Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

डोंबिवलीतील ग्रंथसंग्रहालय स्थलांतराला ‘मनसे’चा कडाडून विरोध
डोंबिवली, २४ मे /प्रतिनिधी

 

पालिकेच्या डोंबिवली ग्रंथसंग्रहालातील पुस्तके ही जनतेची मालमत्ता आहे. जनतेच्या बळावर हे ग्रंथसंग्रहालय चालते. त्यामुळे या ग्रंथसंग्रहालयातील एक पुस्तक पालिका अधिकाऱ्यांनी अन्यत्र स्थलांतराच्या नावाखाली नेण्याचा प्रयत्न केला, तर एकाही पालिका अधिकाऱ्याला डोंबिवलीत फिरकू दिले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे.
राजेश कदम यांनी सांगितले, डोंबिवली शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरातील सामाजिक, सांस्कृतिक संस्था, या शहरातील खासगी, पालिकेची ग्रंथसंग्रहालये ही या शहराची भूषण आहेत. या चळवळीतून डोंबिवली शहराने एक सांस्कृतिक राजधानीचा मान मिळवला आहे. असे असताना केवळ टक्केवारीत बुडालेले पालिकेचे अधिकारी आपल्या स्वार्थासाठी नागरिकांच्या हिताचा विचार न करता पालिकेचे टिळक रोडवरील ग्रंथसंग्रहालय स्थलांतराच्या मागे लागले असतील, तो विचार अधिकाऱ्यांनी सोडून द्यावा. पालिकेचे ग्रंथसंग्रहालय हे नागरिकांची मालमत्ता आहे. या मालमत्तेत हस्तक्षेप करण्याचा अधिकाऱ्यांना कोणताही अधिकार नाही.
आतापर्यंत जनतेच्या सूचनांकडे दुर्लक्ष आणि स्वहित साधण्यात अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी समाधान मानले. म्हणून शहरात अनेक विकासकामे, नागरिक समस्या सोडविण्यामध्ये प्रश्ननिर्माण झाले आहेत. ग्रंथसंग्रहालय एकदा तात्पुरते स्थलांतराच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी स्थलांतरित केले, अधिकाऱ्यांचे खिसे खुळखुळायला लागले की त्यांना पुन्हा ग्रंथसंग्रहालयाची आठवणही येणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रथम ग्रंथसंग्रहालय डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील पालिकेच्या मालमत्तांमध्ये स्थलांतरित करावे. मग ग्रंथालयाची धोकादायक इमारत जमिनदोस्त करण्याचा विचार करावा. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी ग्रंथसंग्रहालय हलविण्याचा विचार करून वाचक सदस्यांना छळण्याचा उद्योग केला तर पालिका आयुक्त गोविंद राठोड, उपायुक्त सुरेश पवार यांना मनसे
जनआंदोलन करून हलविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजेश कदम, विभागाध्यक्ष राहूल कामत, वैशाली दरेकर-राणे, महिला अध्यक्षा दीपिका पेडणेकर यांनी दिला आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील विष्णुनगर पोलिस स्टेशन असलेली जागा पालिकेची आहे, पु. भा. भावे सभागृहातील महसूल विभागासाठी दिलेली जागा पालिकेची आहे. मग या मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका का प्रयत्न करत नाही. फक्त नागरिकांच्याकडून वेळेवर कर भरणा करून घ्यायचा आणि पुन्हा हेच अधिकारी नागरिकांना त्रास देण्यासाठी सरसावणार असतील तर अधिकाऱ्यांचा उद्दामपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा कदम यांनी दिला आहे.
ग्रंथसंग्रहालय स्थलांतरित करू नये यामागणीसाठी मनसे प्रसंगी सह्य़ांची मोहिम राबविल असेही कदम म्हणाले. ‘लोकसत्ता’ने आज ग्रंथसंग्रहालय स्थलांतराची बातमी प्रसिध्द करताच शहरातील जुने जाणकार नागरिक, दर्दी वाचक, साहित्यिक यांना धक्का बसला आहे.