Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २ ० ० ९

आता मात्र, खरेदीची HURRY हवी
अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने, असे ११ मे ला म्हटले होते. फक्त सात दिवसात निवेशकाना त्याचा प्रत्यय आला आहे. शेअर बाजारात दोन सर्किट फिल्टर्स लागले. निर्देशांक २११० अंशांनी वर गेला आणि या लेखात सतत पाठपुरावा केलेले बँक शेअर्स, इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा, बांधकाम क्षेत्रातले शेअर्स प्रचंड वाढले. बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांचे शेअर्स दोन दिवसात २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढले. लार्सेन टुब्रो १००० वरून १४०० रुपायंवर गेला. अ‍ॅबन ऑफशोअर ४०० रुपयांवरून ९२५ रुपयांपर्यंत चढला. युनिटी इंफ्रा १९० रुपयांपर्यंत व शिववाणी ऑईल २९० रुपयांना भिडले आणि निर्देशांक ९००० ते १०००० मध्ये घुटमळत राहील असे म्हणणाऱ्यांना आता तो १६०००, १८००० सुद्धा होईल असे वाटू लागले आहे.
डाव्या पक्षांचा वेताळ मानेवरून उतरल्यामुळे आर्थिक सुधारणा त्वरेने हव्यात असे पंतप्रधानांपासून सर्वचजण सांगत आहेत.

 

