Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

लोकमानस

डॉक्टर-रुग्ण संबंध सुधारण्याकरिता..

 

चरक, सुश्रुतांच्या काळापासूनचा इतिहास असणारा, धन्वंतरी ज्याचे जनक मानले गेले आहेत, असा हा प्रतिष्ठित व आदरणीय व्यवसाय, आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये कसा भासतो? तो आदरणीय वाटावा अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. समाज व डॉक्टर्स यांच्यात अंतराय पडण्यास कधी सुरुवात झाली व त्याची दुराव्याची खोल दरी कशी झाली ते कुणालाही कळले नाही. आजच्या घडीला वैद्यक व्यावसायिक व रुग्ण, त्यांचे नातेवाईक सदैव एकमेकांविरुद्ध सज्ज आहेत, केवळ ठिगणी पडायचा अवकाश असेच वाटते.
कधी के.ई.एम.मध्ये संप, तर कधी नागपुरात डॉक्टर्सना मारहाण, रुग्णालयांची तोडफोड या बातम्या नित्यनेमाने वाचण्यात येतात. सहसा अशा घटनांमागचे कारण असते एखाद्या रुग्णाचा अकस्मात मृत्यू किंवा रुग्णावर चुकीचे उपचार झाल्याचा आप्तेष्टांचा निष्कर्ष. एखाद्या आजाराचे स्वरूप, त्याची निदान प्रक्रिया, आजारातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती तसेच उपचारपद्धती आणि त्याला येणाऱ्या यशाची शक्यता या सर्व बाबी समजावणे व समजून घेणे या प्रक्रियेत अवरोध उत्पन्न झाला आहे. सर्व उपचार व्यवस्थित होऊन रुग्ण खडखडीत बरा झाला तरी काही ठिकाणी हॉस्पिटलच्या बिलावरून वादंग होतात. वैद्यक व्यावसायिकांना वारंवार आजकाल पडणारा प्रश्न म्हणजे आपला व्यवसाय जर ‘नोबल’- उदात्त - समजला जातो तर सर्व बाबतीत आपल्याला कमर्शियल किंवा धंदेवाईक नियम अथवा कायदे का लावले जातात? असा प्रश्न पडणाऱ्या व्यावसायिकांना एक गोष्ट पटवून घेणे अतिशय जड जाते, ती म्हणजे बऱ्याच अंशी समाजाचा आर्थिक स्तर उंचावला असला तरीही रुग्णालयाचे बिल भरताना हा अनाठायी खर्च असल्याची अथवा आपण लुबाडले गेले असल्याची भावना रुग्ण व नातेवाईकाच्या मनास स्पर्शून जाते. आपण रुग्णालयात कशा परिस्थितीत प्रवेश घेतला होता याचाही मग सोयीस्कर विसर पडतो. वर नमूद केलेल्या विविध कारणांमुळे डॉक्टर व पेशंटचे नाते सौहार्दाचे राहिलेले नाही. त्यात रुक्षपणा व कोरडी व्यावहारिकता आली आहे. या नात्यातील व्यावहारिकतेचा पडदा बाजूला करून निर्मळ संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी काही मार्ग सुचवत आहे.
१) नागरिक मार्गदर्शक समिती- सदर समितीमध्ये वेगवेगळ्या वैद्यक शाखांशी संबंधित दोन, तीन तज्ज्ञ- जे स्थानिक आय.एम.ए. शाखेने नियुक्त केले असतील- काम करतील. या समितीतर्फे एक पी.ओ. बॉक्स नंबर दिला जाईल. सदर पी.ओ. बॉक्सवर रुग्ण अगर त्यांचे नातेवाईक निव्वळ वैद्यकीय पाश्र्वभूमीशी निगडित नामोल्लेख टाळून, प्रश्न पाठवू शकतील. या प्रश्नांची उत्तरे स्थानिक वृत्तपत्रांमधून अगर मोठय़ा वृत्तपत्रांच्या स्थानिक पुरवणीमधून आठवडय़ाच्या अगर महिन्याच्या विवक्षित दिवशी दिली जातील. या कामी डॉक्टर मंडळींना प्रसारमाध्यमांची मदत लागेल.
२) समाजाच्या आरोग्य प्रबोधनाशी निगडित उपक्रम- सदर उपक्रमातून ऋतुचक्रानुसार येणाऱ्या आजारांची माहिती, त्याविषयीची खबरदारी, उपचार इत्यादी बाबींची कल्पना देण्यात यावी. ही माहितीपत्रके, व्याख्याने, चर्चासत्रे, वर्तमानपत्रीय लेख यातून स्थानिक आय.एम.ए. शाखेने पुरवावी.
तसेच स्थानिक आय.एम.ए. शाखेने स्वत:ची वेबसाइट चालू करून सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित करावी. सदर वेबसाइटच्या ई-मेल अ‍ॅड्रेसवर मुद्दा क्र. १ मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रश्न पाठविले जाऊ शकतात. सदर प्रश्नांची उत्तरे वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात यावीत.
३) सामाजिक सौहार्द मंच :
हा मंच वैद्यक व्यवसायाशी निगडित वैद्यकीय व अवैद्यकीय (उदा. हॉस्पिटल बिल) शंका, तक्रारी व गाऱ्हाणी यांचे निरसन करेल. स्थानिक आय.एम.ए., आय.डी.ए., आयुर्वेदिक व अन्य वैद्यक शाखांचे प्रत्येकी दोन पदाधिकारी या मंचाचे सभासद असतील. त्यांच्याशिवाय दोन प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, दोन न्याय वैद्यक सल्लागार व दोन प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या मंचाचे सदस्य राहावेत.
तक्रार निवारणासाठी अशा प्रकारचे निष्पक्ष व्यासपीठ उपलब्ध झाल्याने बऱ्याच अंशी कटुता टळेल व कोर्ट केसेस काही अंशी टाळता येतील. सदर मंच हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांप्रमाणेच डॉक्टरांची गाऱ्हाणी- उदा. रुग्णालयाची तोडफोड, मारहाण अगर धमकी सत्र- लक्षात घेईल व त्याबाबत संबंधित वैद्यक व्यावसायिकास योग्य तो सल्ला देईल. जसे स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेणे अगर कायदेशीर सल्ला इत्यादी.
वरील उपायांमुळे डॉक्टर व रुग्ण यांच्यातील अनावश्यक तेढ कमी होण्यास मदत होईल अशी मला आशा वाटते.
डॉ. स्वाती गाडगीळ, डोंबिवली
swats7767@yahoo.com

कामगार चळवळी नव्याने सुरू झाल्या पाहिजेत
२१ मे च्या अंकात कामगार एकजुटीला पर्याय नाही या विषयावरील मत वाचले. मुंबईतील अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडून बाहेरगावी जात आहेत. मिल्सच्या जागी मॉल्स आले आहेत. महसूल देणारे उद्योग राज्याच्या बाहेर जात असल्यामुळे शासनाला आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागत आहे. कामगार वर्गाला जातीय व प्रांतीय वादावर भरडले जात आहे. त्यामुळे उरलेसुरले उद्योगधंदेदेखील बंद होत आहेत. राज्यकर्ते, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी कामगार वर्गाचा वापर केला आहे. कामगारांच्या हिताच्या योजना नाहीत, कामगार कायद्यात कालानुरूप बदल नाहीत. जे कायदे अस्तित्वात आहेत त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जेथे कायमस्वरूपी काम आहे किंवा मूळ उत्पादनाशी निगडित काम आहे तेथे वर्षांनुवर्षे कंत्राटी पद्धतीचा अवलंब होत आहे. हे सारे हायर फायर बंद झाले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातही कंत्राटी पद्धत राबविली जात आहे. सेझ नावाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे आणि कामगारांवरदेखील लादले जात आहे. या ठिकाणचे कामगार कायदे हे त्या उद्योगपतींच्या मर्जीनुसार असल्यामुळे प्राचीन गुलामगिरीचा अर्वाचीन प्रकार उदयास येणार आहे. स्थानिकांना अथवा भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही, तसेच बेरोजगार तरुणांपुढेही पर्याय नसल्यामुळे तो या ठिकाणी आपला उदरनिर्वाह व्हावा, यासाठी नोकरी करायला तयार होणार, त्यामुळे भांडवलदार, मालकशहा, अंबानी, गोदरेज, टाटा, बिर्ला यांची ही नवी पिढी गुलाम होणार आहे.
मुंबई शहरात गिरण्यांच्या जागी शॉपर स्टॉप, बिग बझार, आर मॉल, मेगा मार्ट, मल्टिप्लेक्स उभे राहिले असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कामगार कायद्याचे संरक्षण नाही. त्यांना संघटित करणेदेखील या मंडळींनी मुश्किल करून टाकले आहे.
कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची हत्या झाल्यानंतर कामगार चळवळ विस्कळीत झाली. त्यात आज ही नवी पिढीदेखील भरडली जात आहे.
जागतिक मंदीचे कारण दाखवून तेजीत असलेल्या कंपन्यादेखील तोटय़ात दाखवण्याचा फार्स सुरू आहे. आपल्या फायद्यासाठी कामगारांना ले-ऑफ देऊन घरी बसवले जात आहे. शासनदेखील डोळे झाकून आहे. कामगारांचे संघटन, व्यवस्थापनावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाची मानसिकता, कामगार संघटनांचा दबाव हे अपरिहार्य आहे. ही लढाई एकटय़ादुकटय़ा कामगाराची नाही, तमाम सामान्य माणसांची आहे. कामगार टिकला तर समाज टिकेल. जगात महासत्ता होण्याची स्वप्ने पाहताना कामगार व त्याचे हितदेखील महत्त्वाचे आहेत हे विसरता कामा नये.
अर्जुन जाधव,
अध्यक्ष, महाराष्ट्र जनरल कामगार महासंघ

कुठे ‘अजातशत्रू’, कुठे ‘अजापुत्र’!
सोमवार, २५ मेच्या अंकात भीमाशंकर कठारे यांनी उद्योजक प्रशांत काशीकर यांची घेतलेली मुलाखत ‘अजातशत्रू’ या शीर्षकाखाली वाचली. काशीकर हे अजातशत्रू आहेत असे प्रतिपादन करताना आपण आधी ‘अजातशत्रू’ या शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहिला असेही लेखक लिहितात. मात्र लेखाच्या शेवटी त्याच काशीकरांना ते ‘अजापुत्र’ असे संबोधतात! ‘अजापुत्र’ या शब्दाचा अर्थदेखील त्यांनी शब्दकोशात पाहून घेतला असता तर बरे झाले असते. ‘अजापुत्र’ म्हणजे बकरा- बळीचा बकरा! ‘अजापुत्रं बलिं दध्यात्’ असे एक वचन आहे. कुठे अजातशत्रू आणि कुठे अजापुत्र!
ऊर्मिला रावराणे, चुनाभट्टी, मुंबई