Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

नवनीत

जी व न द र्श न
नानकदेव व पाठशाळा

 

तळवंडी परिसरातील गोपाळमास्तरांची पाठशाळा फार प्रसिद्ध होती. इतरही ‘पांधा’ म्हणजे ब्राह्मण अध्यापक होते, पण गोपाळ गुरुजी हे सर्वाधिक मान्यताप्राप्त होते. हे मास्तर नक्कीच नानकाला व्यवहारकुशल करतील, असा होरा रचून काळुराम निश्चिंत झाले. नानकासारखा लाघवी, आज्ञाधारक गुरुभक्त शिष्य गुरुजींना प्रथमदर्शनीच आवडला. तो झटपट लिहा-वाचायला लागला. गुरुजींना अभिमान वाटला. म्हणाले, ‘‘शिष्य असावा तर असा!’’ पण त्यांचा आनंद फार काळ नाही टिकला. लिहिण्याच्या कलेचा उपयोग नानक काव्यलेखनासाठी करू लागला. इकडे गुरुजी काही ‘शुद्धलेखन’ घालत. नानक त्याकडे लक्ष न देता पाटीवर काही वेगळेच लिहित राही. एके दिवशी गुरुजींनी नानकाची पाटी पाहिली आणि त्यांना काय बोलावे कळेना. नानकाने लिहिले होते- ‘‘हे मी थोडेच लिहितो आहे! लिहिणारा न लिहविणारा तर तो परमात्मा आहे. त्याचेच गुणगान त्यानेच दिलेल्या हातांनी करायचे. उदाहरणे, उपमा तरी कुठून आणायच्या? त्यानेच सारे जर निर्माण केलेय, तर त्यानेच त्याची आराधना करायची.’’ नानकांचे हे ईशचिंतन वाचून प्रथम गुरुजी भांबावले. त्यांना वाटले, हा लहान मुलगा असे कसे लिहू शकेल? मग त्यांनी रागाने त्याला म्हटले, ‘‘हे करण्यासाठी इथे येतोस? तुला काय फकीर व्हायचे आहे की काय? हे कुणाचे तरी ऐकून तू काहीतरी लिहिलेले आहेस. याने कुणाचे भले होणार? तुझे की तुझ्या घरच्यांचे? हे सारे खूळ काढून टाक डोक्यातून आणि मनापासून अभ्यास कर. मोठा होशील. नाही तर येईल पाळी गुरे राखण्याची.’’ ..असे प्रसंगही बरेच आले. कधी रागावून तर कधी समजावून सांगून गुरुजी थकून गेले. पण तरीही त्यांना वाटायचे, एक ना एक दिवस नानक आपल्या बुद्धिसामर्थ्यांमुळे जागेवर येईल. एके दिवशी तर कहरच झाला. गोपाळ गुरुजी वर्गाला हिशेब घालत होते. सगळी मुले मोठय़ा उत्साहाने गणिते सोडवून उत्तरे देत होती. गुरुजी शाबासकी देत होते. नानक मात्र कुठेतरी खिडकीबाहेर दिसणाऱ्या आकाशाच्या दर्शन चिंतनात हरवून बसले होते. मास्तर रागावले. खाकरले; पण नानक आपल्याच तंद्रीत. मग मास्तरांनी त्यांना जागे करून चांगलेच खडसावले. ‘‘अरे, गावोगावची मुले माझ्या हाताखाली शिकली. एकेकाने मोठे नाव कमावले. तू मात्र मला हरवलेस. काय केले म्हणजे तुझा हा नादिष्टपणा जाईल?’’ गुरुजी असे बरेच बोलत राहिले. नानकांनी लिहिलेली कविता फार उशिरा त्यांच्या ध्यानी आली.
अशोक कामत