त्यामुळे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत शेअरबाजारात उत्साह वाढत्या प्रमाणात राहील. मंदी असताना, संसद त्रिशंकू असेल असे वाटत असतानाही या लेखमालेत योग्य भावाना शेअर्स घ्या हेच सात्याने सांगितले जात होते. ज्यांनी तसे शेअर्स घेतले असतील त्यांना प्रचंड फायदा गेल्या आठवडय़ात दिसला असेल. विशेषत: रिअ‍ॅल्टी क्षेत्रातल्या निवेशकांना जास्त नफा झाला असेल.
त्या क्षेत्रातल्या कंपन्यांना खूप मोठी कर्जे आहेत. चढय़ा भावाला लोक निवासिका खरेदी करत नाहीत. त्यांचा कॅश फ्लो खराब आहे असे बव्हंतांशी विश्लेषक सांगत होते. एक अविश्वासाचे वातावरण त्यांनी निर्माण केले होते. पण लोकांना घरे लागणारच आहेत. विशेषत: मुंबईत तर झोपडपट्टय़ांचे पुनर्निर्माण होईलच. तिथली मोडकळीला आलेली घरे पुन्हा बांधली जातील व कर्जे एका बाजूला असली तरी त्याची ‘लँड बँक’ शाबूत आहे या मुद्दय़ावर ही लेखमाला लक्ष केंद्रित होती. विश्लेषकांनी गदारोळ करून मुंबईतल्याच एचडीआयएल ७० रुपयांवर, ऑर्बिट कॉर्पोरेशन ४२ रुपयांवर, पेनिन्सुला लँड १८ रुपयांवर आणला होता. निवडणुकांमधील निकालामुळे विश्लेषकांचे निराशात्मक मुद्दे एकदम वितळले का? आता हे सर्व शेअर्स तिप्पट, चौपट झाले आहेत व नवीन निवेशनासाठी हाताबाहेर गेले आहेत.
दीर्घ मुदतीसाठी टाटा स्टील व एल अँड टी बाबत सतत लिहिले होते तेव्हा इतर विश्लेषकांच्या मानेवर कोरसच्या युरोपातील कामगार कपातीचे, विक्री कोसळल्याचे भूत स्वार होते व लार्सेन टुब्रोबाबत सत्यमच्या गुंतवणुकीचा वेताळ होता. तरीही निवडणुकीच्या निकालामुळे कोरसचा तोटा कमी झाला नाही की एल अँड टीची सत्यममधली गुंतवणूक हललेली नाही. तरीही गेल्या बुधवारी टाटा स्टील ३७३ वर गेला. जानेवारी- फेब्रुवारीत तो २०० रुपयांखाली होता व एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात तो २४६ रुपयाला होता.
युनिटी इन्फ्रा ११५ रुपयाला होता तेव्हा कुणीही अन्य विश्लेषक त्याच्याकडे बघत नव्हते. या लेखमालेत तो ११५ रुपयाला होता तेव्हा सूचित केला होता. तो आता ७० टक्के वाढला आहे.
सध्याच्या या चढत्या बाजारात बरेच शेअर्स हाताबाहेर गेले आहेत. एकादी प्रतिक्रियात्मक घट आल्याखेरीज टाटा स्टील, बॉम्बे डाईंग, सेंच्युरी टेक्सटाईल्स, एचडीआयएल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भेल, स्टेट बँक हाताला लागणार नाहीत. पण त्याऐवजी अजूनही अन्य विश्लेषकांचे लक्ष नसलेल्या इरा इन्फ्रा व गोदावरी पॉवर अँड इस्पात, तसेच इंडियन ओव्हरसीज बँक यांची खरेदी हितकारक ठरेल.
इरा इन्फ्राची मार्च २००९ वर्षांची विक्री २३७६.५२ कोटी रुपयांची होती. करोत्तर नफा २०२.५७ कोटी रुपये होता. भागभांडवल २८.७१ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १४.११ रुपये आहे. तिची गंगाजळी ८५७ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे पुस्तकी किमत दर्शनी किमतीच्या ३० पट म्हणजे ३०८ रुपये आहे. सध्याचा भाव फक्त ८३ रुपये आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर ६ पट पडते. कंपनीने प्रवर्तकाना ८५ रुपयाने परिवर्तनीय रोखे देण्याचे नुकतेच ठरवले आहे. गेल्या सहा वर्षांची (मार्च ०३ ते मार्च ०८) विक्री अनुक्रमे १०१, १०९, १५६, ३११, ७६३, १४८४ कोटी रुपये होती व नक्त नफा अनुक्रमे दोन, तीन, पाच, २७, ७९ व १२१ कोटी रुपये होता. या आकडय़ावरून कंपनीची सतत होणारी प्रगती लक्षात यावी. लाभांशाबाबत मात्र कंपनी चिकू आहे. २००८ सालचा लाभांश शेअरमागे फक्त दोन रुपये होता. २००४ साली तिने दोनास एक या प्रमाणात बक्षीस भाग दिला होता. वर्षांतील कमाल भाव १३१ रुपये होता व किमान भाव ६३ रुपये होता. त्यामुळे निदान ४० टक्के भाववाढ वर्षभरात मिळावी.
गोदावरी पॉवर व इस्पात कंपनीचा शेअर घेतला तर त्यात पोलाद व ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांचा फायदा होईल. मार्च ०९ वर्षांचे कंपनीचे आकडे अजून जाहीर झालेले नाहीत. पण डिसेंबर ०८ अखेरच्या नऊ महिन्यांची विक्री १०९६ कोटी रुपयांची होती व नक्त नफा ९३.८४ कोटी रुपये होता. भागभांडवल २६.९४ कोटी रुपये आहे. नऊ महिन्याचे शेअरगणिक उपार्जन ३४ रुपये आहे. सध्याचा ९० रुपयांचा भाव बघता dIaY/CX गुणोत्तर फक्त सव्वादोन पट दिसेल. गेल्या बारा महिन्यातला भाव ३७७ रुपये होता. त्यामुळे वर्षभरात वा त्याआधीही शेअरचा भाव दुप्पट व्हायला हवा अशी अपेक्षा आहे.
भारतात आर्थिक सुधारणा आता वेगाने होतील या भरवशावर आता विदेशी वित्तसंस्थांचा ओघ पुन्हा इथे सुरू होईल. या कंपन्यांना निर्देशांक व निफ्टीतल्या कंपन्या,बरोबर वरच्या प्रमाणे कमी dIaY/CX गुणोत्तर असलेल्या पण निदान हजार कोटी रुपये विक्री असलेल्या कंपन्या निवडतात. गेल्या ऑक्टोबरपासून स्वदेशातले नुकसान भरून काढण्यासाठी असे शेअर्स त्यांनी कवडीमोलाने विकले होते. ते नुकसान पुन: अशाच जास्त नफा देऊ शकणाऱ्या कंपन्यांच्या खरेदीत भरून निघेल, याची जाणीव यांना आहे. एका टाटा स्टीलच्या किमतीत चार गोदावरी पॉवरचे शेअर्स येऊ शकतात. गोदावरी पॉवरने जर पुन्हा १८० रुपये भाव दाखवला तर त्याचा अर्थ टाटा स्टीलने ७५० रुपयाचा भाव दाखवल्यासारखा आहे. तेव्हा आता निवेशकानी पुन्हा थोडे धाडस दाखवून जोखीम घेतली तर तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे-
‘पिकलिया सेताचा।
आम्हा देई वाटा।
चौधरी गोमटा।
पांडुरंग’ असे म्हणता येईल.