Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

भावी डॉक्टरांना अनावृत पत्र

 

आज तुम्ही सर्वजण अ‍ॅलॉपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या विविध वैद्यकशाखांचे अभ्यासक्रम यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन वैद्यकीय पदवी धारण करणार आहात. ही पदवी घेतल्यानतंर तुमची नोंदणी त्या त्या विशिष्ट पॅथीच्या वैद्यक परिषदेकडे (कौन्सिलकडे) केली जाईल आणि डॉक्टर या नात्याने वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकृत परवाना तुम्हाला मिळेल.
सर्व प्रथम तुम्हा सर्वाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! ज्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी तुम्हाला मिळते आहे, त्या विद्यापीठाची ही आठवी तुकडी पदवीधर होऊन बाहेर पडते आहे. त्या विद्यापीठाचेही अभिनंदन ! अर्थात वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर पुढची वाटचाल खूप महत्वाची आहे. तुमच्यासमोर बरेच पर्याय आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन, शासकीय,
निमशासकीय नोकरी, वैद्यकीय व्यवसाय असे विविध पर्याय असले तरी प्रत्यक्ष रुग्णसेवा हा काही केल्या न चुकणारा विषय आहे, जो अत्यंत महत्वाचा आहे. ‘रुग्णसेवा’ यामधला ‘सेवा’ हा शब्द दुर्दैवाने या व्यवसायातून हद्दपार होतोय की काय अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे सेवाभाव या वैद्यक व्यवसायात पुन: प्रस्थापित करण्याचे एक मोठे काम आपल्या सगळ्यांना मिळून करावे लागणार आहे. आपण कितीही शुल्क भरून डॉक्टर झालेला असलात तरीही रुग्णसेवा फार मोलाची आहे,
हे विसरून चालणार नाही. त्यासाठी खरे तर एक विशिष्ठ प्रतिज्ञा (इंग्रजीत हिपोक्रेटिस ओथ तर मराठीत ‘चरक’ प्रतिज्ञा) आपण वैद्यक व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पदवीदान
समारंभातच घ्यायला हवी. (याची व्यवस्था खरे तर आरोग्य विद्यापीठासारख्या यंत्रणेनेच करायला हवी)
वैद्यकीय नीतीनियमांचे पालन करा!
रुग्णसेवेप्रमाणेच या व्यवसायात नीतीमूल्यांची जपणूक करण्याचेही मोठे आव्हान तुमच्यासमोर आहे. या व्यवसायात वाढत चाललेली विचित्र स्पर्धा, त्यामुळे निर्माण झालेली जाहिरातबाजी, अन्य ‘कट’ कटी या सगळ्या गोष्टी टाळून आपल्याला चांगली रुग्णसेवा करायची आहे, हे ध्यानात घ्यावे लागेल. आपापल्या कौन्सिलकडून आपल्याला वैद्यकीय नीतीनियमांचा एक छोटासा दस्तऐवज दिला जातो. त्याचा बारकाईने अभ्यास आणि तंतोतंत पालन होणेही आवश्यक आहे. खरी आवश्यकता हे नीतीनियम प्रत्यक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवण्याची व्यवस्था आरोग्य विद्यापीठानेच
करायला हवी. पण या विद्यापीठाच्या स्थापनेत एक तप उलटले तरी असा विचार दिसत तरी नाही. (अशी व्यवस्था खरंच झाली असल्यास हे विधान त्वरित मागे घेता येणे शक्य आहे!) मित्रांनो, वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी या क्षेत्रात संशोधन वाढीस लागण्यासाठी महत्प्रयासाने १२-१३ वर्षांपूर्वी या विद्यापीठाची स्थापना नाशिकला झाली.
पण पूर्वीची वैद्यक शिक्षणाची पद्धती, दर्जा आणि सध्याचा दर्जा यात फरक पडलाय का, याचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेकडून केले गेले तर अशा प्रकारच्या व्यवस्था भावी काळात निर्माण करण्यासाठी काही पाश्र्वभूमी तयार करता येईल. असे मूल्यमापन म्हणजे एक संशोधनाचा विषय आहे. आपण ज्या आरोग्य क्षेत्रात प्रवेश करणार आहात, त्या क्षेत्रातही प्रचंड समस्या आहेत. कॅन्सर, एड्स, यांबरोबरच क्षयरोगाचे (टीबी) आव्हान फार मोठे आहे. आज मोठय़ा प्रमाणावर आधुनिक प्रतिजैविके (ntibiotics) उपलब्ध असूनही आपल्या देशात क्षयाने दरवर्षी चार ते पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतात. आपल्या देशात अंदाजे चार ते पाच कोटी
मधुमेही लोक आहेत. तर ऱ्हदयरोग, उच्च रक्तदाब यांनी त्रस्त रुग्णांचीही संख्या कमी नाही. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांच्याच आरोग्य समस्या वाढतच चालल्या आहेत. बदलत्या पेटंट कायद्यामुळे आधुनिक औषधांच्या वाढत्या किंमतीचे मोठे आव्हान तुमच्या समोर उभे ठाकलेले आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे घेण्याची रुग्णांची वाढती प्रवृत्ती आणि ती तशी विकण्याची दुकानदारांचीही सढळ प्रवृत्ती याही गोष्टी समस्या म्हणूनच उभ्या आहेत. यासाठी तुम्ही सर्व भावी डॉक्टरांना समाजाचे प्रबोधनही करावे लागणार आहे. डॉक्टरांची वाढती संख्या आपल्या राज्यात वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर बनणाऱ्यांची संख्या वाढते आहे (त्यातच आरोग्य विद्यापीठाने आपल्या बृहत आराखडय़ात आणखी वैद्यक शिक्षण संस्था सुरू करण्याचा निश्चय केलेला आहे) ग्रामीण भागात जाऊन व्यवसाय करण्याची प्रवृत्ती खूपच कमी आहे. त्यासाठी केंद्र सरकारला १० हजार कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हाती घ्यावे लागले. डॉक्टरांची संख्या शहरात खूपच वाढते आहे. त्यामुळे निश्चित स्पर्धा निर्माण झाली आहे. ती स्पर्धा टाळून प्रामाणिकपणे रुग्णसेवा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे. आपण ज्या पॅथीचे शिक्षण घेतले असेल त्या पॅथीचा अवलंब आपल्या रुग्णसेवेसाठी केला तर त्यानेही व्याधीमुक्तीसाठी अधिक उपयोग होईल आणि शेवटी आपल्या सगळ्यांचे ध्येय म्हणजे ‘स्वस्थ व्यक्ती - स्वस्थ परिवार’ ‘स्वस्थ ग्राम, शहर आणि स्वस्थ राष्ट्र’ या ध्येयपूर्तीच्या वाटचालीस तुम्हा सर्वाना
हार्दिक शुभेच्छा !
वैद्य विजय म. कुलकर्णी,
संपादक आयुर्वेद पत्रिका, नाशिक