Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

रेशनिंगच्या दुकानात आता गव्हाऐवजी पीठ?
दत्ता सांगळे
औरंगाबाद, २४ मे

 

स्वस्त धान्य दुकानांमधून पुरविण्यात येणाऱ्या गव्हाचा काळा बाजार थांबविण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना अपयशच आले आहे. त्यामुळे या दुकानांवर गहू देण्याऐवजी थेट पीठच देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल ग्राहकांचा प्रतिसाद कसा असेल यासह अन्य विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पुरवठामंत्री रमेश बंग यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची एक बैठक बोलाविली आहे.
नागरिकांना यापुढे पिठाच्या सीलबंद पिशव्या देण्यात येतील. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार दोन, तीन, पाच आणि दहा किलोंच्या पिशव्यांमध्ये हे पीठ स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे गव्हाचा काळाबाजार बंद होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयाला स्वस्त धान्य दुकानदारांचा विरोध होणार असे गृहीत धरण्यात आले आहे.
पुरवठा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानांवर गहू देणे आता बंदच करण्यात येणार आहे. गव्हाऐवजी ते दळून पीठ (आटा) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय अडचणी येऊ शकतात, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. गव्हापेक्षा पिठाचे आयुष्य कमी असेल. त्यामुळे पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी महिन्याला किती पीठ द्यायला हवे, पिठाच्या पिशव्या साधारणपणे किती किलोच्या असाव्यात, गव्हापासून पिठाची निर्मिती आणि पॅकिंग कोठे करावी आदींवर या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी दळून तेथे पॅकिंग केल्याने दळणवळण सोपे जाणार असले तरी यामुळे गुणवत्तेत फरक पडेल, अशी भीती असल्यामुळे हे काम एकाच ठिकाणी करावे, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.