Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

क्रीडा

आयपीएलचा फायदा ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये होईल- धोनी
जोहान्सबर्ग, २४ मे/ पीटीआय

आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंनी बऱ्याच गोष्टी शिकल्या असून त्याचा फायदा आम्हाला आगामी इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये होईल. युवा खेळाडू दडपणाखाली खेळू शकतात आणि संघाच्या विजयात कामचलाऊ गोलंदाजही चमकदार कामगिरी करू शकतात हे या आयपीएलमधून शिकायला मिळाले असून यामुळे सकारात्मक बदल संघात पाहायला मिळतील, असे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. या आयपीएलमध्ये ज्या चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्याचा नक्कीच फायदा ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये होईल. आयपीएलच्या ‘पॉवर प्ले’मध्ये युसूफ पठाण, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा यांची गोलंदाजी नेत्रदीपक झाली होती.

‘रॉयल’ बंगलोर
जोहान्सबर्ग, २४ मे/ वृत्तसंस्था

आयपीएलची अंतिम लढत हैदराबाद आणि बंगलोर या गेल्यावर्षीच्या तळाच्या दोन संघांमध्ये उद्या होईल. साखळी सामन्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्स व चेन्नई सुपर किंग्ज यांना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. आज उपान्त्य फेरीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला १४६ धावांचेच आव्हान उभे करता आले. विजयाचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्सने ७ चेंडू व ६ विकेट्स राखून पार केले. दोन दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्सला उपान्त्य फेरीचा दरवाजा खुला करून देणारा मनीष पांडे आजही बंगलोरचा तारणहार ठरला आणि त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ट्वेंटी-२०च्या जमान्यातही कसोटी सामने लोकप्रिय- भावे
सांगली, २४ मे / प्रतिनिधी

सध्या क्रीडाविश्वाला ट्वेंटी-२० क्रिकेटने भुरळ घातली असली तरीही पाचदिवसीय कसोटी क्रिकेटची लोकप्रियता आजही कायम असल्याचे मत भारतीय निवड समिती सदस्य व माजी रणजीपटू सुरेंद्र भावे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या वतीने गणेशनगर येथील सभागृहात ‘क्रिकेटमधील नवीन प्रवाह’ या विषयावर सुरेंद्र भावे यांची रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष नितीन शहा यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. क्रिकेटला जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रियता मिळते आहे.

गतविजेत्या इव्हानोविचची विजयी सलामी
पॅरिस, २४ मे / एएफपी

गतविजेती सर्बियन टेनिसपटू अ‍ॅना इव्हानोविचने आपल्या दुखापतीची चिंता मागे टाकून यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये यशस्वी सुरुवात केली असून पहिल्या फेरीत तिने इटलीच्या सारा एरानीला ७-६ (७-३), ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता तिसऱ्या फेरीसाठी २१ वर्षीय इव्हानोविचची थायलंडच्या तमारिन तानासुगर्न किंवा फ्रान्सच्या कॅमिली पिन यांच्यापैकी एका खेळाडूशी गाठ पडेल. गेल्या आठवडय़ात झालेल्या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतून इव्हानोविचला गुडघेदुखीमुळे माघार घ्यावी लागली होती.

‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ वेदनाशामक इंजेक्शन्सच्या आधीन?
कराची, २४ मे / पीटीआय

वादग्रस्त जलदगती गोलंदाज ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला वेदनाशामक इंजेक्शन घेण्याची सवय असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. टे्वन्टी- २० विश्वचषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघातून शोएबला वगळण्यामागेही हेच कारण असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. शोएबला त्वचाविकार असल्याचा अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे. मात्र त्याला वगळण्यामागे हेच एकमेव कारण नसल्याचे सांगत ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने अहवालावरच शंका उपस्थित केली आहे.

चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत दिल्लीसह बंगलोर व हैदराबादही खेळणार
जोहान्सबर्ग, २४ मे / वृत्तसंस्था
८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग स्पर्धेत वेस्ट इंडिज, श्रीलंका व न्यूझीलंडमधील स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या विजेत्यांसह यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील गुणतक्त्यात अव्वल ठरलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ तसेच यंदा अंतिम फेरीत प्रवेश करणारे डेक्कन चार्जर्स व बंगलोर रॉयल चॅलेंजर्स हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ६० लाख अमेरिकन डॉलर इतकी बक्षिसाची रक्कम असून स्पर्धेचा ड्रॉ २३ जून रोजी लंडनमध्ये घोषित केला जाईल.
अन्य संघांमध्ये व्हिक्टोरिया, न्यू साऊथ वेल्स (ऑस्ट्रेलिया), केप कोब्राज, इगल्स (दक्षिण आफ्रिका) यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा त्रिनिदाद, टोबॅगो, ओटॅगो (न्यूझीलंड) व श्रीलंकेचा वेयांबा हे संघ खेळणार आहेत. इंग्लंडची स्पर्धा अद्याप व्हायची असल्यामुळे त्यांचा विजेता संघ २५ ऑगस्टलाच निश्चित होईल. स्पर्धेत एकूण २३ सामने होणार असून संघांची विभागणी चार गटात होईल. पाकिस्तानचा सियालकोट स्टॅलियन्स हा संघही या स्पर्धेत खेळणार होता, पण पाकिस्तान सरकारने त्यांना भारतात जाण्यास मनाई केल्यामुळे हा संघ खेळू शकणार नाही. ही स्पर्धा याआधी गेल्यावर्षी ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत भारतात होणार होती, पण २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे २००८ला जिंकलेले स्थानिक संघ या स्पर्धेला मुकले. या संघांना या संधीसह सुमारे दोन लाख ५० हजार अमेरिकन डॉलर इतकी सहभागाची हमी रक्कमही गमवावी लागली.

कॉलिंगवूडच्या अष्टपैलू खेळामुळे इंग्लंड विजयी
ब्रिस्टोल , २४ मे/ पीटीआय
पॉल कॉलिंगवूडने अष्टपैलू चमक दाखवत वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. कॉलिंगवूडने १६ धावांत तीन विकेट्सही घेतल्या तर फलंदाजीमध्ये सर्वाधिक ४७ धावा काढत संघाला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रथम फलंदाजी करताना ड्वेन ब्राव्होचा (५०) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. इंग्लंडतर्फे सर्वाधिक ४ विकेट्स स्टुअर्ट ब्रॉडने घेतल्या. इंग्लंडचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत असताना रवी बोपारा (४३) , ओवेश शहा (३८) आणि पॉल कॉलिंगवूड (४७) यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले.

बॅडमिंटन : सायली गोखलेला अजिंक्यपद
पुणे, २४ मे / प्रतिनिधी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू व राष्ट्रीय विजेती सायली गोखले हिने माद्रीद येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिस्पर्धी लायनत तानचा (बेल्जियम) पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. प्रतिस्पध्र्या खेळाडूवर २१-९, २१-१८ अशी मात करीत सायलीने विजय साकार केला. स्मॅशिंगेचे जोरदार फटक्यांनी सायलीचा आजचा खेळ अविस्मरणीय ठरला. सर्विसवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत सायलीने कोर्टवर चौफेर खेळ केला. याआधी उपांत्य सामन्यात सायलीने इंग्लंडची द्वितीय मानांकित खेळाडू गिल पिटर्ड हिला नमविले होते.या हंगामात सायलीने प्रभावी कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल युवा स्पर्धेत रौप्य पदक पटकवण्याऱ्या सायलीने राष्ट्रीय खुल्या स्पर्धेचेही अजिंक्यपद जिंकले होते.