Leading International Marathi News Daily

सोमवार, २५ मे २००९

विविध

एअर इंडियाच्या हवाईसुंदरीचा चेन्नईत मृत्यू
चेन्नई, २४ मे/पी.टी.आय.

 

एअर इंडियाची २५ वर्षीय हवाई सुंदरी नीतिशकुमारी येथील जे. जे. नगर भागातील तिच्या भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. ती मूळची बिहारची असून कुजलेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह सापडल्याने येथे खळबळ उडाली आहे. मागील बुधवारी ती कामावर हजर होती, त्यानंतर मात्र ती आलेली नाही. तिचे काही सहकारी तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या फ्लॅटवर आले, पण त्यांना तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे आढळले. त्यांनी तिच्या घराच्या मालकाला या बाबीची जाणीव करून दिली. मालकाने पोलिसांना बोलावल्यानंतर पोलिसांना कॉटच्या खाली नीतिशकुमारी हिचा मृतदेह आढळून आला. नीतिशकुमारी हिने आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिंगोरामध्ये तालिबानची अनेक ठाणी
पाकिस्तानच्यालष्कराकडून काबीज
इस्लामाबाद, २४ मे/पी.टी.आय.

स्वात खोऱ्यातील प्रमुख शहर मिंगोरामधील अनेक ठाणी तालिबानकडून पाक लष्कराने हस्तगत केली असून रस्त्यारस्त्यांवर पाकिस्तानी सैनिकांचा तालिबानी
बंडखोरांशी संघर्ष झाला. आता स्वात खोऱ्यात पाक लष्कराकडून सुरू झालेली ही मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मिंगोरा हे शहर तालिबानच्या अखत्यारीत असून पाकिस्तानी सैन्याने शहरातील आठ ठाणी ताब्यात घेतली आहेत. वट्टकई, नवाकिली, निशात, सिराफे, गुलशन, ग्रीन, हाजी बाब आणि सोहराब हे आठ चौक पोलिसांनी तालिबानींच्या ताब्यातून हिसकावून घेतले आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत १० तालिबानी बंडखोर कारवाईत ठार झाले असून १४ जणांना अटक केली आहे. तीन सैनिकही या कारवाईत ठार झाले असून सहाजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ओराकझाई आदिवासी भागात पाकिस्तानी जेट विमानांनी तालिबानींच्या लपण्याच्या जागांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आठ बंडखोर व दोन नागरिक ठार झाले आहेत. एका दूरध्वनी नियंत्रण कक्षावरही हवाई हल्ले झाले व त्यामध्येच नागरिक ठार झाले आहेत. ज्या भागातून तालिबानींनी अल्पसंख्यांक शीख समुदायाला हुसकावून लावले व त्यांच्याकडून खंडणी वसुल केली त्याच भागात पाकिस्तानी जेट विमानांनी गोळीबार केला आहे.

व्हिएन्नातील गुरुव्दारामध्ये शिखांच्या दोन गटांतील चकमकीत ११ जखमी
व्हिएन्ना, २४ मे/पीटीआय

येथील गुरुद्वारामध्ये शीख भाविकांच्या दोन परस्परविरोधी गटांमध्ये आज झालेली चकमक व करण्यात आलेल्या गोळीबारात ११ जण जखमी झाले. श्री गुरु रविदास सभा येथील शीख धर्मगुरुंनी दिलेल्या प्रवचनामुळे हा संघर्ष उद्भवला. पोलिसांनी सांगितले की, शीखांच्या दोन्ही गटांनी परस्परांवर गोळीबार तसेच चाकूहल्ला केला. या चकमकीत नऊ जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लाप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या वादाची परिणती या चकमकीमध्ये झाली. त्यामध्ये पाच जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा गुरुद्वारा ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे रुडोल्फशेम भागात हा गुरुद्वारा आहे.

अ‍ॅटलांटिस यान पृथ्वीवर परतले
हवाई दलाचा एडवर्डस् तळ,
कॅलिफोर्निया, २४ मे/पीटीआय

हबल दुर्बिणीत दुरुस्ती करणे व अद्ययावत यंत्रणा बसविण्याची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडून अ‍ॅटलांटिस यान त्यातील सात अंतराळवीरांसह आज पृथ्वीवर परतले. कॅलिफोर्नियातील एडवर्डस् तळावर हे यान उतरविण्यात आले. हे यान आधी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हेरा १ येथील तळावर उतरविण्यात येणार होते परंतू खराब हवामानामुळे अखेर त्याचे पुनरागमनाचे ठिकाण बदलण्यात आले. सुमारे १२ दिवस, २१ तास व ३७ मिनिटांचा प्रवास करून अ‍ॅटलांटिस यान पृथ्वीवर परतले.