Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

येवला तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत
नाशिक, २४ मे / प्रतिनिधी

 

येवला तालुक्यात मागील आठवडय़ात वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना भुजबळ यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. मौजे गणेशपूर येथील पुरात वाहून गेलेले देवबा वारूळे यांचे वारस रतनबाई वारूळे, मौजे अंगुलगाव येथे भिंत पडून ठार झालेल्या वेणूबाई जेजुरकर यांचे
वारस सुभाष जेजुरकर व मौजे अंदरसूल येथील विजेची तार पडून मृत झालेल्या बाळू पवार यांचे वारस मंगल पवार, सिन्नर तालुक्यात भिंत पडून मृत झालेल्या विमलबाई बोडके यांचे वारस कचरू बोडके या सर्वाना प्रत्येकी एक लाख व समाधान बोडके यांचे वारस शिवाजी बोडके यांना ५० हजार रूपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्यात ११
जण जखमी झाले. याशिवाय चार गायी, दोन बैल, चार शेळ्या व एक घोडा ठार झाले. वादळ व पावसामुळे जवळपास ३६ घरे पूर्णत: व २३४ घरांचे अंशत :नुकसान झाले. मंत्र्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा चाळीचे तसेच बस स्थानकाशेजारील दुकानांच्या नुकसानीची पाहणी केली. सर्व नुकसानग्रस्तांना शासकीय नियमाप्रमाणे तातडीची मदत वाटपाच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी पी. वेलरासु, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांताधिकारी दत्तात्रय बुरूडे, तहसीलदार अनिल पवार, पंचायत समिती सभापती संभाजीराजे पवार, उपसभापती देविदास निकम तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.