Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २ ० ० ९

‘अजातशत्रू’
विसपुते मेडिकल स्टोअर्सचे भाऊसाहेब विसपुते मला सारखी आठवण करून द्यायचे.. ‘आपण एकदा मायका इंजिनीयरिंग (इंडिया) प्रा.लि.चे कार्यकारी संचालक प्रशांत जयवंत काशीकर याना भेटाच! औद्योगिक क्षेत्रातील एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून सांगतो.’ वसईतल्या त्यांच्या कार्यालयात एकदाची भेट झाली. पहिल्या भेटीतच प्रशांत नावाप्रमाणे ते शांत, अथांग, सहृदयी, प्रसन्न व बंधुभाव बाळगणारे वाटले. प्रशांत काशीकर यांच्याशी गप्पागोष्टी करता करता त्यांचा जीवनपट उलगडत गेला. घरात धार्मिक, सामाजिक, श्रमसंस्काराची परंपरा आणि पोटासाठी म्हणून यंत्रतंत्राशी झटापट. म्हण जे प्रशांत काशीकर आपल्या परंपरांचे मंत्र जपतच आधुनिक यंत्राशी दोस्ती करीत आपला मायका उद्योग वाढवीत होते. शत्रूत्व न वाढविता एकत्र येऊन विकास करायचा हा त्यांचा ध्यास बनला. दोन घास पोटात ढकलताना पाची बोटांचा उपयोग करावा लागतो त्याप्रमाणे.
मग प्रशांत काशीकराना अजातशत्रू म्हणायचे कां? यासाठी शब्दकोशाची पाने चाळून पाहिली. अजातशत्रू शब्दातील निरागसपणा, भाबडेपणा हे भाव तर उद्योजकीय व्यक्तिमत्त्वाला फटकून वागणारे. यावर प्रशांत काशीकर यांनाच प्रश्न केला तर तेवढय़ाच शांतपणे ते म्हणाले, ‘‘हो, इथं मी कमी पडतो. उद्योजकांना भावुकता परवडत नाही हे खरे आहे. तरी संवेदना

 

हरवून चालत नाही. योग्य ठिकाणी, असावी तितकी भावुकता ठेवावी लागते. आणि अनुभवाने हे जमून जाते.’’
प्रशांत काशीकर प्रॉडक्शन इंजिनीयरची पदवी घेऊन दोन दशकापूर्वी वडिलांच्या छोटय़ा उद्योगात उतरले. त्यावेळी चार एक कामगार, सोळा-सतरा लाखाची उलाढाल होती. बदलत्या तंत्रज्ञानाची दखल घेत, सहकाऱ्यांची साथ जोडून एकूण उत्पादनात विविधता आणली. मायकानंतर संदीप एन्टरप्रायझेस, दत्तलक्ष्मी इंडस्ट्रीज असा एक समूह उभा केला. शिवाय पुण्यात विस्तारासाठी मोठी जागा घेतली. उत्तरांचल राज्यात रुद्रपूर येथेही एका उद्योग घटकाचा करार केला. कित्येकाना रोजगार व कोटीच्या भाषेतील उलाढाल हे प्रशांत काशीकर यांचे उद्योजकीय यश ठरते. आपल्या उत्पादनांची निर्यात केली. इराण, उझबेकीस्तान इथल्या प्रदर्शनात भाग घेतला.
विशेष म्हणजे प्रशांत काशीकर मायका एके मायका, कंपोनन्टस दोन्ही चार असे न करता त्यानी आपल्या काशीकर उद्योगसमूहात उत्पादनांची, उत्पादकतेची व संशोधनाची कास धरली. ग्राहकाला काय पाहिजे ते आणि तसे दिले. मंदीचा काळ म्हणून स्वत:पासून काटकसर सुरू केली, अगदी हलकीसलकी कामे हाती घेतली. श्रमाचा गंध हाच त्यांचा सुगंध ठरला. म्हणून तर त्यांच्या उद्योग समूहात ७०० प्रकारचे शीट मेटल कंपोनन्टस तयार होतात. शिवाय शंभर एक असे पार्टस्, विविध उद्योगघटकांचे फेब्रिकेटेड असेम्ब्लीज ही त्यांची विशेषत: ठरली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगातील उपकरणे, औषधे उत्पादनांचे लॅब, कृषी अवजारे, इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रॉनिक पॅनेल्स, गरजेनुसार फर्निचर, आणि कुणाला तांत्रिक सल्ला हवा असेल तर तेही प्रशांत काशीकर देऊ करतात. अशा कामाच्या पूर्ततेसाठी त्यांच्याकडे अद्यावत मशिनरी असून अगदी उत्पादनाच्या डिझाइनपासून ते डाय व फिनिश्ड प्रॉडक्टपर्यंतची त्यांची झेप कौतुकास्पद वाटावी. महिंद्र, बजाज, गोदरेज, बियाणीसारख्या कंपन्यांची कामे त्यांच्याकडे असतात. फ्रान्सच्या मार्कोनी यांनी पियानोच्या काही सुटय़ा भागांसाठी मायकाची निवड केली हे एक त्यांना जागतिक स्तरावरचे प्रमाणपत्रच वाटते. उत्पादन प्रक्रियेत बदल, प्रयोग करीत उत्पादन दर्जा कायम ठेवून, कमी किंमत हा त्यांचा ध्यास आहे. आणि ही प्रक्रिया ते आपल्या सहकाऱ्यांपर्यंत नेतात. अशा प्रक्रियेतून त्यांनी इझी मोबाइल वार्डरोबची निर्मिती केली. म्हणजे कुठेही नेण्यासारखे, फोल्डिंग कपाट. अशा विविध औद्योगिक उत्पादनांची यशस्विता फार थोडय़ांना शक्य होते, ते प्रशांत काशीकर करू शकतात. ही त्यांची वेगळी उद्योजकता अभावानेच आढळते असे म्हणावे लागेल.
प्रशांत काशीकर यांचा उद्यमी जीवनपट उलगडताना शत्रुत्व नको ही त्यांची सहिष्णुता नजरेत भरते. आपले सहकारी कोणी चाकर नाहीत ते आपल्या उद्योग समूहाचे अंग आहेत अशी त्यांची भावना असते. प्रशिक्षणावर त्यांचा भर असतो. कौटुंबिक सहल, त्यांच्या खेळात ते सहजतेने समरस होतात. काहींना तर त्यांनी स्वतंत्रपणे वर्कशॉप थाटून दिले. एकाने तर मायकामधला कुशल कारागिराला घेऊन स्वतंत्र उद्योग उभा केला. कारण तोही प्रॉडक्शन इंजिनीअर होता. त्यावर प्रशांत काशीकर नाराज नव्हते. काही महिन्यातच त्याचा उद्योग पडला. हे आपले काम नाही म्हणून तो परत मायका जॉइन केला. हा भलेपणा प्रशांत काशीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्टय़ ठरावे. किंबहुना प्रत्येकाला ‘तुझ सगुण म्हणू रे’ पंथातला ठरावा. ‘माझ्या भोवतालच्या आप्तइष्टांकडून मी काही तरी शिकत राहिलो’ असे प्रशांत काशीकर सांगून जातात. वडिलांनी त्यांना श्रमाची सवय लावली. शाळेत असल्यापासून ते आपल्या कामगारांबरोबर काम शिकायचे. प्रसंगी रात्री गोणपाटावर झोपायचे. आईचा साधेपणा जाणवून जायचा. आजी- लक्ष्मीबाईचा धार्मिकपणा, घरोबा, सुखावून ठेवायचा. काका- रवींद्र काशीकर तर समाजात रमलेले, एका ऋषितुल्य व्यक्तीचा सहवास लाभायचा. आतेभाऊ दीपक यंदे त्यांचा मुलगा कुणाल यांची उद्योगातील संगत सोबत प्रेरक ठरते. आजही हे ‘पितापुत्र’ मायकात आहेत. आणि पत्नी डॉ. प्राची आपला व्याप, मुले सांभाळीत उद्योजकाची अर्धागिनी असावी अशी साथ देते. अशा प्रकारे प्रशांत काशीकर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वाटेकऱ्यांची माहिती देतात.
मी मध्येच प्रशांत काशीकरांना छेडले ‘उद्योजकाची पत्नी असावी अशी..’ हे काही समजले नाही. यावर ते म्हणाले, ‘उद्योजक घडत असतो. पहिल्या पिढीत तर तो घडविला जातो. तेव्हा त्यांच्या कुटुंबातील माता, बहीण, आजी विशेष करून पत्नीचा रोल प्रभावी ठरतो. त्या दृष्टीने त्या सक्षम असाव्यात असे माझे मत आहे.
प्रशांत काशीकर जे शिकले, जे घेतले ते समाजात वाटून देतात. त्यांच्या के. जी. वर्गापासूनचा मित्र मिलिंद दामलेंना हे माहीत आहे. शिवाय पांचाळ युवा संघ, वसई इंडस्ट्रियल असोसिएशन, सॅटर्डे क्लब अशा औद्योगिक, सामाजिक संस्थांतून त्यांचा सहभाग असतो. वर्षांचा विचार करताय धान्य पिकवा, दहा वर्षांसाठी झाडे लावा, आणि आयुष्याचा पल्ला गाठायचा तर माणसे जोडा. म्हणून तर अजापुत्र प्रशांत काशीकर यांचे कौतुक!
भीमाशंकर कठारे
संपर्क: ९८२०१९९५४६/ ९५२५०-२३९०४५९.