Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

राज्याच्या ४८ महामार्गावर आता अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर!
मुस्तफा आतार
पुणे, २४ मे

 

महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना ‘गोल्डन अवर्स’मध्ये आवश्यक उपचार देण्यासाठी राज्यातील प्रमुख ४८ महामार्गावर ‘अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर’ उभारण्यात येणार आहेत. यामुळे अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यापूर्वीच आवश्यक ते उपचार मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशिष्ट टोल फ्री क्रमांक फिरविल्यास चोवीस तास ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यातील महामार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र योग्य ते उपचार वेळीच न मिळाल्याने मृत्युमुखी झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे वर्षांकाठी चार हजारांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार दररोज नऊ ते दहा व्यक्ती मृत्युमुखी पडत असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. दिवसेंदिवस अपघातातील जखमींची आणि मृत्युमुखींची संख्या वाढत असल्याने याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठीच राज्याच्या आरोग्य खात्याने आता ज्या महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशा प्रमुख महामार्गावर जखमींना उपचार सुविधा मिळावी, यासाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर’ उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला आहे.
राज्याचे आरोग्य संचालक डॉ. डी. एस. डाखुरे यांनी या ‘अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर’विषयी ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती दिली. ‘शहरात अपघात झाल्यास तेथील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये किंवा ट्रॉमा केअर सेंटरमधून जखमींना उपचार मिळू शकतात; परंतु महामार्गावर होणाऱ्या अपघातानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात पोहोचेपर्यंतच्या ‘गोल्डन अवर्स’मध्ये आवश्यक उपचार मिळणे आवश्यक असतात. जखमींवर आवश्यक ते उपचार व्हावेत, यासाठी महामार्गावर ही अ‍ॅम्ब्युलन्स सेंटर उभारली जातील. ही सुविधा मिळविण्यासाठी विशिष्ट टोल फ्री क्रमांक फिरविल्यास तातडीने महामार्गावर असणारी रुग्णवाहिका काही क्षणांत संबंधित जखमीपर्यंत पोहोचेल. घटनास्थळापासून ते नजीकच्या रुग्णालय किंवा ट्रॉमा केअर सेंटरला पोहोचेपर्यंत त्या दरम्यान रुग्णवाहिकेत असणाऱ्या ऑक्सिजन, बँडेज किंवा अन्य आवश्यक साधनांद्वारे जखमींवर उपचार केले जातील. तीन प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि सहायक असा कर्मचारीवर्ग या रुग्णवाहिकेत असणार आहे. पुणे-बंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पनवेल-गोवा, पुणे-मुंबई, यासह धुळे, ठाणे, नगर अशा राज्यातील ४८ महामार्गावर ही अद्ययावत साधनयुक्त रुग्णवाहिका सेंटर कार्यरत असणार आहे.
४८ महामार्गावर रुग्णवाहिका सुरू क रण्यासाठी सुमारे २४ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नुकताच मंजुरीसाठी ठेवला आहे.