Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

खैरे-दानवे यांची हॅट्ट्रिक आणि मुंडे यांचे वर्चस्व सिद्ध
लक्ष्मण राऊत

 

मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड आणि जालना या तिन्ही मतदारसंघाच्या निकालाबाबत या वेळेस कमालीचे औत्सुक्य निर्माण झालेले होते. मागील पाचपैकी चार निवडणुकांमध्ये औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला या वेळेस संत जनार्दन स्वामी मठाचे शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि त्यामुळे राजकीय गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रभाव अपेक्षेएवढा जाणवला नाही. या मतदारसंघातील सहापैकी गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या तीन ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा कौल निकालावर परिणाम करणारा ठरला. या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील एकत्रित मतांचा विचार केला तर तेथे शांतीगिरी महाराज प्रथम व शिवसेनेचे चंद्रकांत खैरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे उमेदवार उत्तमसिंह पवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यापैकी कन्नडमध्ये खैरे आघाडीवर आहेत आणि शिवसेनेचा प्रभाव मानला जाणाऱ्या गंगापूर व वैजापूरमध्ये मात्र शांतिगिरी महाराजांच्यापेक्षा खूप मागे आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्येा शांतीगिरी महाराज यांना ३६ हजार ७४३ मते अधिक मिळाली.
गंगापूर-वैजापूरमध्ये शांतीगिरी महाराजांचा फटका खैरे यांना जेवढा बसला त्यापेक्षा अधिक फटका उत्तमसिंह पवार यांना बसला. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पवार यांना शांतीगिरी महाराज यांच्यापेक्षा ५४ हजार ४१२ एवढी मते कमी मिळाली. निवडणूक प्रचाराच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शांतीगिरी महाराज यांचा एकत्रित विचार करून खैरेंच्या पराभवाचीच गणिते अधिक मांडली जात असत. प्रत्यक्षात मात्र सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहूनही खैरे विजयी झाले. ज्यांनी खैरे यांच्या पराभवासाठी शांतीगिरी महाराजांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली होती त्यांना काँग्रेसचा पराभव आणि खैरेंची विजयी मिरवणूक पाहण्याची वेळ आली! या मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादा या वेळच्या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाली. त्याचबरोबर गंगापूर व वैजापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा प्रभाव असतानाही अपक्ष उमेदवारापेक्षा मते कमी का मिळाली याचा विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ खैरे यांच्यावर येऊन ठेपली आहे.
बीडमध्ये मुंडेच
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोहीम उघडल्याने बीड मतदारसंघ या वेळेस राज्यात चर्चेत होता. मुंडे यांची निवडणुकीची तयारी वर्ष-दीड वर्षांपासून होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांचे नाव ऐन वेळी जाहीर झाले. प्रारंभीच्या काळात मुंडे यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शरद पवार, अजित पवार आणि जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या लहान-मोठय़ा नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे एकतर्फी राहिली नव्हती. त्यामुळेच पराभूत होतानाही आडसकर यांना चार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या झंझावातापुढे मुंडे ५ लाख ४७ हजार ८०० मते घेऊन विजयी झाले. जातीय प्रचाराचा परिणामही मुंडे यांना विजयापासून अडवू शकला नाही. नाराज झालेल्या जुन्या मित्रांची समजूत काढणे, दलित-मुस्लिम मतांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून रोखण्याचा प्रयत्न करणे, जातीयवादी प्रचाराला विकासाच्या भाषेचे उत्तर देणे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेथे कुठे गटबाजी दिसेल तेथे तिचा उपयोग करून घेणे इत्यादी अनेक मार्गानी ही निवडणूक लढविली.
खरे तर ही निवडणूक भा. ज. प.ची नव्हती, तर व्यक्तिगत मुंडे यांचीच होती. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान बनविण्याचा मुद्दा येथे नव्हता. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचारातही भा. ज. प.पेक्षा व्यक्तिगत मुंडे यांचा पराभव करणे हाच विषय होता. मुंडे यांनी ही निवडणूक स्वत:च्याच डावपेचावर, जिल्ह्य़ातील राजकारणाच्या आजवरच्या अनुभवावर एकाकीपणेच लढविली असे म्हणण्यास वाव आहे. जातीपातीच्या प्रचारातही आपल्या समर्थकांना त्यापासून अलिप्त ठेवून स्वत:च्या पाठीमागे उभे करण्यात मुंडे यांना यश मिळाले. गेवराई त्याचप्रमाणे इतरही विधानसभा मतदारसंघात याचा प्रत्यय निकालानंतर दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढय़ा मोठय़ा आव्हानासमोर मुंडे संयमाने उभे राहिले आणि प्रामुख्याने स्वत:च्या कर्तृत्वावर त्यांनी दिल्ली गाठली. बीड जिल्ह्य़ातील राजकारणातील मुंडे यांच्या मुत्सद्दीपणाचा कस या निवडणुकीत लागला!
जालन्याचा गड पाचव्यांदा भाजपकडे
जालना मतदारसंघाचा गड राखण्यात भा. ज. प.ला सलग पाचव्यांदा यश मिळाले. या पाचपैकी सलग तीन वेळेस रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. जालना लोकसभेची निवडणूक यावेळेस प्रारंभापासूनच एकतर्फी वाटत नव्हती. प्रत्यक्षात निकालही तसाच लागला. दानवे यांच्या तुलनेत काँग्रेसचे आमदार कल्याण काळे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. जालना जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काळे यांच्या उमेदवारीस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिलेले होते. काही अपवाद वगळता काँग्रेसची नेतेमंडळी त्यांच्या पाठीशी होती.
इकडे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दानवे यांच्याबद्दल स्वकीयांत नाराजी होती. त्यामुळे दानवे यांना प्रारंभीच्या काळात मोकळेपणाने प्रचार करण्यातही अडचणी येत होत्या. परंतू हळूहळू चित्र पालटत गेले आणि प्रारंभी काळेंच्या समोर तेवढे प्रभावी न वाटणारे दानवे नंतर मात्र विजयापर्यंत पोहोचले. कल्याण काळे यांना त्यांच्या स्वत:च्याच फुलंब्री विधानसभा मतदारसंघाने जोरदार झटका दिला. काळे यांना एकदम जमिनीवर आणून आत्मपरीक्षण करावयास लावणारा हा निकाल आहे. दुसरीकडे भा. ज. प.चे रावसाहेब दानवे यांचा विजय झाला असला तरी प्रचाराच्या काळात त्यांना स्वत:च्या पक्षातून आणि समर्थक पक्षातून जे अनुभव आले ते त्यांनाही आत्मपरीक्षण करावयास लावणारे आहेत. सलग पाचव्यांदा विजय झाल्याने आता या मतदारसंघावर भा. ज. प.चा शिक्का बसला आहे.