Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २ ० ० ९

झिंगूनी डोलू नका, लक्ष द्या चोहिकडे, द्या कालवैशिष्टय़ाकडे..
साल २००८ मधील जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस असलेले मार्केटचे स्वरूप महिना संपता संपता पार बदलून गेले होते. काही अंदाज येण्याच्या आत अनेक गुंतवणूकदारांची स्वप्ने पार धुळीस मिळाली होती. त्यानंतरचे संपूर्ण २००८ साल म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे, असे बनून गेले होते. ऑक्टोबर २००८ पर्यंत तर मार्केटबद्दल काही बोलणे हे पाप होऊन बसले होते.
त्यानंतरच्या काळात मात्र मार्केट हळूहळू सावरू लागले आणि आज निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थाने तेजीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. जवळजवळ १० वर्षांनंतर आपल्या देशाला एक स्थिर व मजबूत सरकार मिळाले आहे.
येणाऱ्या काळात भारताची आर्थिक सूत्रे, जुलै १९९१ साली सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाचे (लिबरलायझेशन,

 

प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन सारांशात ‘एलपीजी’) जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती असतील. महत्वाची बाब म्हणजे येत्या पाच वर्षांत कम्युनिस्टांसारख्या राजकीय तत्त्वप्रणालीच्या दबावतंत्राशिवाय मुक्तपणे भारताचे अर्थकारण घडू शकेल. मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या बदलाची योग्य दखल घेत १८ मे रोजी ‘सेन्सेक्स’ २१०० अंशांनी उंचावून नवीन सरकारला जणू २१ तोफांची सलामीच दिली.
बदललेल्या परिस्थितीमुळे मधल्या काळात मार्केटपासून दुरावलेले वा दुखावलेले सगळेच परत येऊ लागतील. आता महत्वाचा प्रश्न असा की, येत्या काळातील राजकीय आणि आर्थिक भवितव्य सुखावणारे दिसत असले तरी मार्केट सर्वानाच सरसकट नफ्याच्या संधी उपलब्ध करून देऊ शकते काय? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. शेअर बाजार हा खरेदी व विक्रीदारांच्या देवाणघेवाणीचा खेळ आहे. सौद्यामध्ये दोघांनाही एकाच वेळेस नफा होणे शक्य नाही. खरेदीदार किंवा विक्रेता यापैकी कुणातरी एकाचा तोटा होतो. हे नुकसान एक तर त्याच्या मुद्दलातून झालेले असते किंवा त्याचा नफा कमी झालेला असतो.
आपापल्या कुवतीप्रमाणे मुद्दल घेऊन शेअर बाजारात नफा मिळविण्याच्या इच्छेने उतरलेला गुंतवणूकदारा या पुढचे पाऊल मात्र बहुतांशी विविध माध्यमांतून होणाऱ्या चर्चा आणि ऐकीव माहितीवर आधारून टाकत असतो. फार क्वचितच तो एखाद्या शास्त्रशुद्ध तंत्राचा अवलंब करीत आपले निर्णय घेत असतो. मार्केटमध्ये सातत्याने काम करून नफा कमावण्यासाठी एखादे शास्त्रशुद्ध तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. ‘टेक्निकल अ‍ॅनालिसिस’ किंवा ‘फंडामेंटल अ‍ॅनालिसिस’चा अभ्यास करणे ही एक प्रदीर्घ साधना आहे. आता तेजी उंबरठय़ावर आली असताना इतका प्रदीर्घ अभ्यास करण्यास वेळ नाही. यावर एक उत्तम पर्याय आहे आणि तो म्हणजे peak and trough progression. हे अतिशय हुकमी तंत्र अवघ्या काही तासांत आत्मसात करता येते व ७० ते ८० टक्के यश हमखास देते. या तंत्राचे महत्वाचे वैशिष्टय़ असे की, हे तंत्र दीर्घकालीन व अल्पकालीन गुंतवणूक तसेच ‘डे ट्रेडिंग’साठीही सारखेच उपयुक्त ठरते. मात्र या तंत्राच्या बारकाव्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणत्याही वयोगटातील, शैक्षणिक व व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेली व्यक्ती peak and trough progression सहजपणे शिकू शकते.
सद्यस्थितीत असलेले अनुकूल वातावरण व येऊ घातलेल्या तेजीचा गुंतवणूकदारांनी भरकटून न जाता जास्तीत जास्त फायदा घ्यावा याच उद्देशाने ‘झिंगूनी डोलू नका, लक्ष द्या चोहिकडे, द्या कालवैशिष्टय़ाकडे’ या कवी माधव ज्युलियन यांच्या काव्यपंक्ती उद्बोधक वाटतात.
गेल्या काही महिन्यात वेळोवेळी केलेल सेन्सेक्सचे विवेचन काळाच्या कसोटीवर उतरले आहे. जूनच्या अखेरीस येणाऱ्या नवीन सरकारच्या अर्थसंकल्पापर्यंतच्या सेन्सेक्सच्या संभाव्य वाटचालीचा आढावा घेणे सद्यस्थितीत क्रमप्राप्त ठरेल.
आकृतीत (weekly chart) दाखविल्याप्रमाणे ६ मार्च २००९ रोजी ८,०४७.१७ चा नीचांक देऊन सेन्सेक्सने २० मे २००९ रोजी १४,९३०.५४ चा उच्चांक प्रस्थापित केला आहे. परंतु याच काळातील MACD कडे लक्ष देता एक उतरण (Correction) अपेक्षित असल्याचे निर्देशिक करीत आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीपासून एक उतरण अपेक्षित होती, परंतु सर्व अडथळे (Resistances) झुगारून सेन्सेक्सने मुसंडी मारली. आता जून महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी कोणतेही महत्वाचे बदल होणार नसल्याने या काळात सेन्सेक्स एक उसंत घेऊन प्रलंबित उतरण पूर्ण करेल असे चित्र दिसत आहे. ही उतरण साधारण ११,५०० च्या पातळीपर्यंतही येऊ शकेल. या नंतरच्या काळात सेन्सेक्स १२,५०० ते १५,५०० च्या दरम्यान चढ-उतार करीत राहील व कालांतराने (आर्थिक विकास दर पुन्हा नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर) वरील टप्पा गाठेल. या संदर्भातील विवेचन मागील काही लेखात विस्तृतपणे देण्यात आले आहे.
प्रा. प्रवीण मोकाशी
www.equitymonk.com/ ९८१९०३१०८७