Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

महापालिकेत आज काय होणार?
नगर, २४ मे/प्रतिनिधी

महापालिकेत उद्या (सोमवारी) काय होणार? स्वीकृत सदस्य व २ समित्यांची निवड होईल की पुढे ढकलली जाईल? निवड झाली तर कोणते चेहरे असतील? पाणीप्रश्नावर शहर एकीकडे तापले असताना व मुख्य जलवाहिनीच्या स्थलांतराचा खर्चिक प्रश्न पुढे आला असताना मनपाच्या राजकीय वर्तुळातील सगळी चर्चा मात्र या प्रश्नांभोवतीच फिरते आहे. विरोधी सेना-भाजपच्या गटात नोंदणी झालेल्या, पण ऐनवेळी मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला साथ देणाऱ्या संजय गाडे, अनिल शेकटकर व इंदरकौर गंभीर या ३ नगरसेवकांनी त्यांच्या गटनोंदणीचे प्रकरण उच्च न्यायालयात नेले आहे.

शेलार यांचा तडकाफडकी राजीनामा
कुकडी आवर्तनाचे आश्वासन पाळले नाही

श्रीगोंदे, २४ मे/वार्ताहर

पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात कुकडीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर यांनी न पाळल्याच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी’चे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा करताना शेलार यांनी निंबाळकर, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष वल्लभ बेणके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करीत वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर हल्ला चढविला. कुकडीच्या येडगाव धरणातून आवर्तन सोडावे, यासाठी शेलार यांनी ११ मे रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

वडिलांचे न्यायालय
सन १९२७ ते १९३१ दरम्यान धांदरफळ खुर्दची लोकसंख्या सुमारे तीनशे होती. बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. गावी शाळा नव्हती. थोडीफार मुले असत. ती गुरे मेंढय़ा, शेळ्या राखण्यात गुंतलेली असायची. मी सहा-सात वर्षांचा असताना गावात नाना बळवंत कोकणे नावाचा माझ्याच वयाचा सवंगडी व मी असे दोघेच असायचो. दोघांनी करमणुकीसाठी खेळायचे ठरवले, तरी विटी-दांडू वा गोटय़ा असे खेळ किती वेळ खेळणार? अन् पावसात तर ते अशक्यच असायचं. त्यामुळे आम्ही दोघे चिंचोक्याचा नक्की दुऱ्याचा खेळ खेळत असू. या खेळात चिंचोके हरायचे किंवा जिंकायचे.

शहरातील कपातीत घट; शेतीसाठी २ तास जादा वीज
नगर, २४ मे/प्रतिनिधी
वीजनिर्मिती वाढल्यामुळे ऐन मे महिन्यात वीजकपातीची तीव्रता काहीशी कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. नगर शहर व जिल्ह्य़ात गेल्या ८-१० दिवसांपासून वीजकपातीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. अपवाद आहे फक्त वादळी वाऱ्यामुळे तारा तुडून पुरवठा खंडित होण्याचा.

पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर चोरटय़ांची दगडफेक
श्रीरामपूरला बारा घरफोडय़ा, तीन लाखांचा ऐवज लंपास
श्रीरामपूर, २४ मे/प्रतिनिधी
शहरात पंधराजणांच्या चोरांच्या टोळीने अक्षरश धुमाकूळ घातला. बारा घरफोडय़ा क रून तीन लाख रुपयांहून अधिक रुपयांचा ऐवज लुटला. तरुणांनी माहिती दिल्यानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक क रून चोरटे पसार झाले.

दोन सख्ख्या भावांचा आगीत होरपळून मृत्यू
शॉर्टसर्किटमुळे फटाक्यांचा स्फोट

राहाता, २४ मे/वार्ताहर
घरात ठेवलेल्या फटाक्यांच्या साठय़ाचा शॉर्टसर्किटमुळे स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील नवनाथनगर उपनगरात हा प्रकार घडला. या घटनेत अन्य दोनजण गंभीर जखमी झाले.

‘डॉक्टरांनी स्वसंरक्षणार्थ हत्यारे बाळगावी की गुंड पाळावेत’
नगर, २४ मे/प्रतिनिधी

डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देताना स्वसंरक्षणासाठी आता हत्यारे बाळगावी की गुंड पाळावेत, असा खडा सवाल नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे (निमा) जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विचारण्यात आला. अकोले तालुक्यातील डॉ. विनायक भोर व सहकारी डॉक्टरांवर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन ‘निमा’ने निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना दिले. डॉक्टरांवरील हल्ल्यांसंदर्भात केलेल्या कायद्याची अंमलबजावणी सक्षमपणे होत नसल्यामुळे अशा घटनांत वाढ होत आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करावी; अन्यथा ‘निमा’ तीव्र आंदोलन करेल, असेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात ‘निमा’चे शहराध्यक्ष डॉ. मंगेश काळे, सचिव डॉ. सुनील बोठे, कोषाध्यक्ष डॉ. रविकांत पाचरणे, डॉ. रवींद्र मिरगणे, डॉ. शांतिलाल कटारिया, डॉ. नीलेश जपसे, डॉ. हेमंत कुलांगे आदींचा समावेश होता.

मजलेचिंचोली येथे २५ हजारांची घरफोडी
नगर, २४ मे/प्रतिनिधी
बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ांनी २५ हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना काल मध्यरात्री नगर तालुक्यातील मजलेचिंचोली येथे घडली. या प्रकरणी काशिनाथ नारायण आव्हाड (वय ६०, रा. मजलेचिंचोली, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आव्हाड कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरटय़ांनी बंगल्याचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व ५ मोबाईल असा २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार धनगर करीत आहेत.

मनसेतर्फे आजपासून नगर नवनिर्माण अभियान
नगर, २४ मे/प्रतिनिधी
शहराच्या सुनियोजित विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या (सोमवार)पासून ‘नगर नवनिर्माण अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता भिस्तबाग चौक, प्रभाग १ येथे माजी सैनिक शिवाजी पवार यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हा प्रवक्ते केतन नवले यांनी दिली. दि. २८ जूनपर्यंत चालणाऱ्या या अभियानात शहरातील सर्व ६५ प्रभागांतील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला जाणार आहे. माहितीचा फॉर्म नागरिकांकडून भरून घेत त्यांच्या प्रभागाच्या विकासाबद्दल असलेल्या कल्पना समजून घेतल्या जाणार
आहेत.