Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

‘कचऱ्यापासून सोने निर्माण होऊ शकते..’ अशी एक उक्ती आहे. अगदी प्रत्यक्षातही ते शक्य आहे. अर्थात त्यासाठी सर्वप्रथम कचऱ्याला ‘कचरा’ म्हणणे सोडून दिले पाहिजे, तरच ते शक्य होऊ शकणार आहे. आपण सर्व शाळेत असताना टाकाऊपासून टिकाऊ, जुन्या वस्तूपासून नवी वस्तू आदी प्रयोग करत असतो, पण ते केवळ मार्क मिळण्यापुरते करतो. एकदा निकाल लागला की मग आपण त्या संकल्पनांकडे डोळेझाक करतो. पण हेच प्रयोग आपल्या प्रत्यक्ष जीवनात बराच बदल घडवून आणू शकतात. कचऱ्यापासून ‘बायोगॅस’, ‘जैवखत’ आदी उपयुक्त बनविण्याची प्रक्रिया गेली अनेक वष्रे आपल्याकडे सुरू आहे. पण अद्यापि ती सामान्यांच्या पचनी पडलेली नाही. त्याला विविध कारणे असतीलही, पण एक महत्त्वाचे कारण म्हणजे सामान्यांच्या ठायी अशा प्रकल्पांच्या बाबतीत असणारी उदासीनता. घनकचरा व्यवस्थापन ही आज आपल्या देशातील महत्त्वांच्या समस्यांपैकी एक आहे. नवनवीन साथीच्या रोगांचे मूळही हेच आहे. जर सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरविल्यास अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यातील एक सर्वात सुकर पर्याय म्हणजे ‘निसर्गऋण’.

‘प्रायोगिक’ नाटकांचा धांडोळा
मराठी वाङ्मय व्यवहारात ‘नाटक’ या साहित्यप्रकाराची फारशी दखल घेतली जात नाही. (शासनाच्या साहित्यविषयक पुरस्कारांत मात्र असा भेदभाव केला जात नाही.) आजवर आचार्य अत्र्यांसारख्या काही गिन्याचुन्या नाटककार-साहित्यिकांनाच साहित्य संमेलनाचं सन्माननीय अध्यक्षपद मिळालेलं आहे. साहित्य संमेलनात ‘नाटक’ या लेखनप्रकाराला किंवा नाटक काराला मानाचं पान तसं क्वचितच मिळतं. यंदा तसं ते प्रेमानंद गज्वी यांना मिळालं. मात्र, त्याचबरोबर आश्चर्याचा एक सुखद धक्काही अखिल भारतीय साहित्य महामंडळाने यावर्षी दिला आहे. ‘अक्षरयात्रा’चा वार्षिकांक चक्क ‘मराठी प्रायोगिक नाटक विशेषांक’ म्हणून काढून! त्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि या विशेषांकाचे संपादक डॉ. अरुण प्रभुणे हे दोघेही खरोखरीच कौतुकास पात्र आहेत. साहित्य आणि एकूणच साहित्य व्यवहाराबद्दलची अशी व्यापक व सर्वस्पर्शी भूमिकाच साहित्य महामंडळाकडून अपेक्षित आहे.

जनार्दन लवंगारेंचं ‘जय हो!’
खुमासदार विनोदी नाटकांसाठी परिचित असलेल्या लेखक- दिग्दर्शक जनार्दन लवंगारे यांचं नवं नाटक ‘जय हो!’ लवकरच रंगमंचावर येत आहे. या नाटकाचा नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालाशी काहीही संबंध नाही, तर विल्यम शेक्सपीअरच्या ‘ऑथेल्लो’ या अजरामर नाटकाचे मराठी लोककलेच्या अंगाने व विनोदी ढंगाने केलेले रूपांतर आहे. चंद्रकला निर्मित ‘जय हो!’चे लेखन-दिग्दर्शन लवंगारे यांचंच असून, नेपथ्य अजय पुजारे- प्रकाश परब यांचं आहे. प्रकाश योजना महेंद्र भांबिड यांची, तर निर्मिती सूत्रधार आहेत महेश मांजरेकर. ‘जय हो!’ मध्ये प्रदीप पटवर्धन, जनार्दन लवंगारे, अरुण पाचपुते, कुशल कोळी, पूजा अडकर, सविता हांडे आणि मौसमी तोंडवळकर हे कलाकार काम करत आहेत. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग ६ जून रोजी दुपारी ४.३० वा. अत्रे रंगमंदिर (कल्याण) आणि ७ जून रोजी दुपारी ४.३० वा. दीनानाथ नाटय़गृह (विलेपार्ले) येथे होणार आहेत.