुचकामी ठरले. परंतु २०१४ साली ज्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची आशा होती त्यांचा करिष्माही आताच संपल्याचे आमदार दबक्या आजावात बोलू लागले आहेत. महाराष्ट्रात प्रभारी नियुक्त केलेल्या मोदी यांनी ईशान्य मुंबई, भिवंडी, डहाणू, पुणे, लातूर, नंदूरबार, नागपूर, वर्धा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तेथील भाजपचे उमेदवार उताणे पडले. केवळ धुळे व दिंडोरी येथे मोदींच्या सभेनंतर भाजपचे उमेदवार तरले. नगरची मोदींची सभा रद्द झाली तेथे भाजपचा उमेदवार जिंकला. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांचे महत्व कमी करण्याकरिता मोदींची महाराष्ट्रात वरात काढण्यात आली परंतु मतदारांनी भाजपशी काडीमोड घेतला, अशी टिप्पणी एका आमदाराने केली.
मागील लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश लाभले. त्यावेळी १८० विधानसभा मतदारसंघांत युतीला आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत १२० मतदारसंघातच ती यशाची झळाळी टिकून राहिली. या निवडणुकीत भाजपला ६१ विधानसभा मतदारसंघात आघाडी असल्याचे ढोल पिटले जात असले तरी सक्षम नेतृत्वाअभावी ते यश टिकून राहील याची शाश्वती आमदारांना वाटत नाही.