Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

२६/११ हल्ला : पोलीस अद्याप अत्याधुनिक शस्त्रांपासून वंचित !
मुंबई, २४ मे / प्रतिनिधी

 

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना शहीद व्हावे लागले. या हल्ल्याला सहा महिने उलटले असतानाही अद्याप शहर पोलिसांना भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतील अशी अत्याधुनिक शस्त्रे मिळालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अत्याधुनिक रायफली, बुलेट प्रूफ जॅकेट, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसू शकणारे गॉगल, सुसज्ज गाडय़ा आदी सोयीसुविधा पोलिसांना हव्या असून त्याचा खर्च १०० कोटींहून अधिक आहे. बॉम्ब शोधण्यासाठी आणि तो निकामी करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा त्याचप्रमाणे स्फोटके शोधून ती निकामी करणारी यंत्रणा उपलब्ध व्हावी, अशी पोलिसांची मागणी आहे. बॉम्ब निकामी करणारे फिरते युनिट लवकरच मिळण्याची शक्यता असून क्ष-किरण यंत्रणा असलेली सुविधेच्या चाचण्या सुरू आहेत, असे ‘पीटीआय’च्या वृत्तात म्हटले आहे.
अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा हा पाश्चिमात्य देशांकडून होत असल्याने मागणी नोंदविण्यात आली असूनही शस्त्रे मिळालेली नाहीत. ती दीर्घकालीन प्रक्रिया असते. मात्र आता ती लवकरच मिळतील, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी २६/११ रोजी अतिरेक्यांशी मुकाबला करताना वापरलेल्या गाडय़ा या बुलेटप्रूफ नव्हत्या. शहर पोलिसांना जवळपास १५ बुलेटप्रूफ गाडय़ा मिळणार आहेत. घुसखोरीची शक्यता असलेल्या विभागात लष्कराकडे ज्या प्रकारची वाहने असतात तशा प्रकारची वाहने मिळणार आहेत.
शहरातील चौपाटय़ांवर नियमितपणे गस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र पोलिसांनी सज्ज असलेले बंकरही शहराच्या विविध भागांत उभारण्यात येणार आहेत. मात्र पावसाळा जवळ येत असल्याने बंकरची कल्पना तूर्त कितपत यशस्वी होते, त्याबद्दल पूनमूल्र्याकन सुरू आहे.
दरम्यान, अतिरेक्यांचा हल्ला झालेल्या कॅफे लिओपोल्ड हॉटेलमध्ये आता बीयर फेसाळत असली, तेथील वातावरण काही घडलेच नाही असे दिसत असले तरी गोळ्या घुसलेल्या खिडक्यांकडे तेथे येणारा ग्राहक अजूनही कुतूहलानेच पाहतो आहे. गोळ्या घुसलेल्या या खिडक्या तशाच अवस्थेत जपण्यासाठी त्यावर अ‍ॅक्रिलिकचे आच्छादन घालण्यात आले असून व्यावसायिक स्पर्धक त्याकडे व्यावसायिक क्लृप्ती म्हणून तशाच दृष्टिकोनातून पाहात आहेत. परंतु त्यांच्या आस्थापनेमध्ये अशा प्रकारचा हल्ला झाला असता तर त्यांनी काय केले असते, असा सवाल लिओपोल्डच्या व्यवस्थापनाकडून विचारला जात आहे. लिओपोल्डमधील कर्मचाऱ्यांनाही आता ग्राहकांकडून अतिरेकी हल्ल्याबाबतचे प्रश्न अपेक्षित आहेत. ग्राहक अजूनही त्या रात्रीच्या थराराबाबत अनेक प्रश्न विचारतात, परंतु तो मनुष्यस्वभाव आहे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.