Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

अग्रलेख

मोबाईलची आफ्रिकन सफारी

 

आणखी पाच वर्षांनी भारतातील मोबाईल ग्राहकांची संख्या १०० कोटी, म्हणजे एक अब्ज असेल, असा टेलिकॉम खात्याचा अंदाज आहे. आज देशाची लोकसंख्या एक अब्जाहून थोडी अधिक आहे. म्हणजे साधारणपणे दरडोई (दरकानी!) एक मोबाईल फोन! सरासरी १० वर्षांवरील मुले/मुली मोबाईल फोन वापरतात असे गृहीत धरून. बहुतेकांना १० वर्षांपूर्वीची स्थिती आठवत असेल. तेव्हा मोबाईल फोन वापरणे हे श्रीमंतीचे, प्रतिष्ठेचे आणि हाय फॅशनचे लक्षण मानले जात असे. कित्येकांना त्याही पूर्वीचे म्हणजे २० वर्षांपूर्वीचे दिवस आठवत असतील. तेव्हा तर मोबाईल फोनच नव्हते. असे फोन असतात हेही बहुतेकांना माहीत नव्हते. तेव्हा जसे इंटरनेट नव्हते तसेच मोबाईलही नव्हते. त्यामुळे मोबाईलवर इंटनेट, न्यूज चॅनेल्स, स्टॉक मार्केट, क्रिकेट सामने, टीव्ही सिरीयलसुद्धा असणे हे सर्व चमत्कारच वाटले असते. आता हे सर्व चमत्कार आपल्या जीवनातच आले आहेत. भाजीवाल्यांपासून हातगाडीवाल्यांपर्यंत, टॅक्सी-रिक्शावाल्यांपासून ते फेरीवाल्यांपर्यंत आता मोबाईल फोन आहेत. आता ती फॅशन नाही वा ते श्रीमंतीचे लक्षणही नाही. सुरुवातीला एका मिनिटाला १८ रुपये पडत. आता काही पैशांत आणि त्याच सव्‍‌र्हिसचा असेल तर काही वेळा मोफतही फोन होतो! आजपासून बरोबर वीस वर्षांपूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना देशातील टेलिकॉम उद्योगात सुधारणा सुरू झाल्या. खरे तर त्यांना सुधारणा म्हणण्याऐवजी ती टेलिकॉम क्रांतीची नांदीच होती, असे म्हणणे योग्य ठरेल. त्याकाळी घरात टेलिफोन असणे ही चैनीची बाब समजली जाई. तुमची इच्छा असली तरी टेलिफोन सहजरीत्या उपलब्ध होत नसे. फोन देण्याची मक्तेदारी सरकारी खात्याची होती. कारण त्यावेळी हे क्षेत्र खासगी उद्योगांना खुले करण्यात आलेले नव्हते. एखाद्याने फोन बुक केल्यास त्याला प्रत्यक्ष फोन मिळण्यासाठी कित्येक वर्षांची प्रतीक्षा करावी लाग किंवा कोटय़ातून फोन मिळविण्यासाठी खासदारांच्या घरांचे उबंरठे झिजवावे लागत. ‘ओन युवर टेलिफोन’(ओ.वाय.टी.) सारख्या योजनांतून फोन मिळवायचा झाल्यास पंचवीस हजार रुपयांची रक्कम जमा करावी लागे. आज आपल्याकडे मोबाईलच्या ग्राहकांची संख्या दरमहा आठ ते दहा लाखांनी वाढते आहे. सध्याची ही गती कायम राहिल्यास २०१० साली, म्हणजे पुढच्या वर्षी मोबाईल ग्राहकांची संख्या ५० कोटींवर जाणे काही कठीण नाही. टेलिकॉम उद्योगाची ही वाढ शक्य झाली ती राजीव गांधींनी पंतप्रधानपदी असताना रुजविलेल्या टेलिकॉम क्रांतीच्या बीजामुळेच. गावोगावी लँडलाइनचे बूथ पोहोचविणे ही खऱ्या अर्थाने भारताला एकसंघ करण्याची सुरुवात होती. त्यानंतर नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातील टेलिकॉम मंत्री सुखराम यांनी देशात सर्वात प्रथम टेलिकॉम सर्कलच्या लिलावाचा प्रारंभ केला. इथूनच देशात मोबाईल फोनचे युग सुरु झाले. या लिलावाच्या प्रक्रियेत सुखराम यांनी भ्रष्टाचार करुन आपले उखळ पांढरे करुन घेतले. सुरुवातीला १६ रुपये प्रति कॉल व इनकमिंग कॉलसाठी सात रुपये मोजावे लागत होते. त्यावेळी मोबाईल हे काही सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत असेच चित्र होते. मात्र अशा प्रकारे फक्त श्रीमंतांसाठी मोबाईलची बाजारपेठ मर्यादित ठेवणे मोबाईल कंपन्यांना परवडणारे नव्हते. मोबाईलची बाजारपेठ विस्तारावयाची असेल तर त्याचे दर उतरले पाहिजेत हे कंपन्यांनी ओळखले. बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत मोबाईल कंपन्यांनी हळूहळू कॉल्सचे दर उतरवायला सुरुवात केली. रिलायन्सने या क्षेत्रात पाऊल टाकले आणि सर्व चित्रच पालटले. मोबाईल इन्कमिंग मोफत झाले ते याच काळात. रिलायन्सचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानी यांनी पोस्टकार्डाच्या दराइतका म्हणजे २५ पैसे मोबाईल फोनचा दर ठेवण्याची घोषणा केली होती. रिलायन्सने तसे शक्यही करुन दाखविले. कंपन्यांमधील या स्पर्धेचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना झाला आहे. खुल्या आर्थिक धोरणांचा सर्वसामान्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरावे. टेलिकॉम उद्योगातील उत्कृष्ट तंत्रज्ञान आपण गेल्या दशकात आत्मसात केले आहे. आपल्याकडे जगात या क्षेत्रात जो झपाटय़ाने तंत्रज्ञान विषयक बदल होत गेला तो आपण स्वीकारत गेलो. दहा वषार्र्पूर्वी पेजर आले कधी आणि ‘डोळ्याचे पाते लवते ना लवते’ तोच ते काळाआडही गेले. मोबाईल आले आणि पेजर कालबाह्य झाले. मोबाईलमध्येही झपाटय़ाने तंत्रविषयक बदल होत गेले. आता तर आपण थ्रीजी तंत्रज्ञानाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलो आहेत. म्हणजे आपण या क्षेत्रात अमेरिकेच्या जोडीने भरारी घेतली आहे. आपली मोबाईलची बाजारपेठ झपाटय़ाने विस्तारल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या यावर डोळा ठेवून होत्या. मोठी भांडवली गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे प्रवेशही केला. टेलिकॉम क्षेत्रात गेल्या दशकात सर्वात मोठी ‘मर्जर व अ‍ॅक्विझिशन्स’ झाली ती यामुळेच. व्होडाफोनसारखी बहुराष्ट्रीय कंपनी भारतातील उलाढालीमुळेच जगात नफ्यात येऊ शकते, हे वास्तव आहे. परंतु यात सर्वात महत्त्वाची व समाधानकारक बाब म्हणजे या बहुराष्ट्रीय कंपनीशी स्पर्धा करीत भारती एअरटेल ही भारतीय कंपनी या उद्योगातील भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून उदयास येत आहे. भविष्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेची एम.टी.एन. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेली चर्चा फलद्रूप झाल्यास जगातील टेलिकॉम उद्योगात एक नवा अध्याय लिहिला जाईल. सध्या भारतीकडे १० कोटी ग्राहक आहेत. त्यांच्याकडे दुसरी एखादी कंपनी ताब्यात घेण्यासाठी राखीव निधीचा पुरेसा साठाही आहे. या कंपनीची गेल्या दशकातील कामगिरी हा एक कॉर्पोरेट क्षेत्रातला चमत्कारच म्हणावा लागेल. गेल्या सात वर्षांत भारती एअरटेलची उलाढाल सुमारे ८०० टक्क्यांनी वाढली, तर निव्वळ नफा १२ लाख रुपयांवरुन ७८०० कोटी रुपयांवर गेला आहे. टेलिकॉम