Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

खरिपाची तयारी जोरात; शेतकरी लागला कामाला
पेरणीसाठी साडेचार लाख हेक्टर क्षेत्र निर्धारित
९० हजार मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध
चंद्रपूर, २४ मे/ प्रतिनिधी
मान्सूनच्या आगमनाला पंधरा दिवस शिल्लक असताना शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात केली असून यंदा खरीप हंगामासाठी साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हय़ातील शेतकऱ्यांना खतांची टंचाई जाणवू नये म्हणून ९० हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आले असून २० हजार मेट्रिक टनाचा साठा आरक्षित केला आहे.

‘खुंदळघास’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
मेहकर, २४ मे / वार्ताहर

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद देशमुख यांच्या ‘खुंदळघास’ या कथासंग्रहाची महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट वाङ्मय मूल्य असलेल्या स.रा. गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ श्रेष्ठता पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून एका पुस्तकाची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने एका ग्रंथाची उत्कृष्ट वाङ्मय मूल्य पारितोषिकासाठी निवड केली जाते.

विधानसभा निवडणकू काँग्रेसने स्वबळावरच लढवावी- मोघे
यवतमाळ, २४ मे / वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात की राष्ट्रवादी सोबत आघाडी करून लढवाव्यात याबद्दल जिल्हा काँग्रेसमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मनापासून काम केले नाही, असा काही ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांचा ‘दबल्या आवाजात’ आरोप आहे. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड यांच्या पराभवाची कारण मीमांसा काँग्रेसचे नेते आता करीत आहेत.

अशा श्वापदांना समाजाने बहिष्कृतच केले पाहिजे
चंद्रकांत ढाकुलकर

सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा इतका भीषण होत चालला आहे की, जात, धर्म, पंथ, भाषा आणि संस्कृतीच्या पल्याड तो विकृतीच्या विळख्यात सापडल्यागत झाला आहे. साऱ्याच घरांना खरे तर त्याने विचार करायला भाग पाडलेले असतानाही ते आमच्या कुणाच्याच फारसे लक्षात आलेले नसावे, याचेच नवल वाटते. महाल परिसरात गेल्या आठवडय़ामध्ये कारमध्ये एका चिमुकलीचा मृतदेह सापडला. कारचे दरवाजे पूर्णत: बंद झाल्याने आणि तिला ते उघडताच न आल्याने गुदमरून हा मृत्यू झाला असावा, असा कयास बांधला जात असताना दुसऱ्याच दिवशी या ७ वर्षांच्या बालिकेवर प्रथम बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला, असे आरोप करण्यात आले.

कृषी कर्जासाठी लाच मागणाऱ्या बँक अधिकाऱ्याला शेतकऱ्याने घडवली अद्दल
गिरीश दुबे, चिखली, २४ मे

मंजूर झालेली कृषी कर्जाची रक्कम देण्यासाठी लाच मागणाऱ्या येथील बँक अधिकाऱ्याला पोलीस कोठडीत पाठवून एका शेतकऱ्याने चांगलीच अद्दल घडवली. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांसाठी मोठय़ा प्रमाणात व विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. प्रत्यक्षात आजही प्रत्येक सर्वसामान्य माणूस व शेतकरी प्रत्येक ठिकाणाप्रमाणे बँकेत देखील नाडला जातो.

देऊळगावराजा पालिकेवर पाण्यासाठी महिलांचा मोर्चा
बुलढाणा, २४ मे / प्रतिनिधी

देऊळगावराजात तब्बल २२ दिवसांपासून पाणी न मिळाल्याने वॉर्ड क्रमांक १३ मधील संतप्त महिला हंडे घेऊन नगरपालिकेवर धडकल्या. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले. शहरातील पाणी समस्या अधिकच बिकट झाली आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाणी असूनही जनतेला १५ ते २० दिवस पाणी मिळत नाही. या भागातील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

तलावाच्या जिल्ह्य़ात पाण्यासाठी भटकंती
साकोली, २४ मे/ वार्ताहर

राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्य़ाची ओळख असली तरी अत्यल्प पाऊस व तीव्र उष्णतेमुळे जिल्ह्य़ातील पाच ते सहा तलाव वगळता अन्य तलाव कोरडे पडले आहेत. प्रचंड प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या उपसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात आहे. परिणामी एप्रिलपासून जिल्ह्य़ातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत असून या पेक्षाही भीषण पाणी टंचाई उद्भवण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तलावाच्या जिल्ह्य़ात पाण्यासाठी हाहाकार असल्याचे चित्र आहे.

