Leading International Marathi News Daily
मंगळवार, २६ मे २००९

*दोन ठार * चार शहरांमध्ये संचारबंदी *पंतप्रधानांचे शांततेचे आवाहन
जालंधर, २५ मे/पी.टी.आय.
व्हिएन्नामध्ये दोन शीख गटांमध्ये झालेल्या संघर्षांचे तीव्र पडसाद आज पंजाब आणि हरियाणामध्ये उमटले. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोन ठार, तर अनेक जण जखमी झाले. व्हिएन्नातील हिंसाचारात शीख संताच्या मृत्युची बातमी पसरल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून ट्रेन, बसेसवर हल्लाबोल केला. ठिकठिकाणी सरकारी मालमत्तेच्या जाळपोळीच्या तसेच हिंसाचाराच्या घटना घडल्या. पोलीस आणि आंदोलक यांच्यात धुमश्चक्री निर्माण झाल्यामुळे जालंधर, लुधियाना, फगवारा आणि होशियारपूर शहरांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून जालंधरमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बंगालच्या किनारपट्टीला ‘एला’ चक्रीवादळाचा तडाखा
१९ जणांचा मृत्यू एक लाख विस्थापित जनजीवन विस्कळीत
कोलकाता/पुणे, २५ मे/ वृत्तसंस्था/खास प्रतिनिधी
पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर आज दुपारी ‘एला’ नावाचे तीव्र चक्रीवादळ धडकल्याने राज्याच्या किनारी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, कोलकाता व दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ात मिळून एकूण एकोणीसजण मृत्युमुखी पडले आहेत. समुद्राच्या महाकाय लाटा, ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहणारा वादळी वारा आणि जलमय परिसर यांचा फटका एक लाखांहून अधिक लोकांना बसला असून, ८० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. राज्यात मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
५५ ते ६० मंत्र्यांचा शपथविधी
नवी दिल्ली, २५ मे/खास प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळात शुक्रवारी १९ ज्येष्ठ सहकाऱ्यांचा समावेश केल्यानंतर उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुसऱ्या फेरीत पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएतील घटक पक्षांचे प्रतिनिधी तसेच काँग्रेसमधील तरुण रक्ताला वाव देण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनात उद्या सायंकाळी हा शपथविधी होणार आहे. आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेऊन काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे आणि त्यांना द्यावयाच्या खात्यांविषयी चर्चा केली.

शिवसेनेच्या नगरसेवकांचे आमदारकीच्या उमेदवारीपूर्वीच मनसेकडून डिपॉझिट जप्त!
बंधुराज लोणे
मुंबई, २५ मे

लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेल्या जबरदस्त धक्क्यातून शिवसेनेचे वरिष्ठ नेते सावरले नसताना आता शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांना जळी तळी काष्टी पाषाण मनसेच दिसत आहे. आगामी विधानसभेत जाण्याचा त्यांचा मार्ग मनसेमुळे रोखला जाणार, अशी भीती त्यांना सतावत असून मनसेला कसे रोखणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मनसेमुळे लढण्याआधीच या नगरसेवकांचे आमदारकीचे डिपॉझिट जप्त झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

महात्मा फुले यांचे नाव पुसून मनोहर जोशींचे देण्याचा वादग्रस्त प्रस्ताव!
मुंबई, २५ मे/प्रतिनिधी

शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी यांचे शागिर्द सेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांच्या शिक्षण संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या नावातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव वगळून मनोहर जोशी यांचे नाव समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाने मंजूर करावा याकरिता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या वादग्रस्त प्रस्तावाला विविध थरातून विरोधही होत आहे. बाबुराव माने यांनी मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांना ४ एप्रिल २००९ रोजी लिहिलेल्या पत्रात वरील प्रस्ताव दिला आहे. माने यांनी म्हटले आहे की, मी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहे.

मुंबई विमानतळावर भरदिवसा १४५ किलो सोन्या-चांदीची चोरी
बुरखाधारी चोरटय़ांचा पोबारा
मुंबई, २५ मे / प्रतिनिधी
मुंबई विमानतळावरील कारगो टर्मिनलमधून आज सकाळी १४५ किलो सोन्या-चांदीने भरलेले खोके लुटून चार बुरखाधारी चोरटय़ांनी पोबारा केला. या चोरटय़ांना रोखण्याच्या प्रयत्नात गंभीररीत्या जखमी झालेला एअर इंडियाचा पहारेकरी दिलीप भोसले याचे सायंकाळी निधन झाले. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था दुबळी असल्याचे उघड झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात ‘आयआयटी क्रांती’!
पुणे, २५ मे/खास प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आव्हान समर्थपणे पेलत प्रशासनामध्ये मराठीचा टक्का वाढला असतानाच आता भारतीय तंत्रज्ञान संस्था, म्हणजेच आयआयटीसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांमध्येही मराठी विद्यार्थी विक्रमी संख्येने पाऊल ठेवणार आहेत. यंदा राज्यातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’ प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

संशयास्पद वस्तूमुळे मस्कत-चेन्नई विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग
मुंबई, २५ मे / प्रतिनिधी

मस्कतहून चेन्नईकडे निघालेल्या ओमान एअरच्या विमानातील शौचालयात धातूची संशयास्पद वस्तू आढळल्याने आज त्याचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. सीआयएसएफने सदर वस्तू ताब्यात घेतली असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत सदर विमान मुंबई विमानतळावरच होते. ओमान एअरचे हे विमान ११० प्रवाशांना घेऊन मस्कतहून चेन्नईकडे निघाले होते. एका हवाई सुंदरीला विमानाच्या शौचालयात धातूची एक संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यासोबत ‘यू ऑल विल बी डेड, बाय’ असा संदेश असल्याने दुपारी १.१६ वाजता हे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. तेथे हे विमान सुरक्षा तपासणीसाठी निर्जनस्थळी हलवून ‘सीआयएसएफ’ने त्याचा ताबा घेतला. कसून तपासणीनंतर विमानातील सदर संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन, इलेक्ट्रॉनिक सर्किटप्रमाणे भासणारी ही वस्तू पुढील तपासासाठी तांत्रिक पथकाकडे सोपविली. याखेरीज संदेशाचेही हस्ताक्षरावरून विश्लेषण करण्यात येत आहे.

हेकेखोर उत्तर कोरियाने दुसऱ्यांदा केली अणुचाचणी
याँगयांग, २५ मे/पी.टी.आय.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या दबावाची पर्वा न करता उत्तर कोरियाने आज आपली दुसरी अधिक क्षमतेची अणुचाचणी केली. उत्तर कोरियाच्या या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून या देशावर आर्थिक बंधने लादली जाण्याची तसेच कठोर कारवाई केली जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे संतप्त झाले असून या देशाविरुद्धआंतरराष्ट्रीय पातळीवर काही ठाम कृती करण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला. कोरियाच्या मध्यवर्ती वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, २५ मे रोजी उत्तर कोरियाने आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्याकडे असलेले आण्विक सामथ्र्य अधिक सक्षम करण्यासाठी जमिनीखाली दुसरी अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी