Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच उभारली
क्षेत्रीय कार्यालयाच्या गच्चीमध्ये कचऱ्यापासून सुंदर बाग

विजय चव्हाण, पुणे, २० मे

शहराला कचऱ्याची समस्या मागील काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहे. याच्याविरोधात उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलनदेखील केले आहे. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या गच्चीमध्ये चक्क कचऱ्यापासून सुंदर उद्यान उभे करण्यात आले आहे. या उद्यानात दोनशे फुलझाडे, शंभर औषधी वनस्पती झाडे आहेत. महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप यांनी ‘लोकसत्ता’ला याबाबत माहिती दिली.

पुण्यात मिळाले दोन हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतीचे पुरावे
पुणे, २४ मे/प्रतिनिधी

विद्येचे माहेरघर असा लौकिक असलेले पुणे शहर प्राचीन काळी सातवाहन राजवंशाची सत्ता असलेल्या प्रांताचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याची माहिती आज समोर आली आहे. बुधवार पेठ येथे नव्या इमारतीची पायाभरणी करीत असताना आढळलेल्या प्राचीन मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून हे स्पष्ट झाले आहे. इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांना बुधवार पेठेतील सावतामाळी भवनाशेजारी नव्या इमारतीसाठी सुरू असलेल्या पायाभरणीच्या ठिकाणी पंधरा ते वीस फूट खोलवर हे पुरातत्त्वीय अवशेष आढळले.पीएमपीचे ई-तिकिटींग २०० दिवसांत चौदा हजार वेळा
विनायक करमरकर, पुणे, २४ मे
पीएमपीच्या ई-तिकिटींग सेवेची ‘कार्यक्षमता’ अखेर उघड झाली आहे. गेल्या २०० दिवसांत ही सेवा तब्बल १४ हजार वेळा ‘ब्रेकडाऊन’ झाल्याची माहिती बाहेर आली असून ‘ब्रेकडाऊन’ सेवेमुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत असले, तरी त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांना पारंपरिक पद्धतीने वाहकाकडून तिकीट देण्याच्या पद्धतीत बदल करून त्याऐवजी ईलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे तिकीट (ई-तिकिटींग) देण्याची योजना पीएमपीने ऑगस्ट २००७ मध्ये सुरू केली.


महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे वाहतूक सुधारण्यांच्या योजनांना
सलील उरूणकर, पुणे, २४ मे

शहरातील वाहतूक परिस्थिती व नियमन सुधारण्यासाठी वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेबद्दल वाहतूक शाखेमध्ये तीव्र नाराजी आहे. वाहतुकीचे नियमन सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांना ‘रिमोट कंट्रोल’ देण्याची योजना, सारसबाग-स्वारगेट तसेच जंगली महाराज रस्ता-फग्र्युसन महाविद्यालय रस्ता येथील चक्राकार वाहतूक योजना, अपघातप्रवण स्थळांचा अभ्यास करण्याची तसेच चौक सुधारणा योजना आणि झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणाऱ्यांना शिस्त लावण्याच्या योजनेसह पंधरा ते वीस योजनांना महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे फटका बसला आहे.

ज्ञानेश्वरीचे दुर्मिळ हस्तलिखित उपलब्ध
पुणे, २४ मे/प्रतिनिधी

लातूर जिल्ह्य़ातील उद्गीर किल्ल्यामध्ये १८७० साली कृष्णा भेंडे यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरीची दुर्मिळ हस्तलिखित प्रत पुण्यात दाखल झाली असून ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास डांगे यांच्याकडे भेंडे यांच्या वंशजांनी ती सुपूर्द केली आहे.
मंदार लवाटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आज ही माहिती दिली.

टाटा पॉवर कंपनीकडून जादा वीज मिळूनही खंडित वीजपुरवठय़ाने नागरिक हैराण
पुणे, २१ मे/ प्रतिनिधी

टाटा पॉवर कंपनीकडून दोन आठवडय़ांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पुरेशी अतिरिक्त वीज मिळत असल्याने वीजकपात होत नसली, तरी वेगवेगळ्या कारणांनी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांनी नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असतानाच मान्सूनपूर्व पावसाने शहरात हजेरी लावल्याने वीजपुरवठय़ामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.

बिस्कीट कंपनीच्या कार्यालयात सत्तर हजारांची चोरी
पुणे, २४ मे/प्रतिनिधी
ब्रिटानिया बिस्कीट कंपनीच्या वितरण कार्यालयातून सत्तर हजारांची रोकड अज्ञात चोरटय़ाने चोरून नेली. कर्वे रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
कंपनीचे कर्मचारी सुरेश राजाराम तापडिया (वय ४८) यांनी याबाबत डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

शहरातील नालेसफाई तातडीने करण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी, २४ मे/प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर साफसफाई करण्याचे आदेश आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रशासनास दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांच्या नियोजनासाठी पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. पावसाळ्यात पूरपरिस्थिती असल्यास वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणे, पूरबाधित भागांवर लक्ष केंद्रित करणे, नदीपात्रात राडारोडा टाकला जाऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांच्या निवाऱ्यांची व्यवस्था ज्या शाळांमध्ये करण्यात येते, तेथे सर्व व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

पोरे, इंगळे यांना पुरस्कार
पुणे, २४ मे / प्रतिनिधी

समता साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय संतरविदास समता पुरस्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश पोरे यांना, तर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते हनुमंत इंगळे यांना बाबासाहेब आंबेडकर विशेष समता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २४ मे रोजी डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

अनंत मिरासदार यांचे निधन
पुणे, २४ मे/ प्रतिनिधी

अनंत मारूती मिरासदार (वय ७२) यांचे दीर्घकालीन आजाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि एक कन्या असा परिवार आहे. मिरासदार यांनी आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले होते. दूरचित्रवाणी मालिकांचे निर्माते व दिग्दर्शक प्रसाद मिरासदार यांचे ते वडील होत.

सिंधुबाई जाधव यांचे निधन
पुणे, २४ मे / प्रतिनिधी

सिंधुबाई जाधव यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ६४ वर्षांच्या होत्या. त्यांचे मागे पती, तीन मुले, एक मुलगी आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. व्यापारी जनार्दन जाधव यांच्या त्या पत्नी होत.