Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

व्यक्तिवेध

डॉ. मनमोहनसिंग यांना ३२२ खासदारांनी समर्थन दिल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नव्या पंतप्रधानाच्या निवडीची प्रक्रिया सुरू केलेली असताना, त्याच सुमारास नेपाळातही नवे पंतप्रधान सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. ६०१ सदस्यांच्या सभागृहात २२ पक्षांतील ३५१ संसद सदस्यांचे समर्थन प्राप्त केल्यानंतर, माधव कुमार नेपाल यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. पंतप्रधानपदासाठी नव्या नेत्याच्या निवडीची ही गरज मुळात निर्माण झाली, ती सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पुष्प कमल दहाल अर्थात प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर. नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आल्यानंतर तिथे माओवाद्यांची लोकशाही आली. नेपाळची सूत्रे हाती घेतल्यानंतर

 

लगेचच प्रचंड यांनी पहिले काम केले, ते भारतात प्रशिक्षण घेतलेले लष्करप्रमुख रुक्मांगद कटवाल यांना पदावरून हटविण्याचे. २८०० नवे जवान भरती करताना आणि आठ जनरल्सना पुनस्र्थापित करताना कटवाल यांनी सरकारशी विचारविनिमय केला नाही, असे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले होते. परंतु खरे कारण वेगळेच होते. १९ हजारांहून अधिक जुन्या झुंजार कार्यकर्त्यांना लष्करात दाखल करून घेण्याचा बेत माओवाद्यांच्या मनात होता. कटवाल यांनी त्याला विरोध केला होता. कटवाल यांची बडतर्फी त्यातूनच घोषित झाली होती. बडतर्फीच्या या निर्णयाला राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी नुसती हरकतच घेतली नव्हती, तर रुक्मांगद यांना त्यांच्या मूळ पदावर पुनस्र्थापित करण्याचे आदेशही दिले होते. त्या आदेशानंतरच प्रचंड यांनी राजीनामा देऊन नाटय़पूर्ण हालचाली घडवल्या होत्या. सरकारवर अविश्वास ठराव येईल अशी शक्यता त्याआधी निर्माण झाली होतीच, पण तो अविश्वास प्रस्ताव संमत होण्याचे संकेतही मिळू लागले होते. प्रचंड यांच्या सरकारला समर्थन देणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपालनेच (युनिफाइड मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट) समर्थन मागे घेण्याची तयारी सुरू केली होती. कटवाल यांना हटविण्याचा निर्णय आपल्याशी सल्लामसलत न करता घेतला गेल्याचा आक्षेप कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपालने (युनिफाइड मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट) घेतला होता. तुलनेने छोटय़ा सद्भावना पार्टीनेही, त्सरकारने आमचा विश्वास गमावला आहे अशी भाषा सुरू केली होती. १११ सदस्यांचा पाठिंबा अशा प्रकारे काढला गेल्यानंतर ६०१ सदस्यांच्या सभागृहात २३८ सदस्यांचा माओवादी पक्ष अल्पमतात येणार हे अपेक्षितच होते. पण याउप्पर आणखी कोणत्याही पक्षाने पाठिंबा काढून घेतला असता, तर मतविभाजनातच सरकार सभागृहात पराभूत झाले असते. प्रचंड यांना त्यातूनच राजीनामा द्यावासा वाटला होता. तिकडे रुक्मांगद यांनीही सहकाऱ्यांशी बोलून बडतर्फीच्या विरोधात उठाव करण्याची तयारी सुरू केली होती. प्रचंड यांनी वैतागून राजीनामा देऊ केला होता. अशा स्थितीत नेपाल यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले जाणे अपेक्षितच होते. नेपाल यांनी अन्य छोटय़ामोठय़ा विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन बहुमत जुळवले आणि शनिवारी झालेल्या मतदानात ते सिद्धही करून दाखवले. त्यांची निवड तर बिनविरोध झालीच, पण हंगामी पंतप्रधान प्रचंड आणि बाबूराम भट्टराय कौलाचा अंदाज लक्षात आल्यानंतर सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. नेपाल कुटुंबीय मूळचे भारतीय वंशाचे. दोनशे वर्षांपूर्वी बिहारमधून ते नेपाळमध्ये गेल. माधवकुमार यांचे शिक्षण बिहारमधील गोएंका कॉलेजमध्ये झाले. बॅँक कारकून या नात्याने कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या नेपाल यांनी विद्यार्थी दशेतच कम्युनिस्ट चळवळीत भाग घेतला. मॅक्झिम गॉर्की आणि राहुल सांकृत्यायन यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. राजे ग्यानेंद्र यांच्या एकाधिकारशाही विरोधात जो सूर उमटला त्यात नेपाल यांचा वाटा मोठा होता. १९९३ ते २००८ अशी तब्बल १५ वर्षे नेपाल यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपालची पक्षीय सूत्रे सांभाळलीच, पण ९४-९५ साली सत्तेत सहभागी झाल्यानंतर काही काळ परराष्ट्र व संरक्षण अशी खाती सांभाळण्याबरोबरच उपपंतप्रधानपदाची धुराही वाहिली. नेपाळची नवी राज्यघटना येऊ घातली आहे, तिच्या आराखडा समितीची सूत्रे त्यांच्याच हाती आहेत. भारतातील डाव्या चळवळीशी व कॉँग्रेस पक्षाशी नेपाल यांचे निकटचे संबंध आहेत, त्याचे पडसाद भारतीय राजकारणात कसकसे उमटतात ते पहायचे.