Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

भुसावळ पालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडण्याची चिन्ह
जळगाव, २४ मे / वार्ताहर

 

विकास कामाच्या मुद्यांवरून भुसावळ पालिकेतील सत्ताधारी शहर बचाव आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा असून जूनमध्ये होणाऱ्या विशेष सभेसाठी आघाडीचे अध्यक्ष
तथा गटनेते मनोज बियाणी यांनी दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षादेश अर्थात व्हीप जाहीर केला आहे. शहर बचाव आघाडीला सत्तेत येऊन २५ जून रोजी
अडीच वर्षे पूर्ण होतील. नगराध्यक्षा संगीता बियाणी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ याच वेळी संपणार असल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष निवडीकरिता जून महिन्यात
विशेष सभा बोलविण्यात येणार आहे. एकूण ४७ नगरसेवकांच्या सभागृहात शहर बचाव आघाडीचे २९ नगरसेवक असून डिसेंबर २००६ पासून हा गट सत्तेत असून
राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. हा पक्ष विरोधात आहे.
विकास कामांच्या मुद्यांवरून गेल्या वर्षांपासून भुसावळ पालिकेतील सत्ताधारी गटाच्या काही नगरसेवकांमध्येच प्रचंड धुसफूस सुरू असून सत्ताधारी गटाचे अध्यक्ष तथा गटनेते
बियाणी यांच्याशी त्यांचे वितुष्ट निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. भाजप गटनेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे सुरेश जैन या वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त असल्याने व त्यांच्याच आशीर्वादाने आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली असल्याने बियाणी मनमानी करीत असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केल्याचे कळते. दरम्यान, सत्ताधाऱ्यांमधील नाराजी व विद्यमान अध्यक्षांचा पूर्ण होत असलेला कार्यकाळ पाहता राष्ट्रवादीने याचा पुरेपूर फायदा घेत नाराज नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. त्या अनुसार बारा नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
शहर बचाव आघाडीचे काही नगरसेवक फुटीच्या मार्गावर असल्याची व ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे कळताच शहर बचाव आघाडीत खळबळ उडाली असून
दोन दिवसांपूर्वी बियाणी यांनी आपल्या नगरसेवकांना एका निवेदनाव्दारे कटू प्रसंग टाळण्याचा इशारा दिला होता. तसेच आघाडीच्या विरुद्ध गेल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याचेही संकेत त्यांनी दिले होते. बियाणी यांनी आपल्या नगरसेवकांसाठी पक्षादेश अर्थात व्हीप जारी केला असून विशेष सभेस सर्व सदस्यांनी न चुकता हजर रहावे व नगराध्यक्षपदासाठी संगीता बियाणी यांनाच हात उंचाऊन मतदान करावे असा व्हीप बजावला आहे. या पक्षादेशाचे पालन करावे असे सांगतानाच कसूर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.