Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

ठाण्याच्या पराभवावर सेनाभवनात उद्या बैठक
रमेश वैती बनणार बळीचा बकरा?
ठाणे, २६ मे/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या ठाण्याच्या जागेबाबत शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी यांची झाडाझडती आता सेनाभवनात स्वत: उद्धव ठाकरे घेणार आहेत. गुरुवारी सेनाभवनात उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, तसेच सर्व नगरसेवक यांना बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश काढले.
या बैठकीतच ठाण्याची हक्काची जागा कशी पडली, याचे विश्लेषण तपासण्यात येणार आहे.

चणेफुटाणे, गुलाबजामून आणि बर्फी..
अशोक तुपे
श्रीरामपूर, २६ मे

मतदारांना प्रलोभन दाखविणे बेकायदेशीर असले, तरी अनेक उमेदवार पैसे व दारू वाटतात. त्याची चर्चा निकालानंतरही सुरू असते. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात चणेफुटाणे, गुलाबजामून आणि बर्फीची चर्चा चविष्टपणे होत आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत रिपाइंचे उमेदवार रामदास आठवले यांचा शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सव्वा लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. हा पराभव रिपाइंच्या वर्मी लागला असून, त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब विखे यांना लक्ष्य केले आहे.

बसपचा हत्ती ‘जेरबंद’
नितीन तोटेवार
नागपूर, २६ मे

‘हाथी नही गणेश है’ ‘जिसकी जितनी भागिदारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ अशा घोषणा देत लोकसभेसाठी महाराष्ट्रात कूच करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या हत्तीला राज्यातील मतदारांनी पार ‘जेरबंद’ केले. उत्तर प्रदेशचा फाम्र्युलाचा आधार घेत विदर्भात तीन जागांचे स्वप्न बघणाऱ्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचे स्वप्न उध्वस्त झाले पण, वाढलेल्या मतांमुळे विधानसभेसाठी त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत विदर्भातील अकराही जागा लढवणाऱ्या बसपला ५ लाख ४८ हजार मते, तर यंदा १० पैकी ९ जागांवर ७ लाख ६१ हजार मते मिळाली. अकोल्यात बसपचा उमेदवार नव्हता.

आंध्र प्रदेशात गृहमंत्रिपदाचा प्रथमच महिलेकडे कार्यभार
हैदराबाद, २६ मे/पीटीआय

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी आज आपली मानलेली बहीण पी. सविता इंद्रा रेड्डी यांना राज्याचे गृहमंत्रिपद बहाल केल्यामुळे या पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. योगायोग म्हणजे सविता यांचे दिवंगत पतीसुद्धा १९९४-९५ दरम्यान एन.टी.रामाराव यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. काल रात्री शपथ घेतलेल्या मंत्र्यांची खाती आज मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे सर्वसामान्य प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, जकात आणि दारूबंदी, व्यावसायिक कर, याशिवाय ज्या खात्यांचे वाटप झालेले नाही ती सर्व खाती ठेवली आहेत, असे सरकारी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान, के. रोसय्या, धर्माण्णा प्रसाद राव, एन.रघुवीर रेड्डी आणि पोन्नाला लक्षमय्या या वरिष्ठ मंत्र्यांकडे त्यांची पूर्वीच्याच, अनुक्रमे आर्थिक आणि विधानसभा कामकाज, महसूल, कृषी आणि पाटबंधारे या खात्यांचाच कार्यभार ठेवण्यात आला आहे. ही सर्व खाती महत्त्वाची असल्यामुळे त्यात बदल न करता ज्यांच्याकडे होती त्याच मंत्र्यांकडे ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पसंत केले. आंध्र प्रदेशातील महत्त्वाकांक्षी ‘जलयग्यनम’ कार्यक्रम वेगाने सुरू असल्यामुळे आणि पोन्नाला यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती असल्यामुळे त्यांच्याकडेच पाटबंधारे खाते ठेवण्यात आले आहे; परंतु इतर महत्त्वाच्या खातेवाटपांबाबत मात्र काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील बडी असामी शिल्पा मोहन रेड्डी यांच्याकडे महत्त्वाचे गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. राज्यातील कमजोर वर्गाकरिता सुरू केलेल्या गृहनिर्माण कार्यक्रमाव्यतिरिक्त राज्य सरकारने मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी बाजारपेठेतील प्रचलित दरापेक्षा २५ टक्के कमी दराने ‘स्वगृह’ हा गृहबांधणीचा कार्यक्रमही हाती घेतला असला तरी त्याचे काम अपेक्षेपेक्षा फारच मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न बघणाऱ्या लाखो लोकांचे स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे.