Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक अ. रा. कुलकर्णी यांचे निधन
पुणे, २४ मे / खास प्रतिनिधी

 

इतिहासाचे नामवंत अभ्यासक, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे संस्थापक प्रमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. अ. रा ऊर्फ अनंत रामचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे आज सायंकाळी घशाच्या कर्करोगाने निधन झाले. डॉ. कुलकर्णी यांच्या मागे पत्नी विजया, सीमा व सविता या कन्या आणि मुलगा श्रीरंग असा परिवार आहे. घशाच्या कर्करोगावरील उपचारासाठी गेल्या काही दिवसांपासून डॉ. कुलकर्णी यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमुळेच १९६९ मध्ये डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेला इतिहास विभाग पुणे विद्यापीठात आला. त्यानंतर १९८८ पर्यंत तेच या विभागाचे प्रमुख होते. मराठय़ांचा इतिहासकार ग्रँड डफ याच्यावर डॉ. कुलकर्णी यांनी केलेले संशोधन विशेष प्रसिद्ध आहे. मराठय़ांचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय. ‘महाराष्ट्र इन दि एज ऑफ शिवाजी’ या ग्रंथासह शिवकालीन महाराष्ट्र व मराठय़ांच्या इतिहासावरील अनेक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. मराठय़ांच्या इतिहासाच्या आर्थिक, सामाजिक पैलूंवर त्यांनी केलेले भाष्य व त्याबाबतचा अभ्यास इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास अखिल भारतीय स्तरावर पोहोचविण्याचे काम डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे. भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही डॉ. कुलकर्णी यांनी भूषविले. इतिहास संशोधनातील त्यांच्या कार्याबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांना प्रोफेसर एमिरेट्स हा बहुमान दिला. २५ हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.
डॉ. अ. रा. कुलकर्णी मुळचे सोलापूर जिल्ह्य़ातील. मुंबई विद्यापीठातून एम. ए.ची पदवी संपादन केल्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. घेतली. इतिहास संशोधनासाठी ते लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, जर्मनीतील हायडनबर्ग आणि पॅरिस येथेही गेले होते. लंडनमधील संशोधनाच्या आधारेच त्यांनी ग्रँड डफ याच्यावरील ग्रंथाचे लेखन केले.
मराठय़ांचे इतिहासकार, मध्ययुगीन महाराष्ट्र, मराठे आणि महाराष्ट्र, जेधे शकावली करीना, महाराष्ट्र सोसायटी अँड कल्चर, मराठाज, मिडिव्हल महाराष्ट्र, स्टडीज इन मराठा हिस्ट्री अशा अनेक ग्रंथांचे लेखन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ग. ह. खरे यांच्या समवेत मराठय़ांचा इतिहास खंड १, खंड २ आणि खंड ३ या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे.