Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

व्यापार - उद्योग

रत्नाकर बँकेचे २९०० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट
व्यापार प्रतिनिधी: रत्नाकर बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची परिषद अलीकडेच कोल्हापूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी एस. जी. कुत्ते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकूण रुपये २९०० कोटी व्यवसायवाढीबरोबर गुणात्मक व्यवसायवाढीकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट अकाऊण्टण्ट्सचे के. जे. सोमय्यामध्ये केंद्र
व्यापार प्रतिनिधी: के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च मॅनेजमेण्ट अकाऊण्टण्ट्सची जगातील आघाडीची व्यावसायिक संस्था ‘सीमा’शी सहकार्य करार केला असल्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून सीमा पात्रतेसाठी शिक्षण सहायता केंद्र उभारणे शक्य होणार आहे. एसआयएमएसआर ही भारतातील सर्वोत्तम २० बिझनेस स्कूलपैकी एक आहे.

आयडिया सेल्युलरचा तामिळनाडूत प्रवेश
व्यापार प्रतिनिधी: राष्ट्रीय स्तरावर आपल्या पाऊलखुणा विस्तारताना, देशातील अग्रगण्य दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या आयडिया सेल्युलरने तामिळनाडू राज्यात प्रवेश करून देशातील १३० शहरांमध्ये आपल्या जीएसएम सेवांचे जाळे विस्तारले आहे. तामिळनाडूत संपूर्ण चेन्नई शहर आणि त्यानंतर वर्षांच्या अखेपर्यंत ५०० गावांना आयडिया सेल्युलर सेवा देईल. ६७ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि ५० टक्क्यांहून अधिक ‘टेलीडेन्सिटी’ असलेले तामिळनाडू राज्य आयडियासाठी दक्षिण भारतातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाईल. देशातील १७ टेलिकॉम सर्कल्समधील ४.४ कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा प्रदान करणारी आयडिया सेल्युलर ही भारतातील तिसरी मोठी जीएसएम सेवा आहे.

मुंबई बँकेच्या नफ्यात रु. १९.७४ कोटीने वाढ
व्यापार प्रतिनिधी: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अर्थात मुंबई बँकेने ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेने सर्व क्षेत्रात भरीव प्रगती साध्य केली आहे. बँकेचे ३१ मार्च २००९ अखेर नक्त एनपीएचे प्रमाण ३.७५ टक्के इतके आहे. बँकेच्या एकूण ४३ शाखा व १८ विस्तार कक्ष असून ते कोअर बँकिंग प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत. डिमॅट खाते उघडणे, जनरल व जीवन विमा पॉलिसी, आर.टी.जी.एस.द्वारे फंड ट्रान्स्फर सुविधा इ. सेवा बँकेद्वारे ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. तसेच बँकेच्या काही शाखांमधून फ्रँकिंग सुविधा उपलब्ध आहे. बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष उत्तमदादा सावंत व सरव्यवस्थापक आर. के. जैन, तसेच बँकेच्या संचालक मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे ३१ मार्च २००९ अखेर गतवर्षांच्या तुलनेत बँकेने भरीव प्रगती साध्य केली आहे. सन २००९-१० या आर्थिक वर्षांत बँकेच्या खेळत्या भांडवलाचा इष्टांक रु. ४००० कोटींपर्यंत गाठण्याचा तर निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा बँकेचा मानस आहे. मुंबई बँकेची स्थापना ६ ऑगस्ट १९७४ रोजी झाली. स्थापनेपासून मुंबई जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना व वैयक्तिक ग्राहकांना यथोचित आर्थिक साहाय्य (पतपुरवठा) करण्याचे व सर्व प्रकारची बँकिंग सेवा देण्याचे कार्य बँकेमार्फत सातत्याने सुरू आहे. स्थापनेपासून बँकेने आपल्या सभासदांना नियमित लाभांशाचे वितरण केलेले आहे.

युनिकेम लॅबच्या नफ्यात दुपटीने वाढ
१०० टक्के लाभांश वितरण

व्यापार प्रतिनिधी: जागतिक वित्तीय अरिष्टाच्या परिणामी भारतातील अनेक बडय़ा औषधी कंपन्यांची वित्तीय कामगिरी खराब राहिली असताना, युनिकेम लॅबॉरेटरीज लिमिटेडने आश्चर्यकारकरीत्या उत्कृष्ट अशी कामगिरी नोंदविली आहे.३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी युनिकेम लॅबने ६५६.९ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न नोंदविले आहे. गत वर्षी उत्पन्नाचे प्रमाण ५८१.१ कोटी रुपये होते. तर याच कालावधीसाठी निव्वळ नफा गतवर्षांतील ७७.७ कोटी रुपयांवरून १२४.८ कोटी रुपये असा म्हणजे तब्बल ६१ टक्क्यांनी वधारला आहे. तर कंपनीच्या जागतिक व्यवसायाद्वारे निव्वळ नफा ५१.४ कोटींवरून जवळपास दुपटीने वाढून रु. १०८ कोटींवर पोहचला आहे. चौथ्या तिमाहीसाठी कंपनीचे विक्री उत्पन्न रु. १४६.४ कोटी रुपयांवर वाढले आहे. मार्च २००८ अखेरच्या याच तिमाहीसाठी विक्री उत्पन्न रु. १३८.३ कोटी असे होते. तर चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा रु. १८.८ कोटींवरून ४९.५ टक्क्यांनी वाढून रु. २८.१ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने पाच रुपये दर्शनी मूल्याच्या समभागावर पाच रुपये म्हणजे १०० टक्के लाभांश वितरणाचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे कंपनीने सरलेल्या आर्थिक वर्षांत प्रति समभाग तीन रुपये म्हणजे ६० टक्के अंतरिम लाभांशाचे वितरण केले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २००८-०९ साठी एकूण लाभांशाचे प्रमाण १६० टक्के असे होते.