कु तू ह ल
अंतराळयानाचे उड्डाण

अंतराळयानाच्या उड्डाणाच्या अगोदर केली जाणारी ‘उलटी मोजणी’ म्हणजे काय?
दहा, नऊ, आठ.. चार, बूस्टर इग्निशन, दोन, एक.. लिफ्ट ऑफ! कुठल्याही अंतराळयानाच्या उड्डाणाच्या अगोदर ही ‘उलट मोजणी’ याच रीतीने केली जाते. ही उलटी मोजणी खरे तर कित्येक तास चालू असते. पण आपल्याला दूरदर्शनवर फक्त शेवटचे काही क्षणच दाखवले जातात. अपोलो- ११ मोहिमेसाठी ही मोजणी २८ तासांची, तर चंद्रयान-१ मोहिमेच्या बाबतीत ती ४९ तासांची होती. स्पेस शटलसाठी या मोजणीचा अवधी ४३ तासांचा असतो. उलट मोजणीच्या दरम्यान विविध यंत्रणांच्या अंतिम चाचण्या केल्या जातात. तसेच नियंत्रण कक्षातील संगणक व अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रे यांचा संपर्क तपासला जातो. कारण यानाचे बरेचसे नियंत्रण हे पृथ्वीवरील तंत्रज्ञच ‘रिमोट कंट्रोल’ने करत असतात. उलट मोजणी चालू असतानाच रॉकेटचे द्रवरूप इंधन भरले जाते. हवा प्रतिकूल असल्यास किंवा दुसरी कुठलीही शंका आल्यास उलट मोजणी काही काळासाठी थांबवतात. (एकदा तर सुतार पक्ष्याने इंधनटाकीला चोच मारली म्हणून उलट मोजणी थांबवली होती.) उलट मोजणीमध्ये मुद्दाम घेतलेली विश्रांतीसुद्धा असते. स्पेस शटलमधील अंतराळवीर हे अडीच तास आधी यानात चढून बसतात. उड्डाणाला नऊ मिनिटे बाकी असताना उलट मोजणीचा अंतिम टप्पा सुरू होऊन उड्डाणाचे नियंत्रण पूर्णपणे संगणकाकडे सोपवले जाते. नासाची तंत्र लेखिका रोझी काव्‍‌र्हर हिने १९८० पासूनच्या ३०० मोहिमांसाठी १५,००० कृती लिहिल्या आहेत. अशा प्रणालींतील प्रत्येक कृती तंतोतंत पाळणे अत्यावश्यक असते. कारण एक अवकाश मोहीम म्हटली म्हणजे त्यासाठी प्रचंड खर्च, हजारो लोकांचे परिश्रम व अंतराळवीरांचे जीव आले. म्हणूनच अंतराळयानातील यंत्रणासुद्धा उलट मोजणीच्या दरम्यान अत्यंत काटेकोरपणे तपासल्या जातात.
गौरी दाभोळकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
उनू

१८८५ च्या सुमारास थिबा राजाचा पराभव करून ब्रह्मदेश इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला. पुढे ब्रह्मदेशात इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. त्यात उनू हे आघाडीवर होते. त्यांचा जन्म २५ मे १९०७ रोजी म्यानमार जवळ वकेम येथे झाला. रंगून विद्यापीठातून बीएची पदवी त्यांनी संपादन केली. विद्यार्थिदशेतच त्यांनी राजकीय चळवळीत सहभागी व्हायला सुरुवात केली. उ-थांट या क्रांतिकारी पुढाऱ्याच्या सहवासात आल्याने तेसुद्धा क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू लागले. पुढे ‘आम्ही ब्रह्मी’ या संघटनेचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात डांबले. दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची सुटका झाली. १९४७च्या सुमारास ब्रिटिशांनी यु आँग सानच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले. पण अंतर्गत संघर्षांमुळे यु आँग सानचा खून झाला. तेव्हा उनू यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने देशाला बेबंदशाहीपासून वाचवले. ४ जानेवारी १९४८ साली ब्रह्मदेश स्वतंत्र झाला. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. या काळात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले. परंतु ब्रह्मदेशात शांतता आणि लोकशाहीची मुळे ते खोलवर रुजवू शकले नाहीत. साम्यवादापुढे शरणागती पत्करून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पुढे ब्रह्मदेश जनरल ने विन या लष्करी हुकूमशहाच्या ताब्यात आला. त्याने उनूला कैदेत टाकले. १९६६ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा लष्करशाहीच्या विरोधात आवाज उठवला, परंतु पुन्हा कैदेत जाण्याचे त्यांनी टाळले. युरोप, अमेरिकेत आश्रय घेतला. अगदी अलीकडे १९८८ साली त्यांनी परदेशी मदत घेऊन ब्रह्मदेशात सरकार स्थापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर निराश होऊन ते भारतात आले. भोपाळ येथे त्यांनी पूर्णवेळ बौद्ध धर्माच्या प्रचारात वाहून घेतले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
आकाशगंगेची नागरिक

