Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २ ० ० ९

‘न भूतो, न भविष्यति..’

सोमवारी शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अप्पर सर्किट’ लागले. आताही डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होणार याला सकारात्मक प्रतिसाद देत बाजाराने गुंतवणूकदारांना एक सोनेरी दिवस दाखविला. आता गुंतवणूकदारांनी एक आठवडा खरेदीसाठी थोडा संयम बाळगावा. कारण बाजार आता खूप चढला आहे आणि थोडे प्रॉफिट-बुकिंग येईल असे वाटते. पंरतु

 

जो बाजार १२,८२० अंशांच्या स्तरावर बंद होत नाही, तोवर घाबरण्याचे काही कारण नाही. आता तेजीची कास धरावी लागेल. मे महिन्याच्या अखेपर्यंत सेन्सेक्स १६,००० अंशांनाही स्पर्श करू शकेल. म्हणजे मागील वर्षांतील नीचांकापासून बाजार जवळजवळ दुप्पट झालेला असेल. सेन्सेक्सच्या चढत्या पाऱ्याबरोबर बाजारातील मानसिकताही बदलत आहे. दलालांकडे नवीन डीमॅट खाते उघडण्याचे प्रमाण दरमहा प्रत्येकी ५० वरून पाचपट अधिक २५० वर गेले आहे. विदेशी वित्तसंस्थांनी (एफआयआय) देखील सतत खरेदी सुरू ठेवली आहे. पुढील आठवडय़ात बाजारात स्थिरता आल्यावर सामान्य गुंतवणूकदारांनी खरेदी करायला हवी. अन्यथा पुन्हा एकदा येणाऱ्या तेजीचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना घेता येणार नाही. विदेशी वित्तसंस्थांनी यापूर्वीच्या आठवडय़ात ‘फ्रंटलाइन’ समभागांमध्ये सतत विक्री केली आणि ‘मिडकॅप’मध्ये खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. तीन आठवडय़ांपूर्वी लिहिलेल्या लेखात मे महिना शेअर बाजारात इतिहास घडविणार असा उल्लेख केला होता. तसेच मागील आठवडय़ात खरेदीसाठी सुचविलेल्या सर्वच शेअर्सचे भाव आताशी भरपूर वाढले आहेत. उदा. एल अ‍ॅण्ड टी, बँक ऑफ बडोदा, जेएसडब्ल्यू स्टील, एलआयसी हौसिंग, एबीबी, जेट एअरवेज वगैरे. बाजारात सध्या केर्न इंडिया, स्ट्राइड अर्कोलॅब, गेटवे डिस्ट्रीपार्क यासारख्या शेअर्सवर दिग्गजांची नजर आहे. याच पठडीत सांगायचे झाल्यास मुलांच्या शिक्षणाची तजवीज करायची असेल तर आतापासून ‘अ‍ॅप्टेक’चे शेअर घेतलेले बरे ठरेल. दीर्घकालीन विचार करता, अदानी एक्स्पोर्ट, ताज जीव्हीके, डॉनियर इंडस्ट्रीज हेही उत्तम! परंतु या सर्वाबाबत स्टॉप लॉस ठेवायला विसरू नका. येणारे दिवस ‘न भूतो न भविष्यति’च ठरतील..
निमीष शाह,
९८२०१७२८९९ / nimishshah@live.com