Leading International Marathi News Daily

बुधवार, २७ मे २००९

दाजीपूरच्या अभयारण्यात तीन बछडय़ांसह दहा वाघ
राधानगरी, २६ मे / वार्ताहर
डौलदार गव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दाजीपूर वन्यजीव अभयारण्यात तीन बछडय़ांसह आठ ते दहा वाघ असल्याचा प्राथमिक अंदाज वन्यजीव विभागाने नुकत्याच झालेल्या प्राणिगणनेअंती व्यक्त केला आहे. देशभरातील वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत असताना वनखात्याचा हा अंदाज वन्यप्रेमींना दिलासादायक ठरणारा आहे.

मुंबईतील बालकाचा खून करणारा मोकाट
नार्को टेस्ट करण्याची आई वडिलांची मागणी

सातारा, २६ मे/प्रतिनिधी
साहिल अंकुश दळवी (वय ७) हा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अंधेरी, मुंबई येथील बालकाचे त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाने पंधरा लाख रुपयांचा खंडणीसाठी अपहरण करून अखेर निर्घृणपणे धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह कराड येथील कोयना नदीच्या पात्रात फेकून दिला. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित मोकाट सुटला असून, त्याला अटक करून त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी हताश झालेल्या मातापित्यांनी पत्रकार परिषदेत केली.

अंदाजपत्रक मंजुरीपूर्वीच सांगलीत दीड कोटींच्या निविदा मागविल्या
सांगली, २६ मे / प्रतिनिधी
सांगली महापालिकेचे सन २००९-१०चे अंदाजपत्रक मंजूर होण्यापूर्वीच सत्ताधारी विकास महाआघाडीने दीड कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत. यावरून मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विरोधी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सभापती हरिदास पाटील यांनी निविदाप्रक्रियेला स्थगिती देऊन पुढील सभेत या कामांबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

कॉपीचा खोटा ठपका ठेवून निकाल राखीव
एक लाखाची भरपाई देण्याचा शिवाजी विद्यापीठाला आदेश
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी
परीक्षेत कॉपी केल्याचा खोटा ठपका ठेवून विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवल्याने झालेला मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसानीबद्दल शिवाजी विद्यापीठाने एक लाख रुपयांची नुकसानभरपाई विद्यार्थ्यांला द्यावी असा महत्त्वपूर्ण निकाल येथील जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. मंचचे अध्यक्ष एम. डी. देशमुख व श्रीमती प्रतिमा करमरकर यांनी हा निकाल दिला. आपल्या निकालपत्रात उभयतांनी संबंधीत रक्कम ही जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याकडून वसूल करावी असे आदेश देतानाच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविषयी खंत व्यक्त केली आहे.

कृषिपंपांना अखंडित वीज मिळेपर्यंत राडा- एन. डी. पाटील
कोल्हापूर, २६ मे / प्रतिनिधी

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी कृषिपंपांना अखंडित वीज मिळत नसेल तर ते राज्य म्हणजे अंधेरनगरीसारखेच असून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वाजवी दरात अखंडित वीज मिळेपर्यंत आमचा राडा चालूच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी आज येथे दिला. फेडरेशनच्या वतीने आज ताराबाई पार्क येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

एअर रायफल प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
कोल्हापूर, २६ मे / विशेष प्रतिनिधी
कै. जयसिंह कुसाळे यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा रायफल असोसिएशन व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एअर रायफल प्रशिक्षण शिबिराचे येथील दुधाळी शूटिंग रेंजमध्ये आज उद्घाटन झाले. दिनांक २५ ते ३१ मेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरामध्ये जवळपास १५० ते २०० नवोदित शिबिरार्थीनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचे उद्घाटन महापौर उदय साळोखे यांच्या हस्ते झाले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सखारामबापू खराडे, सेक्रेटरी व प्रशिक्षक रमेश कुसाळे, जॉ. सेक्रेटरी अजित खराडे, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, खजानीस अजित पाटील, दीपक चव्हाण, दीपक साळोखे, तेजस कुसाळे, अमित पाटील, कल्पना कुसाळे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज व प्रशिक्षक रमेश कुसाळे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी महापौर उदय साळोखे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या रेंजवर उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली.