Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

(सविस्तर वृत्त)

हैदराबाद ब्लूज बंगलोर ‘लूज’
डेक्कन चार्जर्स विजेते
जोहान्सबर्ग, २४ मे / पीटीआय

 

टेन्शन..टेन्शन..टेन्शन..कधी डेक्कन चार्जर्स संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद तर कधी बंगलोरचे खेळाडू खुश..तर कधी नेमकी उलट परिस्थिती..क्रिकेट समर्थकांचीही हृदयाची धडधड वाढलेली..कुणी डोळे मिटलेले तर कुणी मनोमन प्रार्थना करताना..इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या येथे झालेल्या डेक्कन चार्जर्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्स या संघातील अंतिम सामन्याचे केवळ असेच वर्णन करता येईल.
बंगलोरला अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना रॉबिन उथप्पाने दोन चेंडू अक्षरश: वाया दवडले आणि हेच टेन्शन प्रचंड वाढले. शेवटच्या तीन चेंडूंत १४ धावांची गरज आणि शेवटी एका चेंडूत ८ धावा. आर.पी. सिंगचा तो अखेरचा चेंडू नोबॉल असेल आणि उथप्पा षटकार खेचून सामन्याचे चित्र पालटवेल असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला. पण उथप्पाला केवळ एक धाव मिळाली आणि डेक्कन चार्जर्सच्या खेळाडूंनी मैदान डोक्यावर घेतले. डेक्कनने ही लढत केवळ सहा धावांनी जिंकली. गेल्या वर्षी तळाला पोहोचलेला संघ यंदा शिखरावर बसला. हिरेजडीत चषकावर यंदा डेक्कनचे नाव कोरले गेले. सहा लाख डॉलरचे घसघशीत इनामही डेक्कनला मिळाले. आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविणाऱ्या बंगलोरच्या अनिल कुंबळेचे विजेतेपदाचे स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही. १६ धावांत चार बळी घेऊन सामन्यात तो सर्वोत्तम ठरला.
बंगलोरने उपान्त्य फेरीप्रमाणेच आजही प्रथम गोलंदाजी करताना डेक्कनला मोठय़ा धावसंख्येपासून परावृत्त केले. १४३ धावांचे लक्ष्य हे बंगलोरसाठी फार मोठे आव्हान नव्हते. मात्र, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यांचे उत्कृष्ट मिश्रण आणि त्याला कर्णधार गिलख्रिस्टची लाभलेली चपळ व अचूक यष्टीरक्षणाची साथ यामुळे या छोटय़ा धावसंख्येचाही बचाव डेक्कनने अतिशय व्यवस्थितरित्या केला. त्यामुळे बंगलोरचे फलंदाजीतील मोहरे एकापाठोपाठ एक माघारी परतले आणि बंगलोरपुढील टेन्शन धावांप्रमाणे वाढत गेले. व्ॉन डर मव्‍‌र्ह (३२), रॉस टेलर (२७) व जॅक कॅलिस (१६) यांचा अपवाद वगळता बंगलोरला फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे बंगलोरला १३७ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
प्रज्ञान ओझाने मनीष पांडे, मव्‍‌र्ह यांचा दूर केलेला अडथळा तर सायमण्ड्सने रॉस टेलर व कोहलीला दिलेला धोबीपछाड त्याला हरमितसिंगसारख्या नवख्या गोलंदाजाने दोन बळी घेऊन दिलेली साथ व त्याचे क्षेत्ररक्षण यामुळे डेक्कनने हा विजय खेचून आणला.
त्याआधी, अवघ्या १६ धावांमध्ये ४ बळी मिळवताना आपले नाणे अजूनही खणखणीत असल्याचे सिद्ध करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार अनिल कुंबळेने डेक्कन चार्जर्सला ६ बाद १४३ धावांवर लगाम लावला. प्रथम फलंदाजीला आमंत्रित करून कर्णधार कुंबळेने पहिल्याच षटकामध्ये गिलख्रिस्टचा त्रिफळा उडवून डेक्कनच्या डावातील हवाच काढून टाकली. या जबरदस्त ‘शॉक’मधून डेक्कनचा संघ शेवटपर्यंत सावरलाच नाही. हर्शेल गिब्सने २८ चेंडूवर काढलेल्या ५३ तसेच अ‍ॅन्ड्रय़ू सायमन्ड्सच्या २१ चेंडूंवरील ३३ धावांमुळे डेक्कनला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
कुंबळेने गोलंदाजीमध्ये आज कल्पकतेने बदल केले. सायमन्ड्सने फटकेबाजीस सुरुवात केली. त्याने विनय कुमारला एक अप्रतिम चौकारही मारली. मग त्याने मोर्चा जॅक्वेस कॅलिसकडे वळवला आणि त्यालाही लागोपाठ दोन चौकार मारले तर रॉल्फ व्हॅन डर मर्वीच्या पहिल्याच षटकात त्याने वँडर्स स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला. परंतु सायमन्ड्सचा धोका वाढत असतानाच बंगळुरूला मोठा दिलासा मिळाला. नवव्या षटकात दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीला परतलेल्या कुंबळेला पुलचा फटका मारण्याच्या नादात चेंडू त्याच्या पॅडला लागून यष्टिवर आदळला. त्यानंतर गिब्स आणि रोहित शर्माने (२४) डेक्कनला शतकाची वेस ओलांडून दिली.