कल्पना चावला तिचं नाव. जन्म भारतात हरयाणामधल्या कर्नल गावचा. तुमच्या आमच्यासारखीच मातीवर प्रेम करणारी. पण तिनं ध्यास घेतला आकाशात झेपावण्याचा! अंतराळातून भारतमातेचं दर्शन घेण्याचा! कोलंबिया या अंतराळयानातून (स्पेस शटल) तिनं पहिला प्रवास केला. १९ नोव्हेंबर १९७७ ला. सहा अंतराळवीरांच्या पथकातली ती एक होती. अमेरिकन अंतराळ मोहिमेत भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. कर्नल गावच्या या लेकीनं चारचौघींसारखं चाकोरीतलं आयुष्य निवडलं नाही. तिनं स्वप्न पाहिलं भव्यदिव्य करून दाखवण्याचं. उंच भरारी घेण्याचं. थेट ताऱ्यांशी मैत्री करून गुजगोष्टी करण्याचं. तिनं स्वप्न पाहिलं. अंतराळात प्रवेश करण्याचं. आई-वडीलही आपल्या या विलक्षण लेकीची जगावेगळी कामना पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीशी पहाडासारखे खंबीर राहिले आणि.. तिचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा सोनेरी क्षण सूर्याच्या पावलांनी तिच्या आयुष्यात आला. असे सोन्याचे क्षण आपोआप येत नाहीत. त्यांना आपल्याकडे यायला भाग पाडावं लागतं. कर्नलच्या रवींद्रनाथ टागोर विद्यालयाची ही जिद्दी आणि हुशार विद्यार्थिनी. एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग या विषयात अव्वल मार्कानी बी.एस्सी. झाली. स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. श्रम आणि चिकाटीच्या बळावर अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठाची एम.एस्सी. झाली. विषय होता एअरोस्पेस इंजिनिअरिंग. एवढय़ावर तिची शिक्षणाची आवड थांबली नाही. तिला अधिक मोठं क्षितिज खुणावत होतं. कुणी भारतीय महिला गेली नाही, अशी एक वेगळी वाट स्वत:च्या पावलांनी इतर तरुणींसाठी तिला पाडायची होती. त्यासाठी अचाट प्रयत्न आणि अथक परिश्रमांची गरज होती. कोलोराडो विद्यापीठातून कल्पनानं एअरोस्पेस इंजिनिअरिंग विषयातली पीएच.डी. मिळवली आणि एका झळाळत्या क्षणाला तिची निवड नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, नासामध्ये निवडली गेली. ज्ञान, तीव्र इच्छा, प्रचंड आत्मविश्वास, अविश्रांत धडपड यापुढे परिस्थिती नमतेच. कोलंबिया यानाच्या अंतराळ उड्डाणासाठी तिघाजणांच्या निवडीतलं महत्त्वाचं नाव होतं एका तरुणीचं- कल्पना चावला. अंतराळ उड्डाण सफल करून परतताना पृथ्वीवरच्या कक्षेत पोहोचून पृथ्वीवर यायला अवघी १६ मिनिटं उरली असताना कोलंबियासह धाडसी धीरोदात्त ‘कल्पना’ नक्षत्र मालिकेत अंतर्धान पावली. साऱ्या स्त्रियांना विलक्षण कर्तृत्वशक्ती, बुद्धिमत्ता आणि धाडसाचा प्रकाश भव्य भरारीची जिद्द दाखवत अंतराळात कायमची चमकत राहिली. स्त्री कुठल्याही बाबतीत मागे नाही. अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड ताकद तिच्यात आहे. रशियानं अंतराळात पाठवलेल्या व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा या पहिल्या महिला अंतराळवीरांगनेपासून कल्पना चावलापर्यंतच्या शक्तिदेवता त्यांच्या भगिनींना पराक्रमाची एक नवी दिशा दाखवताहेत आणि सांगताहेत की मुलींनो कशातही मागे राहू नका. आजचा संकल्प- मी मुलगी आहे म्हणून कधी स्वत:ला कमी समजणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com