Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

प्रादेशिक

२६/११ हल्ला : पोलीस अद्याप अत्याधुनिक शस्त्रांपासून वंचित !
मुंबई, २४ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना शहीद व्हावे लागले. या हल्ल्याला सहा महिने उलटले असतानाही अद्याप शहर पोलिसांना भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतील अशी अत्याधुनिक शस्त्रे मिळालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अत्याधुनिक रायफली, बुलेट प्रूफ जॅकेट, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसू शकणारे गॉगल, सुसज्ज गाडय़ा आदी सोयीसुविधा पोलिसांना हव्या असून त्याचा खर्च १०० कोटींहून अधिक आहे. बॉम्ब शोधण्यासाठी आणि तो निकामी करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा त्याचप्रमाणे स्फोटके शोधून ती निकामी करणारी यंत्रणा उपलब्ध व्हावी, अशी पोलिसांची मागणी आहे.

डोंबिवलीतील ग्रंथसंग्रहालय स्थलांतराला ‘मनसे’चा कडाडून विरोध
डोंबिवली, २४ मे /प्रतिनिधी

पालिकेच्या डोंबिवली ग्रंथसंग्रहालातील पुस्तके ही जनतेची मालमत्ता आहे. जनतेच्या बळावर हे ग्रंथसंग्रहालय चालते. त्यामुळे या ग्रंथसंग्रहालयातील एक पुस्तक पालिका अधिकाऱ्यांनी अन्यत्र स्थलांतराच्या नावाखाली नेण्याचा प्रयत्न केला, तर एकाही पालिका अधिकाऱ्याला डोंबिवलीत फिरकू दिले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे. राजेश कदम यांनी सांगितले, डोंबिवली शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे. या शहरातील सामाजिक, सांस्कृतिक संस्था, या शहरातील खासगी, पालिकेची ग्रंथसंग्रहालये ही या शहराची भूषण आहेत. या चळवळीतून डोंबिवली शहराने एक सांस्कृतिक राजधानीचा मान मिळवला आहे.

नालेसफाईसाठी उद्धव ठाकरे यांचे साकडे
मुंबई, २४ मे / प्रतिनिधी

यंदाच्या पावसात मुंबई जलमय होण्याची भीती आता पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सतावत आहे. मात्र यासाठी ‘एमएमआरडीए’ला धारेवर धरणाऱ्या ठाकरे यांनी आता पालिका आयुक्तांना नाले ताबडतोब साफ करण्याचे फर्मान सोडले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यासाठी ठाकरे हे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत.
सध्या मुंबईत अनेक ठिकाणी ‘एमएमआरडीए’, पालिकेच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. नालेसफाई समाधानकारक झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई जलमय होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महापौर शुभा राऊळ यांनी याचा दोष ‘एमएमआरडीए’वर टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनीही महापौरांची री ओढत मुंबई जलमय झाली तर जबाबदारी ‘एमएमआरडीए’ची असेल, असे म्हटले आहे. गेल्या आठवडय़ात ठाकरे यांनी नालेसफाईची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील दहिसर, पोईसर नदीची पाहणी केल्यावर ठाकरे यांनी नालेसफाई ताबडतोब पूर्ण करा, असे आयुक्तांना सांगितले.
आतापर्यंत ‘एमएमआरडीए’ला दोष देणाऱ्या ठाकरे यांनी अचानक समन्वयाची भूमिका घेत मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. एमएमआरडीए, पालिका आणि इतर यंत्रणामधील वाद मिटला पाहिजे, असेही ठाकरे यांचे म्हणणे आहे.