Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

(सविस्तर वृत्त)

लक्ष्मण माने यांना भाई बागल पुरस्कार
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी

येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘भाई माधवराव बागल

 

पुरस्कारा’साठी यंदा भटक्या व विमुक्त समाजाचे नेते पद्मश्री लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली आहे. ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिनांक २८ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येईल. समारंभाचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे महापौर उदय साळोखे हे भूषविणार आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रतिवर्षी बागल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी कॉ. संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कुमार केतकर, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कॉ. यशवंत चव्हाण (मुंबई), दलितमित्र बापूसाहेब पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी, सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्ञानेश महाराव, निळू फुले, डॉ. आ. ह. साळुंखे, सुनीलकुमार लवटे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लक्ष्मण माने हे या पुरस्काराचे १६ वे मानकरी आहेत.
भाईजींच्या जयंतीदिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता शाहू मिल चौकातील भाईजींच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून सायंकाळी पुरस्काराचे वितरण होईल. या दोन्हीही समारंभाला परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बागल विद्यापीठाचे अध्यक्ष माजी आमदार बाबूराव धारवाडे व उपाध्यक्ष माजी कुलगुरू प्रा. डॉ. रा. कृ. कणबरकर यांनी केले आहे.