उद्योगाची आपल्या देशातली वाढ या कंपनीच्या उलाढालीत व नफ्यात नेमकी प्रतिबिंबित झाली आहे. कारण भारतीचा उदय हा नेमका याच काळातला आहे. आपल्याकडील टेलिकॉम क्षेत्र खुले झाले त्यावेळी स्थापन झालेल्या या कंपनीच्या ताब्यात आज १० कोटींची ग्राहक संख्या आहे. सुरुवातीच्या काळात भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांना कॉंग्रेसचा आशीर्वाद लाभलाही असेल. परंतु या कंपनीच्या वाढीचा वेग एवढा जबरदस्त होता की, त्यांना नंतरच्या काळात कधीच कोणत्या पक्षांच्या कुबडय़ा घ्याव्या लागल्या नाहीत. गेल्या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेची १० कोटी ग्राहकसंख्या असलेली टेलिकॉम कंपनी एम.टी.एन. ताब्यात घेण्यासाठी चर्चा सुरू केली होती. परंतु या वाटाघाटी फिसकटल्या. त्यानंतर अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सनेही ही कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुकेश-अनिल यांच्या भांडणांचे पडसाद यात उमटले आणि ही कंपनी ताब्यात घेण्याचा अनिल यांचा प्रयत्न फसला. या घटनेला एक वर्ष लोटले. मात्र सुनील भारती यांनी आशा सोडली नाही. आता पुन्हा एकदा ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी चर्चा सुरू झाल्याने एअरटेलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी बहुदा एअरटेल ही कंपनी ताब्यात घेण्यात यशस्वी होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. हे ‘टेकओव्हर’ प्रत्यक्षात उतरल्यास २० कोटी ग्राहक असलेली आणि २० अब्ज डॉलरची उलाढाल असलेली, ही चीन वगळता अन्य जगातील ही सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरेल. मात्र यासाठी भारती एअरटेलला २९ अब्ज डॉलर खर्च करावे लागतील. अर्थात एअरटेलची एवढा खर्च करण्याची तयारी आहे. हे ‘टेकओव्हर’ प्रत्यक्षात उतरल्यास जागतिक बाजारपेठेत ठसा उमटविणारी टेलिकॉम उद्योगातील भारती ही महत्त्वाची आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असेल. आपण आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरु केल्यापासून सर्वात प्रथम सुधारणा हाती घेतल्या त्या टेलिकॉम क्षेत्रात. आणि आज सुमारे दोन दशकानंतर आपल्या देशातील या उद्योगातील कंपनी केवळ देशातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवित आहे. त्यावेळी आपण जर या सुधारणा हाती घेतल्या नसत्या तर कदाचित अजूनही टेलिफोनसाठी प्रतीक्षा यादीत ताटकळण्याची पाळी आपल्यावर आली असती. परंतु तसे झाले नाही. याचे सर्व श्रेय राजीव गांधींपासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे जाते. कारण राजीव गांधी यांनी सुरू केलेल्या या सुधारणा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने सुरू ठेवल्या आणि शेवटी सर्वसामान्यांच्या हाती मोबाईल दिसू लागले. दक्षिण आफ्रिकेत आय.पी.एल.यशस्वी झाल्यावर आता आणखी एक आफ्रिकन कंपनी ताब्यात घेऊन उभय देशातील उद्योजकीय संबंधांना नवा पैलू प्राप्त होईल. सुनील भारतींची आफ्रिकन उद्योगातील ही सफारी यशस्वी होईल यात काही शंका नाही.