पुनर्वसित भगवापूरवासीयांचा ‘भीक मागा’ आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर, २४ मे / प्रतिनिधी

शासन, प्रशासनावरचा विश्वास उडाल्याने पुनर्वसित भगवानपूर येथील संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भीक मागा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या तावडीतून सुटका करतो, असे सांगून गावकऱ्यांची शासनाने फसवणूक केली आहे. पुनर्वसनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा प्रहार या सामाजिक संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.

आर्णी तालुक्यात पाणी टंचाई तीव्र
आर्णी, २४ मे / वार्ताहर

तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांना पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवत आहे. दरवर्षीच या भागातील २० ते २५ गावात पाणी टंचाईचा फटका बसतो. मात्र, यावेळी पावसाअभावी पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याच्या समस्याने उग्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळासह २० गावातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नियोजन अभावी प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे समस्या अधिक जटील बनली आहे. जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेल्याने समस्या अधिक तीव्र झाली आहे. टँकरद्वारे नळयोजनेच्या विहिरीत पाणी टाकण्यात येत आहे व आठवडय़ात एक वेळ नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वैरण टंचाईने शेतकरी हवालदिल
भंडारा, २४ मे/ वार्ताहर

पाणी टंचाई सोबतच वैरणाच्याअभावी गुरांना कसे जगवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर सध्या उभा ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाळीव जनावरांना भरपूर पाणी आवश्यक असते; परंतु जिथे माणसांनाच पाण्याच्या टंचाईने ग्रासले, तिथे जनावरांना पाणी कसे द्यावे हा प्रश्न आहे. बहुतांश विहिरी, तलाव, बोडय़ा आटल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी, बैल, म्हशी विकायला काढल्या आहेत. बैलबाजारात अतिशय कमी दरात जनावरांची विक्री होत आहे. पाणी नाही, चारा नाही तर पोसावे कसे, असे शेतकरी म्हणत आहे.जंगलात वैरण फारसे नाही. जंगलात खूप आतवर जनावरे चारायला नेली तर जंगली प्राण्यांची भीती असते. पूर्वी जिल्ह्य़ात ज्वारी पेरली जायची. कडबा उन्हाळ्यात जनावरांकरिता जीवनदायी ठरे. आज तेही नाही.

औषध विक्रेता संघाची आमसभा शनिवारी
साकोली, २४ मे / वार्ताहर

भंडारा जिल्हा औषध विक्रेता संघाची वार्षिक आमसभा शनिवार ३० मे रोजी भंडारा येथील लॉन्स केमिस्ट भवनात आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा अध्यक्ष निकेत क्षीरसागर यांनी कळवले आहे.

हज इच्छुकांचे अर्ज
भंडारा, २४ मे / वार्ताहर

हज २००९ यात्रेकरिता राज्य हज समितीने सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांकडून इच्छुकांचे अर्ज ३१ मे ०९ पूर्वी मागितले आहेत. महाराष्ट्र राज्य हज समिती, खोली क्र. ६ व ७, एम.एच. साळू सिद्दीकी मुसाफिर खाना मुंबई या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.

विदर्भ पत्रकार मित्र पुरस्कार वितरण
बुलढाणा, २४ मे /प्रतिनिधी

नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात येथील पत्रकार सुनील तिजारे यांना महाराष्ट्र शहर व ग्रामीण पत्रकार संघाचा विदर्भ पत्रकार मित्र पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गुंजखेडच्या सरपंचपदी मोहिनी इंगळे
पुलगाव, २४ मे / वार्ताहर

गुंजखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अटीतटीच्या वातावरणात मोहिनी इंगळे या महिलेची सरपंचपदी निवड झाली. मागील १५ वर्षांपासून सरपंच असलेले अशोक इंगळे यांच्या गटातील त्यांच्या काकूनेच ऐनवेळी गुंगारा दिला. त्यामुळे या महिलेस पळवून नेल्याची तक्रार देण्यात आल्याने वाद वाढला. नंतर पोलिसांनी या महिलेची जबानी घेतली. यात तिने आपणास कोणीही पळविले नसल्याची स्पष्ट कबुली दिली. हा राजकारणाचा एक अंक होता. पुतण्याची खुर्ची काकूने काबीज केली. व सरपंच झाली. विरोधी गटाने काकूला सरपंचपदी ‘ऑफर’ देऊन सत्ता बळकावली.

वीज कोसळल्याने घराला आग
भंडारा, २४ मे / वार्ताहर

लाखांदूर तालुक्यातील कोंढाळा (बेलाटी) येथील यशवंत कायरकर यांच्या कौलारू घरावर रात्री ९.०० च्या सुमारास वीज कोसळल्याने घराला आग लागली. यावेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस येत होता. विजांचा गडगडाटही सुरू होता. पावसातच शेतकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. यावेळी घरातील सर्व कुटुंबीय लाखांदूरला गेले असल्यामुळे जीवित हानी टळली.

कारंजा घाडगेत चोरांचा धुमाकूळ
कारंजा घाडगे, २४ मे / वार्ताहर

शहरात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री सहा निवासस्थानी चोरी करून एक लाखापेक्षा अधिक रकमेचा माल लंपास केला. कुलूप बंद असलेली घरे चोरांनी फोडली. येथील चंद्रकला वनस्कर यांच्या घरून ३० हजार रुपये, लीलाधर देशमुख यांच्या घरून २१ हजार, प्रा. अरुण फाळके यांच्या घरून ३० हजार, प्रा. सुरेश कडवे यांच्या घरून चार हजार तर उकल्ले यांच्या घरून १० हजार रुपयांचा माल चोरांनी लंपास केला.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या. शहरात चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

बँक व्यवस्थापकासह तिघांना पोलीस कोठडी
चिखली, २४ मे/ वार्ताहर
शेतकऱ्याला कर्जाची रक्कम देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तीन आरोपींना बुलढाणा येथील विशेष न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी शाखा व्यवस्थापक, डी.आर. तलमले यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते.
लाच स्वीकारण्यात मध्यस्थी करणारा सुभाष गिरी व दगडू हिवाळे यासह व्यवस्थापक डी.आर. तलमले यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.

अमरावतीचा सागर इंगोले ‘विदर्भ केसरी’
वर्धा, २४ मे / प्रतिनिधी

नागपूरच्या मोहम्मद परवेझ शेख या मल्लाने कुस्ती अर्धवट सोडल्याने अमरावतीच्या सागर इंगोले यास ‘विदर्भ केसरी’चा बहुमान मिळाला. देवळीत माजी आमदार रामदास तडस यांच्या पुढाकाराने सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. मोहम्मद शेख या मल्लाने प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीवर संताप व्यक्त करीत कुस्ती सोडली. विदर्भ केसरी सागर इंगोले यास पुरस्कारादाखल चांदीची गदा व रोख ११ हजार रुपये देण्यात आले. गेल्यावर्षीचा विदर्भ केसरी सुबोध भागडकर हा तृतीयस्थानी राहिला. महिला विदर्भ केसरीचा मान नागपूरच्या भारती वेणू हिने नागपूरच्याच पूजा नागपूरकरवर मात करीत पटकावला. सांघिक विजेतेपद अमरावती जिल्ह्य़ाने प्राप्त केले. आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष शोभा तडस, माजी आमदार रामदास तडस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.

बसच्या धडकेने महिला ठार
चिखली, २४ मे/ वार्ताहर

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी चढण्यास येत असलेल्या वृद्ध महिलेला बसची जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात ७८ वर्षीय महिला जागीच ठार झाली आहे. तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. बुलढाणा- चिखली ही बस बोरगाव वसू बसथांब्यासमोर उभी असताना गंगुबाई सुरडकर ही वृद्ध महिला चिखलीकडे येण्यासाठी त्याच बससमोरून येत होती. बसचालकाने वाहकाकडून सूचना मिळताच पुढे न पाहता बस सुरू केल्याने धडक लागली. त्यात ती ठार झाली.